Home > Fact Check > Fact Check | ३३५० टन की, १६० किलो; उत्तर प्रदेशात नेमकं किती सोनं सापडलंय?

Fact Check | ३३५० टन की, १६० किलो; उत्तर प्रदेशात नेमकं किती सोनं सापडलंय?

Fact Check | ३३५० टन की, १६० किलो; उत्तर प्रदेशात नेमकं किती सोनं सापडलंय?
X

कालपासून सगळीकडे एकाच बातमीची चर्चा आहे. अर्थातच ती बातमी आहे उत्तर प्रदेशातल्या सोन्याची. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात ३ हजार ३५० टन सोन्याची खाण सापडल्याची बातमी कालपासून सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय आहे.

काही प्रसारमाध्यमांनीही यासंदर्भात बातम्या दिल्यानंतर तर या चर्चांना आणखी उधाण आलं. मात्र, आता या सोन्याच्या खाणीत ३,३५० टन नाही तर १६० किलो सोनं असल्याच्या बातम्या येत आहे. काय आहे वास्तव जाणून घेऊयात...

२० नोव्हेंबरला एशियन न्यूज इंटरनॅशनल (ANI) या न्यूज एजन्सीने ट्विट केलं की, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (GSI) आणि उत्तर प्रदेश भूविज्ञान आणि खाण संचालनालय यांच्यामार्फत केल्या गेलेल्या मोहिमेत सोनभद्र जिल्ह्यात सोन्याचे साठे सापडले आहेत. खाणकामांसाठी ही जमीन भाडेपट्ट्यावर घेण्याचा सरकार विचार करत आहे. त्यासाठी सर्वेक्षण केलं जात आहे. जिल्हा खणिकर्म अधिकारी के. के. राय ही माहिती दिल्याचं ‘एएनआय’नं म्हटलं.

त्यानंतर देशभरातील वेगवेगळ्या भाषांतील प्रसारमाध्यमांनी ही बातमी उचलून धरली. उत्तर प्रदेशात सोन्याचा मोठा साठा असलेली खाण सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या.

मीडिया रिपोर्ट्सचं घेत, वेगवेगळी आकडेवारी देऊन यासंदर्भात बातम्या देण्यात आल्या. काही ठिकाणी, जीएसआयला सुमारे ३,३५० टन कच्च्या स्वरूपात सोनं सापडलं असून त्यातून सुमारे १,५०० शुद्ध सोनं तयार केलं जाऊ शकतं असं सांगण्यात आलं. काही प्रसारमाध्यमांनी ३ हजार टन सोनं सापडल्याचं सांगितलं. या सोन्यामुळे सोनभद्र जिल्हा आता कसा श्रीमंत होऊ शकतो असं हे ही सांगण्यात आलं.

अमर उजाला

टाईम्स नाऊ मराठी

द इकॉनॉमिक टाईम्स

द हिंदू - बिझनेस लाईन

सोशल मीडियावरही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नेहमीप्रमाणे लोकांनी आपापल्या पद्धतीने त्यावर व्यक्त व्हायला सुरूवात केली. या माहितीवर MEMES ही बनले जे मोठ्या प्रामाणात व्हायरल आहेत.

तथ्य पडताळणी

सोनभद्रमध्ये ३,३५० टन सोनं सापडलं असल्याच्या बातम्या आल्यानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (GSI) ने यासंदर्भात पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. सोनभद्रमध्ये ३,००० टन सोन्याचा साठा मिळाल्याच्या वृत्ताचं ‘जीएसआय’नं खंडण केलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा सापडल्याबाबत जीएसआयनं कोणालाही कोणतीही माहिती दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

उत्तर प्रदेशच्या खणन विभागासोबत ‘जीएसआय’ने १९९८-९९ आणि १९९९-२००० मध्ये उत्खनन केलं होतं. या भागात काही प्रमाणात धातू मिळू शकतात असं त्या सर्वेक्षणातून समोर आलं होतं. या सर्वेक्षणात सोनेमिश्रित धातूमधून प्रतिटन ३.०३ ग्रॅम सोनं असं एकूण १६० किलो सोनं मिळू शकतं, असं त्या अहावालात सांगण्यात आलं होतं. ‘जीएसआय’ने हा अहवाल उत्तर प्रदेशच्या खनन विभागाकडे सोपवला होता जेणेकरुन ते पुढील कारवाई करतील, असं ‘जीएसआय’चे महासंचालक एम. श्रीधर यांनी सांगितलं.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (GSI) ने यासंदर्भात पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे.

निष्कर्ष

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात केवळ सुमारे १६० किलो सोनं मिळू शकतं असं भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (GSI) ने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याठिकाणी ३,३५० टन सोनं सापडल्याचं वृत्त खोटं आहे.

Updated : 23 Feb 2020 7:39 AM GMT
Next Story
Share it
Top