उ. प्रदेशातील 24 स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Courtesy: Social Media

उत्तर प्रदेशातील ओरैया मध्ये शनिवारी पहाटे दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 24 मजुरांचा मृत्यू झाला आहे. पण आता यावरुन उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या या मजुरांसाठी योगी आदित्यनाथ सरकारने कोणत्याही बसेसची सोय केली नसल्याने या मजुरांना नाईलाजाने ट्रकने प्रवास करावा लागल्याची टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विट करुन या दुर्घटनेवरुन उ.प्रदेश सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. तर उ.प्रदेशमार्गे जाणाऱ्या मजुरांचीही सोय करण्यात येईल असं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी देऊनही अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप बसपा अध्यक्षा मायावती यांनी केला आहे, तसंच या दोषींवर कारवाईची मागणीही केली आहे. या दुर्घटनेवरुन उ.प्रदेश सरकारला मजुरांच्या जीवाची किंमत नसल्याचे सिद्ध झाल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.