विधान परिषद निवडणूक: ९ जागांसाठी १४ उमेदवारांचे अर्ज

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण १४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली आहे.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. आज शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अर्ज दाखल केले.

भाजपच्या ४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले असतांनाही आज पुन्हा संदीप लेले आणि रमेश कराड यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला २ जागा आलेल्या असतांना राष्ट्रवादीच्या ४ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, किरण पावसकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

याशिवाय काँग्रेसकडून राजेश धोंडीराम राठोड यांनी तर अपक्ष म्हणून राठोड शेहबाज अलाउद्दीन यांनी अर्ज दाखल केला आहे.

१२ मे म्हणजे उद्या सर्व अर्जांची छाननी होणार असून १४ मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार अर्ज मागे घेतात हे बघणं आता महत्वाचं आहे.