Home > Max Political > ठाणे महापालिकेचे बजेट सादर होण्याआधीच वर्तमानपत्रात? काँग्रेस राष्ट्रवादीचा शिवसेनेवर हल्ला

ठाणे महापालिकेचे बजेट सादर होण्याआधीच वर्तमानपत्रात? काँग्रेस राष्ट्रवादीचा शिवसेनेवर हल्ला

गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीच्या घटना घडत होत्या. मात्र ठाणे महापालिकेचा बजेट सादर होण्यापुर्वीच शिवसेनेशी संलग्न असलेल्या स्थानिक वृत्तपत्रात बजेट छापून आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ठाणे महापालिकेचे बजेट सादर होण्याआधीच वर्तमानपत्रात? काँग्रेस राष्ट्रवादीचा शिवसेनेवर हल्ला
X

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात विविध परीक्षांमध्ये पेपरफुटीचे प्रकार समोर आले. त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होण्यापुर्वीच शिवसेनेशी संलग्न असलेल्या स्थानिक वृत्तपत्रात छापून आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर अर्थसंकल्प सादर होण्यापुर्वीच फुटला असल्याने या प्रकरणाला आयुक्त बिपीन शर्मा हेच जबाबदार आहेत. त्यांची भूमिका शिवसेनाभिमुख असल्याने त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन येणाऱ्या निवडणूकीत शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी घणाघाती टीका केली.

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. मात्र, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच तो एका वृत्तपत्रामध्ये छापण्यात आला होता. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्येच गदारोळ केला. तर त्यानंतर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ठाणे महानगर पालिकेचा आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा नरेंद्र बल्लाळ सभागृहात सादर करणार होते. तर स्थायी समितीच्या 16 सदस्यांना सकाळी अकरा वाजेपर्यंत अर्थसंकल्पाची प्रत मिळाली नव्हती. मात्र शिवसेनेशी संलग्न असलेल्या वृत्तपत्रात अर्थसंकल्प सकाळीच छापून आला होता. त्यामुळे गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात आयुक्तांविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच राज्याचे मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती आणि राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून फुटीचे पेव फुटले आहे. तर वेगवेगळ्या परीक्षांपाठोपाठ आता ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्पही फुटल्याने गोपनियतेचा भंग झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारीच चापुलसगीरी करीत असल्याने असे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. तर संबंधीत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. तसेच नरेंद्र बल्लाळ यांनी वेबिनारद्वारे आयोजित केलेल्या बेठकीतील अर्थसंकल्पाचे विवेचन काही दैनिकांसह सर्वत्र जाहीर झाल्याने अर्थसंकल्प फुटल्याचे उघड झाले, असा आरोप मनसेने केला आहे.

पेपर फुटीनंतर आता ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्पही फुटल्याने गोपनियतेच्या हक्काचा भंग केल्याप्रकरणी आयुक्तांवर टीका करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याबरोबरच भाजप आणि काँग्रेसनेही अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेच्या विरोधात आक्रमक झाल्याने आघाडीत बिघाडी होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

Updated : 10 Feb 2022 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top