राखी बाजार सजला; मात्र विक्रीला अल्प प्रतिसाद
अवघ्या दोन दिवसांवर रक्षाबंधन सण आला असतांना राखी बाजार सजला आहे मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राखी खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे राखी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
X
बुलडाणा : बहीण भावाचे अतुट नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणानिमित्ताने डायमंड, स्टोन, मोती राखी यासह विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्यांनी सर्वत्र बाजार फुलला आहे. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध, रोज दुकाने उघडण्यास मनाई या कारणांचा फटका राखी व्यवसायाला बसला आहे.
भावा-बहिणीच्या प्रेमाचा राखीपौर्णिमा सण दोन दिवसांवर आला आहे, ज्या दुकानांमध्ये राख्या उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. राख्यांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या हजारो रुपयांचा परतावा कसा मिळणार, या काळजीने विक्रेता त्रस्त आहेत. बुलडाण्यातील राखी बाजारात डायमंड, स्टोन, मोती राखी यासह विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलला आहे. मात्र राखी विक्रीवर कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे.ग्राहकांचा खरेदीसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे राखी व्यावसायिक सांगत आहेत.