समलैंगिकता

समलैंगिकता
X

समलैंगिकता यावर अजूनही आपल्याकडे फारसं विचारलं अथवा बोललं जात नाही, ज्याचा परिणाम असंख्य तरुण तरुणींच्या मानसिक त्रासात रुपांतरीत होतं. अनेकदा यामुळे आयुष्यही उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. आपला मुलगा अथवा मुलगीही समलैंगिक आहे, हे स्वीकारणं पालकांसाठी तितकंसं सोपं नाही, हे खरं असलं तरी त्याचा बळी इतर कोणी ठरता कामा नये, याची खबरदारी मात्र त्यांनी घेणं निश्चित गरजेचं आहे. मुळातच आपला मुलगा अथवा मुलगी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलू शकले, तर प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधता येते. मात्र केवळ लोक काय म्हणतील, या भीतीने आपल्या पाल्याची लैंगिकता लपवून ठेवून अनेकदा आपणच आपल्या पाल्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर चालतो. यासाठी आपण आपल्या विचारांचे दार जरा किलकिले केले पाहिजे.

लग्नासाठी जेव्हा वधू-वर संशोधन केले जाते, तेव्हा वधू पक्षाकडून खास करून वर पक्षाकडील माहितीची खातरजमा केली जाते. काही ठिकाणी वर पक्षही वधूबाबत माहिती गोळा करते. साधारण आपल्या घरात येणारी नवीन व्यक्ती, आपल्या घरात आपल्या सर्वांशी जमवून घेऊ शकेल ना? या हेतूनेही क्रॉस चेकिंग केलं जातं. ज्या माहितीची खातरजमा करता येणे शक्य असते, त्या बाबतीत ठीक आहे; परंतु, अत्यंत व्यक्तिगत आयुष्याबद्दल त्या व्यक्तीखेरीज इतर कोणीही माहिती देऊ शकत नाही. अशा वेळेस माहितीची खातरजमा कशी करणार? अशा माहितीची खातरजमा न केल्यामुळे जयाच्या आयुष्याची काही वर्ष वाया गेली.

जया एका आयटी कंपनीत काम करणारी मुलगी. चांगला पगार मिळवणारी. जरा स्थिर होतेय, तोवर घरात लग्नाचा विषय निघाला. तिच्या अपेक्षांप्रमाणे पारंपरिकरित्या वरसंशोधन सुरु झालं आणि काही महिन्यांतच एका ओळखीच्या नातेवाईकानं अमोलचे स्थळ सुचवलं. चांगली नोकरी, व्यवस्थित पगार, घरातील मंडळीही सुशिक्षित. आणखी काय हवं? मग जयाच्या घरच्यांनी तिला हे सर्व सांगितलं. तिलाही नकार देण्यासारखं काही वाटलं नाही. दोघेही एकदा घरच्यांच्या संमतीनं भेटले. त्या भेटीत का कोण जाणे, पण जयाला अमोल काही स्पेशल वगैरे वाटला नाही. घरच्यांनी आणि तिनेही स्वतःला समजावलं की, हळूहळू एकमेकांच्या सहवासाने प्रेम निर्माण होईल. पहिल्या भेटीतच कसं शक्य आहे? या विचारांसह तिनं मनात येणारे सर्व प्रश्न बाजूला सारून अमोलशी विवाह केला. लग्न होऊपर्यंत सर्व ठीक होते. मनातल्या प्रश्नांना जया दूर करत राहिली. मात्र लग्न झाल्यावर हे प्रश्न अधिकच तीव्र होत चालले आहेत, असं तिला जाणवलं. लग्नाला दोन महिने उलटून गेले, तरी अमोल आणि जयाचा शरीरसंबंध आला नव्हता. वरकरणी सर्व नीटनेटके चालले आहे, असे भासत होते. सासू सासरे, घरातील इतर मंडळी या लग्नाने प्रसन्न दिसत होती; मात्र, जया आनंदी नव्हती. मनात चाललेल्या वादळाला ती तोंड देत होती. तिला काहीच कळेनासं झालं होतं. अमोल कुठल्याही प्रकारे तिच्याजवळ मोकळा होत नव्हता, ना तशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तिने तसा प्रयत्न केला की तो अस्वस्थ होत होता. याचा अर्थ काय? हे तिला कळत नव्हते. कुणाला आणि काय सांगावे, हे तिला कळत नव्हते. त्रास म्हणावा तर तसा काहीही नव्हता. हा विषय तिने अमोलजवळ काढण्याचा प्रयत्नही केला; पण, तो आपल्यापासून काही तरी लपवतोय, असं तिला सारखं वाटू लागलं. आपल्या केवळ स्पर्शाचा अमोलला त्रास का व्हावा? या प्रश्नाने ती प्रचंड अस्वस्थ झाली. यातच तिच्या लक्षात आलं की, अमोल आणि त्याचा जिवलग मित्र यांचे शारीरिक संबंध आहे. हे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला अचानक सापडली. त्या उत्तराने ती अधिकच अस्वस्थ झाली होती. हा सर्व प्रकार तिने माहेरी सांगितला. माहेरचेही तिच्यामागे खंबीर उभे राहिले. एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तिला घटस्फोटही मिळाला. मात्र यासाठी तिच्या आयुष्यातील एक वर्ष जावं लागलं आणि ज्या मानसिक त्रासातून तिला जावं लागलं, तो वेगळाच!

समलैंगिकता यावर अजूनही आपल्याकडे फारसं विचारलं अथवा बोललं जात नाही, ज्याचा परिणाम जयासारख्या असंख्य तरुण तरुणींच्या मानसिक त्रासात रुपांतरीत होतं. अनेकदा यामुळे आयुष्यही उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. आपला मुलगा अथवा मुलगीही समलैंगिक आहे, हे स्वीकारणं पालकांसाठी तितकंसं सोपं नाही, हे खरं असलं तरी त्याचा बळी इतर कोणी ठरता कामा नये, याची खबरदारी मात्र त्यांनी घेणं निश्चित गरजेचं आहे. मुळातच आपला मुलगा अथवा मुलगी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलू शकले, तर प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधता येते. मात्र केवळ लोक काय म्हणतील, या भीतीने आपल्या पाल्याची लैंगिकता लपवून ठेवून अनेकदा आपणच आपल्या पाल्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर चालतो. यासाठी आपण आपल्या विचारांचे दार जरा किलकिले केले पाहिजे. कधी काळी समलैंगिक संबंध करणारा समाज आणि भिन्नलिंगी संबंधाला प्रमाण मानणारा उरलेला समाज, यामध्ये एके काळी किती तीव्र ताण होता; तसा अजूनही आहेच, मात्र तो त्या तीव्रतेचा निश्चितच नाही.

समलैंगिकतेला अजूनही आपल्याकडे मान्यता मिळालेली दिसत नाही. डेन्मार्क हे युरोपातील पहिले राष्ट्र, ज्याने १९८९ मध्ये समलिंगी जोडप्यास मान्यता देऊन विवाहित जोडप्यांना प्राप्त होणारे कायदेशीर हक्क आणि सेवा-सुविधा त्यांना "Civil Union" या नव्या संबोधनाने देऊ केले आणि त्यानंतर युरोपातील अनेक राष्ट्रांनी आणि बरोबरीने अमेरिकेतील समाजाने अखेर समलैंगिक लोकांचा स्वीकार केला. अनेक देशात त्यांना कायदेशीर मान्यता आहे, कायद्याने त्यांना लग्न करता येते. असे असले तरी अजूनही समलैंगिकतेच्या भावविश्वावर प्रकाश फारसा टाकण्यात आलेला नाही. या विषयावर अनेक फिल्म्स निघालेल्या आपण बघतो; मात्र, अजूनही आपल्याकडे समलैंगिकतेला समाजमान्यता मिळालेली नाही. समलैंगिकांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण आतापर्यंत झालेले नसल्याने त्यांची निश्चित आकडेवारी सांगता येणे कठीण आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे या समस्येकडे काणाडोळा करून चालणार नाही. समलैंगिक आकर्षण हे नैसर्गिक नाही, असे अनेकांना वाटते. त्यामुळे ते विकृत समजले जाते. अशा व्यक्तींना विकृत मनोवृत्तीचे ठरवून समाज मोकळा होतो. इतर सर्व बाबतीत सामान्य असणारी ही मंडळी केवळ या एका मुद्यावर अचानक विकृत कशी ठरतात? याचा फारसा विचार कोणी करत नाही. याच सर्व कारणांमुळे समलैंगिक असणारे लोक आपल्या प्रश्नांविषयी मोकळेपणाने बोलूही शकत नाही. त्यांच्या न बोलण्याने प्रश्न अधिकाधिकच गंभीर होत जातो.

मुळातच ज्यांना नैसर्गिक कामजीवन मिळत नाही, ते समलैंगिक कामजीवनाचा आधार शोधतात, असा एक गैरसमज समाजात आहे. यात आपल्या कुटुंबापासून दूर असलेले पुरुष हे मुख्यत्वे समलैंगिक जीवन अनुभवतात, असे मानतात. मात्र हा एक मोठा गैरसमज आहे. विषमजीवी कामजीवनाला पर्याय म्हणून समलैगिक संबध नसतात. अनेकदा वयात येताना तरुण-तरुणींना विरुद्धलिंगी आकर्षण वाटण्याऐवजी समलिंगी आकर्षण वाटण्यास सुरवात होते. यालाच समलैंगिक संबध म्हणतात. या संबंधातून त्यांना कामतृप्तीचा अनुभव येतो आणि मानसिक व शारीरिक सुखही मिळते. समलैंगिक संबंधांमागे सामाजिक, जैविक, तसेच जेनेटिकल कारणेही असतात. अनेकदा समलैंगिक मूल होणार, हे आईच्या गर्भातच ठरते. मात्र समाजात तो गुन्हा ठरवला जातो. ही जर नैसर्गिक प्रवृत्ती असेल, तर याचे काय करायचे, हे न समजल्याने अनेक जण निराश होतात आणि आपले आयुष्य चुकीच्या मार्गाने पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शनाची गरज पाल्यासह पालकांनाही जाणवते. अनेक सामाजिक संस्था समलैंगिक लोकांच्या प्रश्नांवर काम करत आहेत. अशा संस्थाकडून अथवा चांगल्या डॉक्टरकडून या प्रश्नावर मार्गदर्शन मिळवता येईल. रस्त्यावरच्या कुठल्याही जाहिरातींना बळी पडू नये. कारण कुठलेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्यांच्याकडे नसल्याने ते चुकीचे मार्गदर्शन करण्याचा संभव असतो. त्यामुळे योग्य व्यक्तीकडूनच ते मिळवावे. हार्मोनल बॅलन्स ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, तसा न झाल्यामुळे या त्रुटी नैसर्गिक आहेत, ती विकृती किंवा आजार नाही, हे म्हणूनच आपण समजून घेतले पाहिजे. घरात अशी व्यक्ती असल्यास त्यास पूर्णतः आधार दिला पाहिजे.

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 5 May 2017 2:27 PM IST
Next Story
Share it
Top