Home > मॅक्स ब्लॉग्ज > बायांनो!! कसंही करा, पण तुम्ही मराच!!!

बायांनो!! कसंही करा, पण तुम्ही मराच!!!

बायांनो!! कसंही करा, पण तुम्ही मराच!!!
X

लातूर जिल्ह्यातल्या शीतल वायाळ या मुलीच्या आत्महत्येने आपण जीवंत असलेल्या सर्वांना पुन्हा एकदा आपल्या स्वत:चाच तोच जुना, हिंस्त्र चेहरा दाखवलाय. आपण कसे दुष्ट, भावनाहीन, निष्क्रिय आणि आत्मकेंद्री आहोत हे तिने आपल्या तोंडावर चिठ्ठी फेकून सांगितलं आहे. दोनच वर्षांपूर्वी बसचा पास काढायला पैसे नाहीत म्हणून लातूर मधल्याच एका तरुणीने आत्महत्या केली होती. त्यापूर्वी एका शेतकऱ्याच्या घरातल्या तीन बहिणींनी बापाला लग्नाचा खर्च झेपत नाही म्हणून आढ्याला टांगून घेऊन आत्महत्या केली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढत चाललंय. अशी खूप उदाहरणं आठवताहेत आणि मन सुन्न होतंय. आपण काही करू शकत नाहीत हीच भावना जास्त प्रबळ झालीय.

याचं कारण म्हणजे, सध्या आपल्याकडे समाजकार्याची एक नवी फॅशन जोरात चाललीय. गरिबीमुळे कोणी मेलं की, सर्व पैसेवाल्यांनी गंभीर चेहरे करून, हळहळत दहा-वीस हजार रुपयांची मदत करायची, फोटो काढून पेपर आणि सोशल मीडियावर टाकायचे, मीडियानेही, त्यावर भरभरून कौतुक करत मोठ्ठी जागा द्यायची. आणि सगळ्यांनी नंतर ते सगळं विसरून जायचं. आणि मग, मुळातून हे असं का घडतं याची चर्चाही करायची नाही. त्यावर कृती करणं तर दूरच!! शीतलच्या “स्टोरी”चंही तेच होणार याची मला जाम खात्री आहे. कारण, गेल्या चार पाच वर्षांपासून आपण जास्तीत जास्त आत्मकेंद्री, बिनडोक आणि मत्सरी कसे होऊ याची जणू स्पर्धाच चाललीय सगळीकडे. राजा राममोहन राय, महात्मा फुलेंपासून ते आजपर्यंत, स्त्रियांना जगणं सुसह्य व्हावं म्हणून ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्यांच्या कष्टाची, संवेदनशीलतेची आपण थट्टातर करत नाहीयोत ना?

गेल्या पंचवीस वर्षात, जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण सुरु झाल्यापासून, म्हणजे, आपण जगाशी जास्त जोडले गेल्यापासून, नवे नवे तंत्रज्ञान आणि भरीव गुंतवणूक आक्रमक वेगाने यायला लागले. दरडोई उत्पन्न वाढून, मध्यम वर्ग वेगाने विस्तारला. हातात पैसा खेळायला लागल्याने राहणीमान आधुनिक व्हायला लागले. ज्या वस्तू चैनीच्या समजल्या जायच्या त्या आता जीवनावश्यक बनल्या आहेत. दरवर्षी नव्या चकचकीत, पूर्वीपेक्षा जास्त आधुनिक वस्तू घ्याव्यात, जुन्या फेकून द्याव्यात, याला ऊत आलाय. कमी कष्टात, जास्तीत जास्त पैसा कमावण्याच्या मागे सगळे पळताहेत. अजून पैसा कमवावा, त्यातून अजून नवे काही, थ्रिल्लिंग करावं, अशा आत्ममग्न वळणावर आपण पोचलो आहोत. राहणीमान अजून जास्त आधुनिक कसं होईल याच एका ध्यासाभोवती सगळे पळत आहेत. या सगळ्या भोवळ आणणाऱ्या, गतिमान चक्रात आपण अडकत चाललो आहोत. पैसा हा एकमेव ध्यास राहिल्यामुळे, शाश्वत मानवी मूल्यांचा विसर पडून एक सामूहिक भ्रमिष्टावस्था येत आहे. परिणामी, राहणीमानविषयक जीवनशैली आधुनिक झाली तरी, वैचारिक जीवनशैली मात्र पुराणमतवादी आणि जुनाट प्रथांना धरून राहणारी राहिली आहे. त्यात वाढलेल्या उत्पन्नामुळे, जुन्या, स्त्रियांसाठी अन्यायकारक असलेल्या रीतीरिवाज, रूढी-परंपरांचा मोठ्ठा सोहळा आणि समर्थन होत आहे. वाढलेल्या मध्यम वर्गात पूर्वीच्या आर्थिक मागास वर्गाचा समावेश झाल्याने मध्यमवर्ग खूप मोठा झालाय. यात धनाढ्य शेतकरीही आलेत. त्यामुळे आणि मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे, जुन्यांबरोबरच नव्या, खर्चिक प्रथा आणि रूढी रुजत चालल्या आहेत. या सगळ्याचा प्रतिकार करू शकणाऱ्या सामाजिक चळवळी क्षीण आणि तोकड्या पडू लागल्या आहेत, हेही वास्तव आहे. मध्यम वर्ग हा सुशिक्षित असल्याने, समाजातला कृतीशील आणि विचारी वर्ग मानला जात असतो. या वर्गाचा प्रभाव इतर घटकांवर पडत असतो. त्यांनी पाळलेल्या प्रथा, रूढी-परंपरांना प्रतिष्ठित मानले गेल्यामुळे, त्यांच्यासारखे वागणे प्रतिष्ठेचे ठरते. या सगळ्याचा संबंध शीतलच्या आत्महत्येशी आहे.

आर्थिक संपन्नता असायला हवीच, परंतु हि संपन्नता कष्ट करणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोचायला हवी. संपत्तीची निर्मिती करणाऱ्या कष्टकऱ्यांची, स्त्रियांची, दलितांची, अजूनही संपत्तीवर पुरेशी मालकी निर्माण झाली नाहीय. डॉक्टर असोत, शिक्षक असोत, बँकवाले असोत, सरकारी कर्मचारी असोत, व्यापारी असोत की धनाढ्य शेतकरी... या सर्वांनी संस्कृतीच्या नावाखाली, आनंद साजरा करण्याच्या नावाखाली पैशांचा उपयोग करताना, आपले अनुकरण करू पाहणारे गरीब काय करतील याचा विचार करायला हवा. लग्नासारखे समारंभ कमी खर्चात होऊ शकतात याची उदाहरणे घालून द्यायला हवीत.

गर्भात मारून टाकणे असो, की नैराश्याने आत्महत्या असो, की, अति मानसिक ताणाने, लठ्ठपणामुळे, लवकर मृत्यू असो, स्त्रिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या मानवनिर्मित कारणाने मरत आहेत. आणि आम्ही जणू त्यांना नव्याने पुन्हा म्हणत आहोत की, कसंही असो, तुम्ही मरायला हवं.

आणि आपण जर असं म्हणत नसू, तर ते कृतीने सिद्ध करावं लागेल. मैदानात उतरून, कामाला लागावं लागेल. नव्या जोमाने, लोकशिक्षण, समताधीष्टीत राजकारण, स्त्रीयासाठी विशेष आधार योजना यासाठी राजकीय दबाव अशा पद्धतीने गेल्यास कदाचित, पुढच्या शीतलचा जीव वाचेल. अन्यथा आहेच पुन्हा बेगडी सामाजिक कार्याचा शो!!

डॉ. स्मिता शहापूरकर, उस्मानाबाद. [email protected], 9422069705.

Updated : 15 April 2017 7:26 PM IST
Next Story
Share it
Top