Home > मॅक्स ब्लॉग्ज > ऐ आई... मलाही जगायचं होतं !

ऐ आई... मलाही जगायचं होतं !

ऐ आई... मलाही जगायचं होतं !
X

आज राज्यासह देशात सर्वत्र 'लेक वाचावा अभियान' जोरात सुरूय. प्रत्येक राज्याची भाषा जरी वेगळी असेली, तरी सर्वांचा उद्देश मात्र एकच आहे. तो म्हणजे मुलीचा जन्मदर वाढला पाहिजे. मात्र आजही अनेक ठिकाणी मुलीचा गळा दाबण्याचं काम, स्वतःला सुशिक्षित समजून घेणारे, संवेदना हरवलेले लोक करत आहेत. आपली पत्नी, सून, मुलगी, गरोदर असेल तर तिच्या पोटातील बाळाचे गर्भलिंग तपासणारे (चोरीच्या माध्यमातून अर्थपूर्ण व्यवहारातून तपासणी करणारे) महाशय देखील आज समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरतात. प्रत्येकांना आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे पण मुलगी नको झालीय. मुलगी नकोय, मुलगाच हवाय, म्हणणारे आजही असल्याने, स्त्री जातीचे अर्भक फेकून देण्याचे प्रकार देखील अधून मधून समोर येत असतात. असाच एक प्रकार दि.२६ जुलै २०१७ रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असणाऱ्या बीडसांगवी येथे उघडकीस आला.

केवळ एक दिवसाचे, स्त्री जातीचे अर्भक रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडुपात आढळून आलं. अंगावर काट्याने ओरबडलेले व्रण अन् त्यातून होत असलेला रक्तस्त्राव, अंगावर शहारे आणणारा होता. दरम्यान या अर्भकाला (मुलीला) जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आले होते. डाॅक्टरांच्या तपासणीनंतर लक्षात आले की, त्या चिमुकलीचा एक पाय व एक हात फॅक्चर आहे. काय असतील त्या वेदना, ज्या कोवळ्या वयात तिला मिळाल्या ? का ऐकू आला नाही तो आवाज, ज्या रडण्यातील आवाजातही ती आई आई हे शब्द बोलण्याचा प्रयत्न करत होती. नको सोडून जाऊ आई मला, मलाही तुझ्यासोबत जगायचंय, हे जग कसं आहे ते पहायचंय, मलाही शाळेत जायचंय, तेथील मैत्रिणींसोबत खूप खेळायचंय, तुझ्या खांद्याला खांदा लावून मलाही अभिमानाने जगायचंय. का हे तिच्या रडण्यातील शब्द त्या निर्दयी मातेला ऐकू का आले नाहीत ?

काय होती त्या चिमुकल्या जीवाची चूक ? जिने निर्दयी आईच्या पोटी जन्म घेतला. प्रश्न हा नाही की, ते सापडलेलं अर्भक कोणी फेकलं ? प्रश्न हा आहे की, ते अर्भक का फेकलं ? नेमकं एखाद्या सुशक्षित घराण्यातील व्यक्तीने ? का एखाद्या मस्तीखोर (हा शब्द मुद्दाम टाकतोय) निर्दयी मातेने ? जिचे अनैतिक संबंध या चिमुकल्या जीवामूळ उघडकीस येणार होते. जिच्या जन्माचे स्वागत करा असं एकीकडे म्हटलं जातंय. तर दुसरीकडे तिने जग पाहण्याच्या अधीच तिला संपवलं जातंय. (मला असं नाही म्हणायचं की सर्वजण असे वागतात.कित्येक घरात स्त्रीचं स्वागत केलं देखील जात आहे.)

ही कुठली माणुसकी आहे ? संत महंतांची भूमी म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिल जातं. त्या भूमीवर असे क्रूर कृत्य घडणे कितपत योग्य आहे ? पुरोगामी महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात आणखीन किती दिवस हे चालणार ? दरवर्षी महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. का ? कशासाठी ? तर त्यांचे विचार समाजात दूरवर पसरावेत आणि समाजात स्त्री पुरुष समानता नांदावी. मात्र, दुर्दैवाने सांगावे लागत आहे की, आपण जयंत्या फक्त वर्गणी गोळा करून, महापुरुषांच्या फोटोसमोर दारू पिऊन नाचण्यासाठी साजरी करतोयत. शाहू, फुले, आंबेडकरांचा इतिहास वाचतो आपण. पण त्या वाचलेल्या इतिहासातून घेतो ते शून्य. मग का आम्ही म्हणतोयत आम्ही यांचे वारसदार आम्ही त्यांचे वारसदार. खरं तर आम्हाला वारसदार म्हणण्याचा अधिकार नाहीय. जिथे आपण एखाद्या चिमुकल्या जीवाला जग बघण्याआधी संपवून टाकतोय. आणि संपवण्यासाठी कारणीभूत ठरत आहोत.

आजही माझ्या डोळ्यासमोर ती चिमुकली दिसतेय, जिने हे जग पहाण्याआधीच आपले डोळे मिटले होते. सलग ४ ते ५ तास त्या चिमुकल्या जीवावर डॉक्टरांनी उपचार केला. मात्र, नियतीला देखील ती जगावी असं मान्य नव्हतं. आणि शेवटी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र तिच्या शेवटच्या श्वासातून देखील आवाज येत होता, ऐ आई, मलाही जगायचं होतं ! ऐ आई, मलाही जगायचं होतं ! मात्र हा आवाज आता त्या निर्दयी मातेला जाणार का ? या घटनेमागचा सूत्रधारनेमकं कोण आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.

का... कशासाठी.... ? असे बळी दिले जातायत ? काय आहेत याची कारणं ? कधी थांबणार समाजातील अशा विकृती ? महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात जर अशा घटना घडत असतील तर राज्यात काय परिस्थिती असेल ? शेवटी या चिमुकलीचा आवाज महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे या ऐकणार का ? यानंतर अशा घटना घडणार नाहीत याची काळजी सरकार, शासन आणि समाज घेईल का ?

विनोद जिरे, बीड

Updated : 1 Aug 2017 12:32 PM IST
Next Story
Share it
Top