Top
Home > News Update > रूग्णांना दिलासा देण्यासाठी ॲड.यशोमती ठाकूर थेट कोव्हिड वॉर्डमध्ये

रूग्णांना दिलासा देण्यासाठी ॲड.यशोमती ठाकूर थेट कोव्हिड वॉर्डमध्ये

रूग्णांना दिलासा देण्यासाठी ॲड.यशोमती ठाकूर थेट कोव्हिड वॉर्डमध्ये
X

अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज सायंकाळी या रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना दिलासा दिला.

गत काही आठवड्यांपासून अमरावतीच्या जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी आज सायंकाळी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट देऊन ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

यावेळी ॲड.ठाकूर म्हणाल्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, डॉ.रवी भूषण यांची टीम जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेऊन काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेवा देत असते. आज मी स्वत: पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत.

मंत्री ॲड.ठाकूर यांनी माहिती दिली, कोविड रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची स्वत: विचारपूस केली. त्यावेळी सर्व दाखल रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी अत्यंत चांगले काम करत असल्याची माहिती या सर्व रूग्णांनी दिली.

त्या म्हणाल्या, अजूनही आपली लढाई संपलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचे प्रकार कुणीही करता कामा नये. आपल्या सगळ्यांनी मिळून एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 212 रूग्ण आढळून आले आहेत. त्यातले 120 रूग्ण म्हणजेच आढळलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक बरे होऊन घरी परतले आहेत. याच रूग्णालयात त्यांनी उपचार घेतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार होत आहेत.

डॉक्टर व त्यांची टीम या रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. रुग्णांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. डॉक्टर व आरोग्य यंत्रणा रूग्णांसाठी व समाजासाठी देवदूत ठरली आहे. या काळात सर्वांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे व एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करून त्यावर मात करूया, असे आवाहनही पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी केले.

Updated : 31 May 2020 5:28 PM GMT
Next Story
Share it
Top