Home > मॅक्स वूमन > तर आवाज उठवाच...

तर आवाज उठवाच...

तर आवाज उठवाच...
X

साधारण आठ ते नऊ वर्षापूर्वीची आमची युनिफॉर्म बदलाची लढाई आजही आठवते. मुंबई महानगरपालिकेतील दवाखान्यात काम करत असतांना आम्हा परिचारिकांना युनिफॉर्म म्हणून फ्रॉकच घालणे बंधनकारक होते. या फ्रॉक बरोबरच डोक्यावर एक टोपी ही घालावी लागत असे. ही टोपी काही विशिष्ट पद्धतीनेच डोक्यावर चढवावी लागत असल्यामुळे केसांना अनेकदा इजा होत असे. त्याबरोबरच त्या टोपीचा तोल सांभाळणे हा एक कठीण कार्यक्रम असल्यानं, कामापेक्षा तोल सावरत ती टोपी सांभाळण्यात जास्त वेळ जात असे. या सगळ्याचा परिणाम कामावर होत असेच हे वेगळं सांगायला नको. याबरोबरच फ्लॉअर बेडवर असलेल्या रुग्णांना सेवा देतांना हा युनिफॉर्म घालणे फारच त्रासदायक होत असे. त्यात अनेकदा परिचारिका अवघडत असत. हा अवघडलेपणा कामात असल्याने त्याचा कामावर विपरीत परिणाम होत असे. युनिफॉर्म असावा मात्र त्यात परिचारिकांना कुठलाही अवघडलेपणा नसावा असे आम्हाला सतत वाटत असे. या सर्वाची परिणीती म्हणूनच साधारण पाच हजार महिला परिचारिका एकत्र आल्या आणि युनिफॉर्म बदलाची मागणी करू लागल्या. शर्ट व पँट असा सुट सुटीत गणवेश असावा. ही आमची मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली, तेव्हा मात्र जरा गोंधळ झाला. आमची मागणी प्रमाणे गणवेश मिळाला नाही. मात्र आमच्या सोयीसाठी म्हणून फ्रॉकचे असलेले बंधन रद्द होऊन फ्रॉक व पंजाबी ड्रेस घालण्याची मुभा आम्हाला मिळाली आणि आम्हांला त्रासदायक असणारी टोपी हद्दपार झाली.

आम्ही गणवेश बदलाची मागणी केली तेव्हा खूपच चर्चा झाली होती. परिचारिका म्हणून तुमची असलेली ओळख याच गणवेशाने आहे ती संपेल, तुमचा रुबाब संपेल अशी भीती ही काही लोक बोलून दाखवत होते. दवाखान्यात असलेल्या शिस्तीला काही गाल बोट लागेल का? असेही वाटून गेले. मात्र आम्ही परिचारिका आमच्या मतांवर ठाम होतो, सर्वांना आम्ही आमची मते शांतपणे समाजावून सांगितली त्यानंतर, आम्हांला सर्वांचे सहकार्यचं मिळाले. पंजाबी ड्रेससाठी टीकेलाही सामोरे जावे लागले. असे असले तरी आज मुंबई महानगरपालिकेतील दवाखान्यातील परिचारिका या त्यांना सोयीचे वाटतील ते पंजाबी ड्रेस अथवा फ्रॉक घालतात. आपण महिला अनेकदा कोण काय म्हणेल? या भितीने बोलतच नाहीत. सर्व विरोध करणार हे गृहीतच धरतो. आपण जर आपले मुद्दे व्यवस्थित समजावून सांगितले तर सर्वांचे सहकार्य मिळतेच आणि वेळप्रसंगी आपल्या मतांवर ठाम राहात लढाई करण्याची तयारीही ठेवली पाहिजे. त्रास सहन न करता, त्याचा विरोध महिलांनी केला पाहिजे. तो त्रास कुठल्याही स्वरूपाचा असो आणि खास करून जर बाई म्हणून त्रास होत असेल तर आवाज उठवाच.

त्रिशीला कांबळे

(म्युन्सिपल नर्सिंग and प्यारामेडीकल स्टाफ या संघटनेच्या सरचिटणीस, गणवेश बदलाच्या लढाईत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.)

Updated : 2 March 2018 12:15 PM GMT
Next Story
Share it
Top