हॅशटॅग श्रीदेवी...
X
मोबाईलच्या नोटिफिकेशन्सने मी झोपेतून उठले, सात- सव्वा सात वाजले असावेत. किमान ५० मेसेजेस, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, वगैरे -वगरेचे नोटिफिकेशन्स, 'RIP श्रीदेवी'.
'RIP Sridevi' हा हॅशटॅग झाला, शेकडो पोस्ट, हजारो छायाचित्र, प्रतिक्रिया सगळं झपाट्याने घडत होतं. हा रविवार एरवीपेक्षा लवकर सुरु झाला होता. माझं श्रीदेवीला समजून घेण्याचं, तिचं वलय समजून घेण्याचं वय नाही पण एक मात्रं खरं, मला मनापासून वाईट वाटलं. मी फार निवडक चित्रपट बघितले आहेत तिचे, काही कल्ट क्लासिक तर काही मेनस्ट्रीम फेव्हरेटस, मला जितकी श्रीदेवी समजली तितकी मला ती भावली. आज तिच्या मृत्यू भोवती मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांमुळेच किंवा घटनांच्या क्रमामुळे, तिच्याबद्दल एक वेगळंच गूढ निर्माण झालंय. चाहत्यांमध्ये, प्रसिद्धी माध्यमात गॉसिप्सचं रूपांतर चर्चांमध्ये आणि मग विवादांमध्ये होऊ लागलंय. ह्या चर्चांमध्ये अग्रणी मुद्दा होता श्रीदेवी-सौंदर्य-सर्जरी. मला ह्याचा सर्व बाजूंनी विचार करण्याची इच्छा होती. पण सोशल-प्रिंट मीडियावरील चर्चांमुळे मला त्याची गरज भासू लागली.
३० वर्षांपूर्वी जेव्हा श्रीदेवीने प्लास्टिक सर्जरी केली तेव्हा खूप चर्चा झाल्या. तीन दशकांपूर्वी समाजाला तिच्यात किंवा तिच्या अलौकिक सौंदर्याबद्दल जितकं आकर्षण होतं ते आजही टिकून आहे. का होतं तिच्याबद्दल इतकं आकर्षण ? ती श्रीदेवी होती म्हणून का? भारतीय सौंदर्याबद्दल समाजमनामध्ये असलेल्या चौकटीबंद परिभाषा ज्या श्रीदेवीलासुद्धा लागू पडल्या? ह्या परिभाषा आवश्यकतेनुसार किंवा परिस्थितीनुसार बदलतात.
स्त्री कायमस्वरूपी काही सौंदर्याचे दायरे जगत असते, म्हणजे, लांब केस, सरळ नाक, घारे डोळे, गौर वर्ण, इत्यादी इत्यादी. प्रत्येक दायरा हा त्यात न बसणारीवर होणारा आघात असतो. आहे हे असं आहे असे म्हणून जगणाऱ्यांची संख्या जरी अधिक असली तरीही आपलं बसकं नाक, किंवा ओठात बदल करणारे आहेतच. त्यात गैर काहीही नसले तरीही असे करून आपण निसर्गाच्या विरोधात जातो हे ही तितकेच खरे आहे.
सौंदर्या बद्दलच्या आपल्या भारतीय पार्श्वभूमीवर बदल करणारेही बरोबरच ठरतात. कारण प्रत्येक वेळी उघड उघड नसला तरीही सुंदर दिसणं हा महत्वाचा भाग असतो. त्यामुळेच का होईना पण भारत सौंदर्य प्रसाधनाचा मोठा उपभोक्ता आहे.
आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर श्रीदेवीचा सौंदर्याबाबतचा अट्टाहास चुकीचा म्हणता येईल का हा मोठाच संभ्रम निर्माण झाला आहे.
राहिला प्रश्न इंटरनेटकऱ्यांचा तर किम कारडॅशीअन पासून ते अनुष्का शर्मा, सगळ्यांबद्दलच्याच चर्चांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. पण, श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिच्या सर्जरीबाबत चर्चा करणं कितपत बरोबर आहे? मृत्यूनंतर आदर देणे हे सुद्धा शास्त्रात लिहायला हवे का? श्रीदेवी हि सौंदर्याची भोक्ती होती त्यामुळे तिने किती आणि का सर्जरी केल्या हा तिचा अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे. तरीही एखाद्या विख्यात व्यक्तीच्या आयुष्यातील गोष्टीत कायमच जनमानसाला रस असतो. म्हणूनच बऱ्याचदा त्याला मर्यादा उरत नाहीत. खंत इतकीच वाटते कि एका सर्वश्रुत, प्रतिभावान अभिनेत्रीबद्दल अशा चर्चा आज होत आहेत. आणि आपण अजूनही त्यांना दुजोरा देत आहोत.