Home > मॅक्स वूमन > 'साडीपासून ड्रेस पर्यंतचा प्रवास' 

'साडीपासून ड्रेस पर्यंतचा प्रवास' 

साडीपासून ड्रेस पर्यंतचा प्रवास 
X

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस नेहमीच आग्रही राहिला आहे. तसे स्वातंत्र्यही त्याला आहे. काय खावे प्यावे याचे जसे स्वातंत्र्य आहे तसे काय घालावे याचे स्वातंत्र्य मात्र स्त्रियांचा बाबतीत कोठेतरी गोठवलेले दिसून येते पूर्वीपासूनच पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेत स्त्रियांच्या आवडी निवडीवर पुरुषी मानसिकतेचे वर्चस्व असलेले आपल्याला दिसतेय, फक्त महाराष्ट्र बाबतीत बोलले तर काही काळापूर्वी स्त्रिया नऊवारी साडी घालायच्या,नऊवारीतून सहावारी साडीत यायला फार मोठा कालावधी जावा लागला आहे. सहावारी साडी नसणे म्हणजे पुढारलेल्या, शहरवासीयांची मक्तेदारी होती इटुकल्या मुलीसुद्धा नऊवारी साडीत वावरायच्या तेथून पुढे सहावारी साडीतून पंजाबी ड्रेस , जीन्स पँट-शर्ट पर्यंतचा प्रवास सहजसोपा राहिला नाही. प्रत्येक टप्प्यावर बदलासाठी तीला संघर्ष करावा लागला आहे. कधी आत तर कधी बाहर... या सर्व प्रवासात भारतीय पुरुष सहजपणे धोतरातून पँटपर्यंत व पँटपासून ते शर्ट पर्यंत आले आहेत त्यांना कोठेही यासाठी विशेष संघर्ष करावा लागल्याचे ऐकले नाही मात्र स्त्री या साडीपासून ड्रेस पर्यंत यायला फार मोठ्या मानसिक बदलांच्या आयमातून जावे लागले आहे. पुरुष मस्तपैकी बनियान शोर्ट्सवर बाहेर वावरु शकतात मग स्त्रियांनाच पॅकबंद पोशाखाचे साडीचे बंधन का असावे?

स्त्रियांनी शॉर्ट कपडे घातले की भावना चावळल्या जातात व नको ते गुन्हे घडतात असे काहींचे म्हणणे आहे. पण मुळातच दोष कपड्यांचा नसून पाहणाऱ्यांचा नजरेत असतो. पूर्ण कपडे घातलेली स्त्री सुद्धा अशा पापी विकृत नजरेला बळी पडत असते. स्त्रीला सोयीचा सुटसुटीत वाटेल असा पोशाख घालायचे स्वातंत्र्य मिळायला हवे. जिथं तिथं साडीचा आग्रह बिलकुल नको. पूर्वी स्त्रिया घरीच असायच्या म्हणून त्यांनीही साडीबाबत जास्त कुरकुर कदाचित केली नसेल पण आज बहुसंख्य स्त्रिया घरातील जबाबदारी सांभाळून अर्था्र्जनासाठी घराबाहेर पडत आहेत. अशावेळी सर्व घावपळ सांभाळताना तीला स्वत:ला कंफर्टेबल असेल असा पोशाख हवा आहे. पंजाबी ड्रेस हा वापरायला अतिशय सुटसुटीत असा आहे.

पूर्ण अंगभर हा ड्रेस वापरायला सोपा असतो. पण अजुनही आपली मानसिकता मात्र बदलायला तयार नाही. अजुनही अनेक कामाच्या ठिकाणी विशिष्ट रंगाची डिझाईनची साडी हा ड्रेसकोड म्हणून वापरायची सक्ती आहे. ही साडीची परिस्थिती शहरांमध्ये तर आहेच पण खेडयात जास्त प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट आहे. आपल्या सुनेने ड्रेस वापरणे ही अजूनही बऱ्याच सासवाच्या अथवा घरच्यांच्या पचनी न पडलेली गोष्ट आहे. अशावेळी माहेरी, बाहेरगावी गेल्यावर गुपचूप ड्रेसची हौस तीने पूर्ण करावी अशी परिस्थिती आहे. स्त्रियांना सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक कामे करायची असतात.

दिवसभर साडीत वावरताना काय व किती त्रास होतो हे जे साडी वापरतात त्यांनाच कळतं. ती घट्ट बांधलेली पेटीकोटची नाडी, ते घट्ट ब्लाऊज त्यावर पिनांनी चोपून बसवलेल्या मिऱ्या बापरे किती हा पसारा. छातीवरुन निसटणारा पदर सारखा सांभाळा. किती कसरत असते. घरकाम करणारी असो की नोकरी करणारी दोघींच्या साडीबाबतच्या समस्या सारख्याच... गाडी चालवताना बऱ्याचदा साडी चाकात अडकते. त्यामुळे अनेक अपघात होतात. बस, ट्रेन, धावपळीच्या ठिकाणी साडी म्हणजे कहरच.. ड्रेसमध्ये कसं सुटसुटीत असल्याने धावत पळत आपण बस, ट्रेन पकडू शकतो. जे साडीचं कंपल्शन करतात त्यांना एकदा गर्दीच्या ठिकाणी धावपळ करत बस, ट्रेन पकडायला पाठवायला पाहिजे मग कळेल साडी काय चीज असते.

साडीमध्ये पाठीचे पोटाचे नयन रम्य दर्शन पाहाणाऱ्यांना होत असतो. ड्रेसमध्ये अशी पाहण्याची सोयच नसते. अंग झाकणारा ड्रेस व ५मिनिटात तयारी होणारा हा ड्रेस सर्वांना हवाहवासा वाटतो पण बिनधास्त वापरायची अजूनही काहींना हिंमत करता येत नाही. आपल्या समाजात कार्यक्रमात, उत्सवात सण समारंभात साडीला खूप महत्व दिले आहे. नक्कीच याबाबत हरकत नाही पण सरसकट घरोदारी साडीतच वावरा हा अजेंडा मात्र फार त्रासदायक आहे. सध्या शाळांमध्ये साडीऐवजी ड्रेस वापरण्यास परवानगी द्या, याबाबत शासनाला पत्र दिलं आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रच स्वप्न पाहताना शिक्षिकांना मात्र पारंपारिक पोशाखात अडकून पडावे लागतेय. अनेक कृती खेळ हे साडी घातलेली असल्याने शक्य होेत नाही म्हणून माझ्यासारख्या अनेक शिक्षिकांनी केली व ती सवय आता गावाच्या देखील अंगवळणी पडली आहे. बस कुणी बदला असं सांगायची वाट पाहत बसण्याऐवजी आपण स्वत: पुढाकार घेऊन स्वत: पासून बदलाची सुरुवात केली पाहिजे. कोणाच्या समोर पदर पसरणे ही गोष्ट पूर्णपणे बाजूला सारून नव्या बदलाला आनंदाने सामोरे जायची तयारी ठेवूयात. मग चला तर आपण मिळून साऱ्याजणी...

ज्योती रामनाथ कदम

जि. प. प्रा. शाळा बेलगाव तन्हाळे

ता. इगतपूरी, जि.नाशिक

Updated : 2 March 2018 12:04 PM GMT
Next Story
Share it
Top