News Update
Home > मॅक्स वूमन > साडीची सक्ती नकोच!

साडीची सक्ती नकोच!

साडीची सक्ती नकोच!
X

भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून आपण सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतो. ज्या स्त्रीने संपूर्ण समाजाच्या विरोधात जाऊन आज मुलींना, महिलांना या शिक्षण प्रवाहात आणले त्याच महिला शासन व समाज यांची कोणतीही अधिकृत बेडी नसताना साडीचे सोंग पांघरूण घाबरत घाबरत मुलांना जगण्यासाठी न घाबरता लढण्याचे बळ देत आहेत. पूर्वीपासूनच साडीतच शिक्षिकांनी असावे असा समाजाचा दृष्टिकोन आहे, हा समज योग्यच आहे असे मानून शासन शिक्षिकांना साडीची सक्ती करत आहे. याविरुद्ध सोशल मीडिया, वर्तमानपत्र व टेलिव्हिजन वर साडीची सक्ती नको असा आवाज महिला शिक्षिकांनी उठवला आहे पण शासन याबाबत ढिम्म आहे. अनेक खाजगी संस्थांमध्ये शिक्षिकांना कोट, पंजाबी ड्रेस वापरण्यास परवानगी आहे. मग जिल्हा परिषद शाळेतील महिलांना साडीची सक्ती का? आज आम्ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण राबवताना विविध कृतींसाठी पंजाबी ड्रेस वापरत आहोत. त्यामुळे शाळेत वावरताना, साफसफाई करताना पदर, साडी व्यवस्थित आहे की नाही याचे मानसिक दडपण नसते. दिवसभर अगदी सहज वावरता येते. वर्गातील कृती, योगासने, कबड्डी व लंगडी यांसारखे खेळ खेळताना मुलांना उत्तम प्रात्यक्षिक करता येते. आज जिल्हा स्तरावर व विविध NGO मधील माझ्या मुलांचे नृत्य व नाटकातील यश कौतुक करण्यायोग्य आहे. हे सर्व शिकवताना मला ड्रेसमुळे सहजता आली. आज मी शाळेत ड्रेस वापरते तर अनेकजण मला प्रश्न विचारतात की तू ड्रेस का वापरते, तू केंद्रप्रमुख यांना घाबरत नाही का, गावातील लोक काय म्हणत असतील असे प्रश्न विचारणाऱ्या महिलाच आहेत पण मी मला या ड्रेस वापराचा होणारा फायदा त्यांना समजावून सांगते. त्यामुळे आज केंद्रातील अर्ध्याहून अधिक महिला शनिवारी कवायत व योगा शिकवण्यासाठी ड्रेस वापरतात. तरीही महिला शिक्षकांनी ड्रेस घालण्यात वेगळे असे काही नसून ही एक सामान्य बाब आहे असा विचार करून सकारात्मक बदल स्विकारावा.

२००९-१० साली अनेक जिल्ह्यांनी महिलांनी गुलाबी रंगाचीच साडी घालण्याविषयी सक्ती केली होती. पण मुळातच एकाच रंगाची व फक्त साडीच ही सक्ती आमच्यावर करणे चुकीचे आहे. आणि आज आम्ही आम्हाला सहज वावरता येईल व आमच्या कामाचा आनंद आम्हाला घेता येईल असाच पोशाख घालण्यावर ठाम आहोत. देशातील सर्व मुलांना स्वातंत्र्याचे महत्व समजावून सांगताना महिलांनी पोशाख स्वतंत्र मात्र बाजूला ठेवले आहे. या स्वतंत्रचा योग्य वापर योग्य वेळी करण्याची गरज आज महिला शिक्षकांनी वेळीच ओळखावी.

जयश्री पांडुरंग वारंगुळे, शिक्षिका

Updated : 2 March 2018 10:41 AM GMT
Next Story
Share it
Top