Home > मॅक्स वूमन > लोकल ते ग्लोबल बनलेली “संक्रात”

लोकल ते ग्लोबल बनलेली “संक्रात”

लोकल ते ग्लोबल बनलेली “संक्रात”
X

गावाबाहेर कुंभारवाडयात रानामाळातून आणलेल्या मातीला कुंभाराचं गोल चाक आकार देवू लागतं. त्या आकार घेतलेल्या संस्कृतीचं पूजन म्हणजे संक्रात. संक्रात म्हणजे संस्कृती. परंपरा आणि नवीन वर्षातला पहिला सण. मातीतून वर आलेल्या बिजांची पूजा आणि तिळाचा गोडवा म्हणजे संक्रात.

संक्रातीच्या आगमनापूर्वीच बोचरी थंडी शिवारातून धावू लागायची. मग शेकोट्याभोवती सकाळ संध्याकाळ माणसांची गर्दी व्हायची. गप्पांचा फड रात्री उशिरापर्यंत रंगत जायचा. शेतातला हरभरा घाटयाला आलेला असायचा. काळ्याभोर गव्हाच्या शेतातील चिकानं भरलेल्या लोंब्या वाऱ्यासोबत डुलत राहायच्या. शाळवाच्या शेतात माचव्यावर उभे राहून गडीमाणसं कणसांनी भरलेलं दाणं टिपणाऱ्या पाखरावर गोफणीने दगड भिरकावू लागत. डबे वाजवून आणि माणसांच्या हाकांनी शिवार दणाणून जायचा.

बांधावरची बोरीची झुडपे लालभड़क बोरांनी भरलेली असत. शेताच्या कडेला मोगण घातलेल्या पावट्याच्या जाळ्या शेंगाच्या घसानी भरून गेलेल्या असायच्या. मळ्यात हुरडा पार्ट्याना जोर चढायचा. आरावर भाजलेली शाळवाची कोवळी कणसं म्हणजे राणमेवाच जणू. सोबत लालभड़क गाजरं लज्जत वाढवायची. तिकडे गावाबाहेर कुंभारवाडयात रानामाळातून आणलेल्या मातीला कुंभाराचं गोल चाक आकार देवू लागायचं. त्या आकार घेतलेल्या संस्कृतीचं पूजन म्हणजे संक्रात.

संक्रात म्हणजे संस्कृती. परंपरा. त्यातून फुलणारा आनंद. मातीतून वर आलेल्या बिजांची पूजा आणि तिळाचा गोडवा म्हणजे संक्रात. संक्रातीला लग्न होवून वेस ओलांडून गेलेल्या गावच्या लेकी मायेच्या ओढीने वेशीतून आत यायच्या. गावाबाहेरुन उडणारे पतंग त्यांचे स्वागत करायचे. पतंगांना आकाशात उंच जाण्याची ओढ़. तर लेकींना घरी पोहचण्याची ओढ. मग कित्येक उन्हाळे पावसाळे खालेल्या थरथरत्या हातांचे आशीर्वाद घेत या लेकी घराचा उंबरा ओलांडून आत शिरायच्या.

गालावर कडकडून बोटं मोडली जायची. गिरणीत बाजरीचे डबे पीठ बनून घरी पोहचण्यासाठी रांग लावून बसायचे. भोगीला तीळ लावून बाजरीच्या भाकरी पहाटेपासूनच चुलीवर थापल्या जायच्या. भाकरीच्या "थप्प थप्प" आवाजाने घराघरात काठवठ घुमून जायची. तीळ भाकरीला आलिंगन द्यायचे. वैलावर मोठ्या जर्मनच्या पातेलात शेतातून आणलेल्या पावट्याच्या शेंगा, वाटाणा, गाजर, हरभरा, तुरीचे दाणे, वांगी अशा अनेक भाज्या एकत्र करुण भोगीची भाजी शिजत राहायची. मग कुंभारवाड्यातून सुगडं आणि बारकी बोळकी हळदी कुंकू लावून आणली जात. त्याबदली त्यांना पायली दोन पायली ज्वारी घातली जायची. त्यांना संक्राती म्हणत.

मातीची झाकणे लावून सुगड्या देवघरात मांडल्या जात. त्यामध्ये बोरं, ऊसाच्या कांडीचे छोटे गरे, गव्हाच्या लोंब्या, हरभऱ्याचे घाटे भरले जात. पान सुपारी विडा मांडला जायचा. सोबत खारीक, खोबरे, बदाम असायचे. मग हळदी कुंकू लावण्यासाठी बायका एकत्र जमायच्या. त्यानंतर ओवस्याचा कार्यक्रम. नाकातील नथ मिरवत आणि कपाळावरचे लालभड़क कुंकू लेवून सायंकाळी देवळाभोवती नऊ वारी शालू नेसून सावरलेला शालूचा घोळ म्हणजे संक्रात. तीळ आणि उतरंडीला ठेवलेल्या गुळाच्या ढेपतला गुळ फोडून तयार केलेलं तिळगुळ साऱ्या गावाला बेभान होवून वाटत सुटणं म्हणजे संक्रांत. एक तीळ सात जणांनी खाल्ला होता हा वसा सांगणाऱ्या या भूमीवरचा हा सण म्हणजे संक्रात...

...संक्रातीला अगदी आजही खेड्यापाड्यांने टिकवून ठेवली असली तरी काळासोबत तिचे रूप बदलत चालले आहे. पूर्वीचा उत्साह आणि संस्कृती आता जाणवत नाही. देवळाभोवती महिलांचा रात्री उशिरापर्यंत चालणारा तीळगूळाचा कार्यक्रम काही ठिकाणी तर केवळ औपचारिकता म्हणून टिकून आहे. रुपायाच्या आकाराचं कुंकू लावून मिरवणाऱ्या स्त्रियांची शेवटची पिढी मावळतीला गेलीय. नव्या शिकलेल्या सुना जुन्या पिढीकढून हा वारसा उचलताना दिसत नाहीत. काळानुसार कुंकवाची जागा आता टिकल्यानी घेतलीय. नऊवारी प्रकार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

कुंभारवाड्यातून मातीचं सुगडं, बोळकी, माट बनविणारी पिढी तर शेवटच्या घटका मोजतेय. पिढीजात व्यवसाय म्हणून काही जुनी जाणती लोकं अजून टिकून आहेत. पण नवी पिढी असली कामे करायला आता तयार नाही. कुंभारवाड्यातली पोरं आता आजूबाजूच्या कारखान्यात छोटी मोठी नोकरी धरुन पोटाला जिंवत ठेवण्याची अखंड धरपड करताना दिसतात. शहरातून तर कुंभार कधीच हद्दपार झालाय. त्याची जागा बळकावून युपी बिहारीवाला भैय्याच संक्राती विकताना दिसतो. आता लोकल ते ग्लोबल असा संक्रातीचा प्रवास झालाय. म्हणूनच संक्रातीला काचांच्या एच.डी स्क्रीनवरून दिवस रात्र शुभेच्छाचा नुसता पूर ओसंडून वाहतो. पण त्यात अस्सल तिळाचा गोडवा नसतो. की मायेचा ओलावा नसतो.

संस्कृतीचा नुसता सगळीकडे आभास होत राहतो. वेस ओलांडून संक्रातीसाठी एखादी गावची लेक खेड्यात आता दुपारी कारने शिरते अन दोन तासात सक्रांत आटोपून भर्रकन गाडी उडवत निघून जाते. तर शहरात संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत महिला एकमेकींना हळदीकुंकवासाठी बोलावून भेटवस्तू देण्याची परंपरा आजही जपतात. पण कुठेतरी अस्सल तिळाचा गोडवा संपून त्यात मोठेपणाचा थाटमाटच पहायला मिळतो. जागतिकीकरणात सगळच बदलू पाहतय. मग संक्रात तरी मागे कशी राहील. काळानुसार बदल अपरिहार्यच. म्हणूनच येत्या काळात कुंभारवाड्यातल्या मातीला आकार देत फिरणाऱ्या चाकांची घरघर थांबून चीनवरून सुगडं, बोळकी विक्रीला आली तर नवल वाटायला नको. कारण संक्राती सोबत आता सारी संस्कृतीच आपण ग्लोबल बनवलीय...

ज्ञानदेव पोळ

[email protected]

Updated : 13 Jan 2018 2:39 PM GMT
Next Story
Share it
Top