Home > मॅक्स वूमन > महिलांसाठी क्रांतिकारी असलेला 'पॅडमॅन'

महिलांसाठी क्रांतिकारी असलेला 'पॅडमॅन'

महिलांसाठी क्रांतिकारी असलेला पॅडमॅन
X

अक्षय कुमारची सामाजिक बांधिलकी संपूर्ण जग जाणून आहे. सीमेवरील जवान असोत कि दुष्काळग्रस्थ, त्यांच्यासाठी तो सतत उभा असतो. त्याची हि बांधिलकी इथेच संपत नाही, अलीकडचे त्याचे चित्रपट पहिले कि ते आपल्याला लक्षातही येतं. अलीकडे येऊन गेलेला 'टॉयलेट एक प्रेम कथा' आपण सगळ्यांनी पहिला असेलच. अशाच एका क्रांतिकारी सत्य घटनेवर आधारित त्याचा 'पॅडमॅन' आज रिलीज झाला आहे. कसा आहे हा चित्रपट? या चित्रपटातून अक्षयला नेमकं कोणत्या विषयाला हाथ घालायचा आहे त्याबद्दल जाणून घेऊ...

कथा : हि कथा आहे लक्ष्मीकांत चौहान (अक्षय कुमार) या प्रयोगशील तरुणाची. नेहमी सतत काही तरी नवीन करण्याची उर्मी बाळगून असलेला लक्ष्मीप्रसाद व्यवसायाने वेल्डर असतो. लक्ष्मीकांतचे गायत्रीशी (राधिका आपटे) लग्न होतं. लग्नानंतर गायत्रीची मासिकपाळी दरम्यान होणारी कुचंबणा त्याला पाहवत नाही. या दरम्यान ती अस्वच्छ कापड वापरते. तिला 5 दिवस घराबाहेर राहावं लागतं. अस्वच्छ कपडे आणि आदी गोष्टींमुळे अनेक प्राणघातक रोग होऊ शकतात असं ज्यावेळी लक्ष्मीला डॉक्टरांकडून कळतं, तेव्हा तो स्वत: सॅनिटरी पॅड बनवण्याचे ठरवतो. पण 2001 च्या काळात अशा विषयांवर बोलणं देखील पाप होतं मग थेट सॅनिटरी पॅड बनवणं आणि ते महिलांना वापरायला देणं सोप्प कसं असेल? म्हणूनच लक्ष्मीकांतचा हा एकूण प्रवास कसा आहे हे चित्रपटगृहात जाऊन पाहणे अधिक औत्सुक्याचे ठरेल.

दिग्दर्शन : ट्विंकल खन्ना यांची निर्मिती असलेला पॅडमॅन हा खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलेल्या अरुणाचलम मुरुगानंदम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या संवेदनशील विषयाला हाताळण्याचे धाडस आर बल्की यांनी केले आहे. बल्की यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा विषय हाताळला असून त्याचा प्रत्यय आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतो. काही ठिकाणी पॅडमॅन बल्की यांच्या हातून निसटल्याचे वाटते पण गाडी हातून निसटून देतील ते बल्की कसले. चित्रपटात काही ठिकाणी अतिरेक वाटत असला किंवा काही कमतरता जाणवत असल्या तरीही एकूण चित्रपट पाहता आपण त्या चुकांकडे दुर्लक्ष करतो.

अभिनय : संपूर्ण चित्रपट अक्षय कुमार भोवती असला तरी तो चित्रपटात उगाच भाव खात नाही. त्याने त्या पात्राला पुरेपूर न्याय दिला आहे. अक्षय अभिनय न करता तो ते पात्र जगत असतो हीच त्याची खासियत आहे आणि त्याने ती हुबेहूब निभावली आहे. राधिका आपटेने सामाजिक बंधनं असलेली गायत्री छान साकारली आहे. सोनम कपूरची एंट्री उशिरा असली तरी तिने त्या भूमिकेला न्याय दिला आहे.

सिनेमातली गाणी श्रवणीय आहेतच पण सोबत बॅकग्राउंड उत्तम जमलं आहे. याच बरोबर चित्रपटाचा कॅमेरा संगीतासोबत चार चाँद लावून जातो. म्हणजे सगळ्या गोष्टींचा मेळ कसा एकदम फिट जमून आलाय.

म्हणूनच सामाजिक विषयवार आधारित व वेगळं काही पाहायचं असेल तर 'पॅडमॅन' सिनेमा आवर्जून पाहावा. 'पॅडमॅन' नक्की पहा पण एकटे पाहू नका तर संपूर्ण फॅमिलीला घेऊन पहा. म्हणजे चित्रपटाचा हेतू साध्य होईल...

Updated : 9 Feb 2018 1:18 PM GMT
Next Story
Share it
Top