'होय आम्ही आचरटपणाची नवी सीमा गाठण्याचा प्रयत्न करतोय...'
X
श्रीदेवीचे निधन झाल्यानंतर मिडीयामध्ये त्याचं ज्या पद्धतीने कव्हरेज सुरू आहे, तो आचरटपणाचा कळस आहे हे माझे स्पष्ट मत आहे. मी इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये काम केलंय त्यामुळे मला माहिती आहे की मोठ्या घटनांचं कव्हरेज कसं केलं जातं. बेसिक नियम जो या देशातील सो कॉल्ड माध्यमांचा चेहरा मोहरा बदलण्याचा दावा करणाऱ्यांनी तयार केलाय तो हा असतो की रिपोर्टरचा दिवस सकाळी सहा किंवा सातच्या लाईव्हपासून सुरू होतो आणि मग तो न्यूजरूमच्या गरजेनुसार किंवा भाग्यवंत रिपोर्टरसाठी रिलिव्हर आल्यानंतर संपतो. श्रीदेवीच्या निधनाच्या बातमीमध्ये बातमीचे निकष थोडे बदललेले दिसले. तिचं पार्थिव हे दुबईमध्ये शनिवारी रात्री साडेअकरापासून आहे ते ही पोस्ट लिहीपर्यंत मुंबईत आलं नव्हतं.
रिपोर्टर सकाळी सहा वाजल्यापासून तिच्या बंगल्याच्या बाहे, कपूर खानदानाच्या घराच्याबाहेर काय करतात हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. भर म्हणून काही हिंदी चॅनेलने त्यांचे अँकर्स, अतिविशेष रिपोर्टर दिल्लीवरून पाठवले जे फक्त लाईव्ह देण्याचं काम करताना दिसतायत. मुंबईतले रिपोर्टर असाईनमेंटच्या तालावर नाचत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना दोन दिवस बघ्यांमध्ये श्रीदेवीच्या असल्यानसलेल्या फॅन्सचे बाईट घेण्याचं काम उरतं. काही रिपोर्टर्सना दिल्लीच्या रिपोर्टरना थोडा आराम मिळावा म्हणून लाईव्हवर किंवा फोन इनवर घ्यावं लागतं.
मी एका चॅनेलमध्ये काम करणाऱ्या मित्राशी बोलत असताना त्याच्याकडे हा मला आचरट प्रकार वाटत असल्याचं सांगितलं त्यावर त्याने मला उत्तर दिलं की तू आता काठावर बसलायस, तुला दगड मारायला एकदम सोपं आहे. एका अर्थी खरं आहे ते, चॅनेलमध्ये असताना या गोष्टींवर खुलेपणाने बोलता येत नाही. मला खात्री आहे अनेक रिपोर्टर जे श्रीदेवीच्या बंगल्याच्या बाहेर उन्हातान्हात कव्हरेजच्या नावाखाली राबवले जातायत त्यांना माझं म्हणणं पटेल.
ऑफीसमध्ये बसून रिपोर्टरला ऑर्डर सोडली जाते जा वॉकथ्रू करा ! टीकटॅक करा ! मग तो बिचारा लोकांना दगडाच्या भिंती दाखवत जी माहिती पेपरमध्ये किंवा व्हॉटसअपवर आलीय ती सांगून मोकळा होतो. टीकटॅकसाठी गर्दी जमा करतो, त्यात बोलणारा एकपण नसतो मात्र गर्दी इतकी असते की त्यात रिपोर्टरही गायब होऊ शकतो. मग रिपोर्टर उत्साहात त्यांना प्रश्न विचारतो आणि त्याच्या तोंडासमोर बूम धरतो उत्तर देण्याऐवजी तो माणूस बाजूच्याकडे बोट दाखवतो आणि संकेताद्वारे सांगतो ‘ याला विचार’ दुसरा माणूस बोलला तर ठीक नाहीतर तिसऱ्याकडे जायचं असं करत करत तो टीकटॅक संपतो. हा प्रकार जर लाईव्ह असेल तर मग विचारायलाच नको. असाईनमेंटवाले चढचढ चढतात, अकला नाहीत तुम्हाला अशी माणसं गोळा करून आणता? अशा लोकांना किमान आठवडाभर फिल्डवर फक्त टीकटॅक करायला पाठवायला हवा.
मूळ मुद्दाकडे परत येतो, श्रीदेवीचं निधन दुबईत झालं, ते कसं झालं, ती दारू प्यायली होती अशा विविध तर्कांना उधाण आलं होतं. हिंदी वाहिन्या आणि काही मराठी वाहिन्या यांनी त्यांना श्रीदेवी कशी मेली हे खात्रीलायकरित्या माहिती असल्यासारखी प्रात्यक्षिकं करून दाखवली, तज्ज्ञांचे बाईट घेतले. अशा प्रसंगी मानसोपचारतज्ज्ञांचे बाईट किंवा लाईव्ह हमखास घेतले जातात जे फक्त वेळ भरण्यासाठी केलेले उद्योग आहेत हे माझं आजही स्पष्ट मत आहे.
मुंबईमध्ये रिपोर्टींग करणं ही दिवसेंदिवस भयानक बाब बनत चालली आहे. हिंदी चॅनेलमध्ये याला मुख्य कारण आहे ते या शहराची आणि माणसांची अजिबात माहिती नसलेले बॉस (यात काही अपवाद आहेत पण ते बोटावर मोजण्याइतके) आणि मोठेपणा दाखवण्यासाठी उगाच आरडाओरडा करायची सवय. त्याला मुंबईतले लटके साथ देतात आणि कनिष्ठांना गाईबकऱ्या असल्यासारखे हाकत असतात.
दोन दिवस मुंबईतून श्रीदेवीच्या निधनाचे वार्तांकन पाहिल्यानंतर ही पोस्ट वाचण्याऱ्यांनी सांगावे की मुंबईतून त्यांना या बातमीशी निगडीत एकतरी बातमी कळाली का? ज्या बातम्या बघायला मिळत होत्या त्या दुबईतून येत होत्या, इथे फक्त बंगल्यातून बाहेर पडणारी आणि आत जाणारी चमकेश मंडळीत दिसत होती आणि दाखवली जात होती.
सोमवारी संध्याकाळी मध्य रेल्वेवर कल्याणजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती, मी ही बातमी कोणत्याही मराठी चॅनेलवर बघितली नाही. सगळीकडे श्रीदेवीच्या संदर्भातील बातम्याच सुरू होत्या.
माझी हिंदी चॅनेल्सकडून अपेक्षा नाही, मात्र मराठी चॅनेल्सने तरी हा तमाशा थांबवावा, एएनआयवर लाईव्ह फीड मिळत असतं, त्या व्हिज्युअल्ससाठी तुमच्या रिपोर्टरना राबवण्यापेक्षा त्यांना दुसऱ्या,चांगल्या त्यांच्या मनासारख्या स्टोरी करू द्या. दिवसभराच्या या तमाशामधून काहीही फरक पडत नाही.