प्रिय सखी,

प्रिय सखी,
X

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण.

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव पास झाला.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या.

हा इतिहास आठवण्याचे कारण असे की, आजही स्त्रियांच्या समस्या संपलेल्या नाहीत किंबहुना समस्त पुरूष मंडळींनी त्या वाढवून ठेवलेल्या आहेत. बऱ्याच स्त्रीयांही स्त्रीपणाची ढाल करून जगतायंत. पत्नी निवडणूक जिंकलेली असतांना, तिच्या नावाने राजकारण करणारे बरेच राजकीय नेते आज व्यासपीठावरून 'स्त्री सक्षमीकरण, हक्क' यांवर भाषण देतील. इतर स्त्रीयांचे सत्कार करतील. विरोधाभासाची उत्तम उदाहरणे आज पहावयास मिळतील.

मुद्दा असा आहे, ३६५ दिवसांपैकी फक्त एक दिवस स्त्रीयांचा आदर होणार आणि राहिलेले दिवस अनादर. प्रत्येक व्यक्तीने स्त्री असो अथवा पुरूष, समोरच्या व्यक्तीकडे 'माणूस' म्हणून बघावं; माणूस म्हणूनच वागावं आणि वागवावं; स्त्री किंवा पुरूष असा भेद नसावा.

जन्म देणारी 'आई', गोष्टींतून संस्कार देणारी 'आजी', हक्काने लुटुपुटुची लढाई करणारी पण सांभाळ करणारी 'बहीण' आणि सर्वस्व होवून जाणारी, ठामपणे पाठीशी उभी राहणारी 'पत्नी' ह्या निव्वळ चार स्त्रीया नसून पुरूषाला 'माणूस' म्हणून घडवणाऱ्या पहिल्या चार संस्था आहेत, स्तंभ आहेत.

या व्यतिरिक्त शिक्षिका, गुरू, मैत्रीण, मुलगी, विद्यार्थीनी, सहकारी, नातेवाईक, शेजारी इत्यादि अनेक रूपांनी स्त्री पुरूषाच्या आयुष्यात येतच असते. हे सर्व आपणांस सांगण्याचा हेतु असा की, माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या वाटांवर, वळणांवर भेटलेल्या अनेक स्त्रीयांपैकी आपण एक आहात. ज्यांनी जाणीव करून दिली की, स्त्री-देहापलीकडे खरी व्यक्ति असते, माणूस असतो.

पुरूषप्रधान संस्कृतितही आपण मला 'माणूस' म्हणून घडण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, कळत-नकळत प्रेरणा दिली. पुरूषपणाची कात टाकण्यात मदत केली अाणि जगणं समृद्ध केलं. आपलं नातं काय आहे, हे फारसं महत्वाचं नाहीय. मुळात नाती शाश्वत नसतात, ती बदलती असतात. सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलण्याची किमया नात्यांमध्ये असते. शाश्वत असतं ते माणूसपण. मला आपल्यातलं माणूसपण भावलं. शुभेच्छा देण्याइतका मी मोठा नाही, तो अधिकारही नाही. म्हणून आजच्या दिवशी आपणांस मनापासून सलाम.

सुनील

Updated : 8 March 2018 5:27 AM GMT
Next Story
Share it
Top