Home > मॅक्स वूमन > कॉपी तपासण्यासाठी मुलींना केलं विवस्त्र

कॉपी तपासण्यासाठी मुलींना केलं विवस्त्र

कॉपी तपासण्यासाठी मुलींना केलं विवस्त्र
X

पुण्यात लोणी काळभोर येथील एका परीक्षा केंद्रावर कॉपीच्या संशयावरून विद्यार्थिनींचे चक्क कपडे उतरविण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, लोणी पोलिस ठाण्यात एमआयटी महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी शनिवारी पोलीस ठाण्यात पालकांनी व विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली होती.

काय आहे प्रकरण...

लोणी काळभोर येथील एम. आय. टी ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीची परीक्षा सुरू आहे. गुरुवारी 'ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स'चा पेपर होता. पेपर सुरू होण्यापूर्वी साडेदहा वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींची कॉपीच्या संशयाहून तपासणी करण्याला सुरुवात केली. 'प्रत्येक विद्यार्थिनीला वेगळ्या खोलीत नेऊन महिला शिपायांद्वारे कपड्यात कॉपी आहे की नाही, याची तपासणी करण्यात येत होती. यातील काही विद्यार्थ्यांनींची मासिक पाळी सुरू असतानाही त्यांना पायजमा काढून तपासण्यात करण्यात येत होते. अशा प्रकारे तपासणे चुकीचे आहे, असे सांगून या विद्यार्थिनींनी विरोध केला. मात्र, कर्मचाऱ्यांकडून त्यांना परीक्षेला बसू देणार नाही, असा दम दिला. त्यामुळे नाइलाजाने विद्यार्थीनींनी तपासणी करू दिली.

बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून म्हणजे २१ फेब्रुवारीपासून प्रत्येक पेपरच्या वेळी देखील असाच प्रकार घडल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. संबंधित विद्यार्थिनी या पृथ्वीराज कपूर कनिष्ठ महाविद्यालयाच्या आहेत. पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनींनी झालेला प्रकार घरी आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पालकांनी प्राचार्याची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी एमआयटी कॉलेजच्या प्राचार्य वीरेंद्र बावीस्कर यांना भेटण्यास सांगितले.'दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सुट्टी असूनही अनेक पालकांनी त्यांची भेट घेतली. असा प्रकार झाला नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले. उलट महाविद्यालयाच्या आवारात येऊन ऐन परीक्षेच्या काळात गोंधळ घालत आहात म्हणून गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर २५ पेक्षा जास्त पालकांनी लोणी पोलीस स्टेशनची धाव घेतली,' असे तक्रारदारांनी सांगितसे. दहा पालकांच्या तक्रारीनुसार लोणी पोलिसांनी एमआयटी कॉलेजच्या प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

''लोणी काळभोरच्या परीक्षा केंद्रावर झालेल्या प्रकाराची तक्रार मंडळाला मिळाली आहे. याबाबत चौकशी समिती नेमून ती परीक्षा केंद्रावर तातडीने पाठविण्यात आली आहे. समितीचे सदस्य विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालय प्रशासनाशी बोलून अहवाल मंडळाकडे सादर करेल.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी (४ मार्च२०१८) संबंधित विद्यार्थींनीना भेट दिली. यावेळी हा प्रकार अतिशय लज्जास्पद असून या सर्व घटनेचा निषेध करत विद्यार्थींनीसोबत घडलेला प्रकार अयोग्य आहे. कॉपी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची झडती घ्यावी, पण अशा प्रकाराची दखल गांभीर्याने घेण्यात यावी असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन जारी करत संबधित कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या काळात तात्काळ महिला पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. या घटनेतील संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करण्यात यावे. तसेच अशा प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्या संस्थाचालकांवर ही कठोर कारवाई करण्यात यावी. संस्थेचे परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी आणि उच्चतरीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Updated : 4 March 2018 3:16 PM GMT
Next Story
Share it
Top