...आणि तिला मासिक पाळी आली !
X
एव्हर ग्रीन स्टार -अभिनेता अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर सध्या चर्चेत आहे. एप्रिलमध्ये तिच्या बहिणीच्या निर्मितीमधील सिनेमा 'वीरे - दी - वेडिंग' रिलीज होईल. पण सध्या सोनम अक्षय कुमार समवेत 'पॅडमॅन' सिनेमात एका मुख्य भूमिकेत असल्याने विशेष चर्चेत आहे. . सोनम आणि अक्षय कुमारने 'पॅडमॅन' हा सिनेमा करण्यापूर्वी २ सिनेमे एकत्र केले होते. सोनमशी झालेल्या ह्या दिलखुलास गप्पा -गोष्टीत सोनमने आपल्या भावना, जुन्या आठवणी यांना उजाळा दिला... सोनमला १५ वर्षे उलटली तरी मासिक पाळी आली नव्हती, आणि तिच्या समवयीन मैत्रिणींना पीरियड्स सुरु झाले होते. मम्मी, मला अजून पीरियड्स का सुरु झाले नाहीत? असे ती आईला विचारू लागली तेंव्हा, प्रत्येक स्त्रीच्या शरीरातले हार्मोन्स वेगळे असतात, त्यामुळे तू काळजी करू नकोस, असा सल्ला आईने तिला दिला! .. '
'अक्षय कुमारची निर्मिती असलेला 'पॅडमॅन' सिनेमा येत्या ९ फेब्रुवारीला रिलीज होतोय. आर बाल्की दिग्दर्शित ह्या सिनेमाची कथा ट्वींकल खन्नाने लिहिलेल्या पुस्तकावरून घेतली असून ‘लीजण्डस ऑफ लक्ष्मीप्रसाद' असे त्याचे नाव आहे. अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
‘सोनम, हा सिनेमा तू साइन करण्याचे कारण काय ? राधिका आपटेने अक्षयच्या पत्नीची भूमिका केलीये..‘
सोनम - 'अक्षयच्या सहकारी मैत्रिणीची भूमिका मी ह्यात साकारली आहे. मी 'पॅडमॅन' का स्वीकारला याची अनेक कारणं आहेत. एक तर लक्ष्मी प्रसाद ह्या तामिळनाडूमधील गृहस्थाचे हे चरित्र आहे, अर्थातच हा सिनेमा 'बायोपिक' आहे. ही लव्हस्टोरी आहे.. फिल्मी रोमान्स आपण सगळेच बॉलिवूडच्या माध्यमातून अनेकदा पाहत असतो, पण आपल्या साध्या - घरगुती पत्नीवर नितांत प्रेम करत तिच्यासाठी सॅनिटरी पॅड्स बनवणारे मशीन बनवून तिच्या आरोग्याची अतोनात काळजी वाहणारा हा लक्ष्मीप्रसाद माझ्या हृदयाला स्पर्शून गेला. . खऱ्या - खुऱ्या पती - पत्नीच्या आयुष्यातील ही सच्ची प्रेमकहाणी मला खूप आवडली. सिनेमातील नायक अक्षय कुमार आपल्या पत्नीसाठी सॅनिटरी पॅड्स स्वतः बनवतो आणि तिला सहकार्य करतो. ह्या सिनेमाचे दिग्दर्शक आर बाल्की आहेत. त्यांच्यासोबत मला सिनेमा करायचा होता. अक्षयची सहकारी असा माझा रोल आहे.. आजही फक्त १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी पॅड्स वापरतात, उर्वरित स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीदरम्यान राख, माती, पाला -पाचोळा, अस्वच्छ फडकी असं काहीही वापरतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात जंतू संसर्ग होतो! त्या अनेक आजारांना बळी पडतात..!
‘पॅडमॅन' टीमचे हे आवाहन आहे - सॅनिटरी पॅड्स महाग आहेत, जे खेड्यात सहजा - सहजी उपलब्ध होत नाहीत... स्त्रियांना त्यांच्यासाठी अत्यावश्यक असणारे सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून द्यावेत. सामाजिक बांधिलकी हा विषय ह्या सिनेमाचा मुख्य गाभा असल्याने देखील मी सिनेमा केला.'
‘सोनम, तुला पिरियड्स आलेत तेंव्हा तुमच्या घरी काय वातावरण होते?'
सोनम - 'मला चांगलं आठवतंय - मी १५ वर्षांची झाले तरी मला पीरियड्स सुरु झाले नव्हते, माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांना पीरियड्स सुरु झाले होते, त्या आपसांत चर्चा करायच्या - कुठले पॅड्स त्या वापरतात, ते त्यांच्या डेट्स कुठल्या आहेत.. अशा कुठल्याही तत्सम चर्चांमध्ये मी भाग घेऊ शकत नसे, हेच माझे शल्य होते !! मी माझ्या आईला विचारून हैराण केलं, 'मेरे पीरियड्स कब आएंगे? उनके तो १२-१३ की उम्र में शुरू हो चुके है, मैं १५ की हो गयी हूँ !'
माझ्या आईने मला तेंव्हा समजावून सांगितलं, महिलांच्या शरीरातले हार्मोन्स वेगळे असतात, हार्मोन्स, कॅलरीज, अनुवंशिकता अशा बऱ्याच बाबींवर हे पीरियड्स अवलंबून असतात.. माझी उंची १५ वर्षांपर्यंत फक्त ५- १ होती... माझी मासिक पाळी सुरु झाली आणि माझा जीव भांड्यात पडला, आता मैत्रिणींच्या कुजबूजीत मलाही भाग घेता येणार होता..
माझ्या घरी अतिशय प्रोगेसिव्ह वातावरण होतं, आमच्या घरच्या डायनिंग टेबलावर आम्ही सगळे एकत्र आलो की खाणे आणि प्रत्येकाचा दिवसाचा वृत्तांत ह्यावर मनमोकळे बोलणे आमच्या दिनचर्येचा भाग आहे.. मला एकदाचे पीरियड्स सुरु झालेत, ह्यावर देखील घरी बोलणे झाले. माझ्या मैत्रिणींकडून मी नेहमी ऐकत असे, त्यांना पीरियड्स सुरु झालेत की त्यांची किचनमध्ये एंट्री बंद होत असे. त्यांनी घरातील लोणचे, पापड अशा सामग्रीला स्पर्श करणे, ह्या वस्तूंच्या जवळ जाणे पूर्ण निषिद्ध असे! इतकंच काय, घरी सणावाराला, पूजा होमहवन असल्यास ह्या सख्यांना घरापासून दूर पाठवण्यात येई! एकविसाव्या शतकातही इतके बुरसटलेले विचार त्यांचे पालक बाळगत होते, आणि तेही मुंबईत ! !
पण, आमच्या घरी असले प्रकार कधीही घडले नाहीत... विटाळ म्हणजे टॅबू असं कधीही मानलं गेलं नाही.. त्या 'चार दिवसांत' आम्हांला कधी तुच्छ मानलं गेलं नाही..
इतकंच काय, मुलगा -मुलगी ह्यांच्यात कधी फरक केला नाही.. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव कधीही केला गेला नाही. मला दर महिन्याला ५०० रुपये पॉकेट मनी मिळत असे आणि इतकाच पॉकेटमनी रिया (बहीण) आणि हर्ष(वर्धन -भाऊ)ला मिळत असे.. मी घरात मोठी असल्याने मला मोठी झाल्यावर मला स्वतंत्र रूम मिळाली, पण शेयरिंग करावी लागली त्यापूर्वी. त्यामुळे मला माझ्या आई - वडिलांचा अभिमान वाटतोय ‘
'तुझं कार्यक्षेत्र असलेल्या बॉलिवूडमध्ये कधी महिला आणि पुरुष कलाकारांमध्ये भेदभाव होत असल्याची भावना तुला जाणवली का ?'
सोनम - 'संजय लीला भन्साली मेरे पापा के दोस्त है, त्यांच्याकडे, त्यांच्या टीममध्ये सहाय्यक म्हणून मी काम करू लागले. आणि भन्साली यांनी त्यांनतर मला ‘सांवरिया' सिनेमात ब्रेक दिला. . माझा पहिला सिनेमा अयशस्वी ठरला तरी बॉलिवूडने मला पुढे काम करण्याची संधी दिली हे पाहून माझं समाधान झालं, पण हे समाधान फार काळ तग धरू शकलं नाही, कारण मी समजत होते, इथे बॉलिवूडमध्ये सगळ्यांना सरसकट एकसारखी वागणूक मिळत असेल.. पण तसं नाहीये.. मला खूप आश्चर्य वाटले, जेंव्हा मला असे सांगण्यात आले, ही मोठी आणि पॉश मेकअप रूम मला मिळणार नाही, ती फिल्मच्या हिरोसाठी 'राखीव' आहे ! लहान मेकअपरूम माझ्यासाठी आहे… दुसरे असं की, मानधन देखील सगळ्याच नायिकांना हिरोंपेक्षा कमी मिळते ! त्याला मी अपवाद नाही.. अर्थात एके काळी श्रीदेवी (माझी सध्याची काकी ), हेमामालिनी वगैरे नायिकांनी त्याकाळातील नायकापॆक्षा अधिक मानधन घेतलेले आहे. आता मात्र, हिरोपेक्षा हिरॉईनला मानधन कमी मिळण्याचा ट्रेंड आहे! म्हणजे आपली प्रगती झालीये का अधोगती?'
‘ असो, सोनम - तू ‘पॅडमॅन' सिनेमासाठी तबला वाजवायला शिकलीस, असे कानांवर आलंय...
सोनम - ' 'पॅडमॅन ' मध्ये मी तबला वाजवतेय, असा सीन होता, त्यासाठी मी दोन महिने ट्रेनिंग घेतलं.. पण 'नीरजा' सिनेमासाठी मी एअर होस्टेसचे ट्रेनिंग पूर्ण घेतलं होतं.. लहान असतांना कत्थक शिकले होते.. पण आता त्यातील काहीच लक्षात नाहीये. तबला वाजवण्याचा रियाझ जर पूर्ण चालू ठेवला नाही, तर तबला मी वाजवू शकणार नाही.. हे ट्रेनिंग तात्पुरते असते'
'सध्या तुझ्या लग्नाच्या बातम्या सर्वत्र आहेत .. २०१८ मध्ये तू विवाहबद्ध होण्याचा निर्णय नक्की केलास का ?’
सोनम - 'माझे लग्न जेंव्हा होईल तेंव्हा ते होईलच, पण अजूनही नक्की काही ठरले नाही. कारकिर्दीच्या एका टप्प्यावर बहुतेक अभिनेत्री लग्न करतात, पण मीडियाने वारंवार त्यांना त्या लग्न कधी करणार असा प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडू नये, असं मला प्रकर्षाने वाटतंय .
'सोनम कपूर म्हणजे 'फॅशनीस्टा' अशी तुझी इमेज आहे .. फॅशनेबल ह्या इमेजमुळे तुझ्यातील अभिनेत्री झाकोळली जातेय असं तुला कधी वाटलं का ?’
सोनम कपूर - 'माझी धाकटी बहीण रिया कपूर माझी फॅशन कन्सल्टन्ट आहे, माझ्या फॅशन आयकॉन इमेजचे श्रेय रियालाच जातं.. मला कधीही असं वाटलं नाही की माझ्या फॅशन आयकॉन इमेजने माझ्यातील अभिनेत्री दूर झालीये किंवा फॅशन इमेज माझ्यातील अभिनयावर हावी होतेय ! ''सावरिया , रांझणा ' आयेशा , नीरजा ' अशा सिनेमांतून माझ्यातील अभिनयाची चुणूक नजरेसमोर आलीच, हे काही कमी नाही ! '
'२००७ मध्ये तुझा पहिला सिनेमा 'सावरिया' रिलीज झाला होता, तुझ्या फिल्म करियरला १० वर्षे पूर्ण झालीत. हा प्रवास कसा झाला ?'
सोनम - 'उत्कृष्ट ! माझा व्यक्तिगत विकास ह्या अभिनय प्रवासात झाला, मी समाधानी आहे. एक माणूस म्हणूनही मी घडत गेले, ते मला जास्त महत्वाचे वाटत. माझ्या समवयीन -समकालीन अनेक अभिनेत्री आजूबाजूला आहेत, पण तरीही सोनम कपूर त्यांच्यामध्ये तिचं स्थान टिकवून आहे.. अनिल कपूरची मुलगी म्हणून फक्त माझी ओळख नाही, हे देखील माझं यशच आहे. '
पूजा सामंत