Home > मॅक्स ब्लॉग्ज > कुठे कमी पडलो आपण?

कुठे कमी पडलो आपण?

कुठे कमी पडलो आपण?
X

गेली कित्येक वर्ष आपण महिला दिन साजरा करतो. महिलांना सन्मान मिळावा, स्त्री –पुरुष समानता याची आठवण करुन देण्याचा हा दिवस. आज आपण २१ व्या शतकात आहोत. पण, खरचं तेवढी परिस्थिती बदललीय का? महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी झाली तेव्हा किती पुरुषी मानसिकतेनं त्याचा विरोध केला हे आपण पाहीलं आहे. तेव्हाची आणि आताची परिस्थिती खरचं बदललीय का? बऱ्याच अस्वस्थ करणाऱ्या घटनांनी विचार करायला भाग पाडलंय. कुठे छेडछाड, लोकप्रतिनिधींना येणारे अश्लिल मेसेज. त्यावर कळस म्हणून सांगलीच्या म्हैसाळमध्ये स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाचा पर्दाफाश...कोवळ्या कळ्या गर्भातच खुडणाऱ्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला अटक. १८ पिशव्यांमध्ये पुरलेले स्त्री भ्रूण. ही घटना अंगावर काटा आणणारी. आजही मुलगा की मुलगी हे तपासावसं वाटतं. मुलगी असली तर तिला मारून टाकायचं. मुलगाच हवा ,वंशाचा दिवाच हवा ही समाजाची न बदललेली मानसिकता दुर्दैवी. गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात यावर कायद्यानं बंधनं असली तरी ती धाब्यावर बसवून आजही स्त्रीभ्रूण हत्या केल्या जातातच. त्याही ज्याला देवदूत समजलं जातं त्या डॉक्टरकडून... गर्भलिंग चाचणी करणारा गर्भपात करणारा डॉक्टर आपल्या दृष्टीनं दोषी. तो दोषी आहेच पण मुलगी आपल्यालाच नको असते म्हणून तर असे हैवान तयार होतात. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणाऱ्या महिला, एका यशस्वी पुरूषा मागे एक स्त्रीच असते, मुलांपेक्षा मुली कुठेही कमी नाही असं आपण सांगतो. पण स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकरणांनी मात्र आपण हारतो. हे थांबावं म्हणून कायदे केले, जनजागृती केली असं आपण ठासून सांगतो... पण स्त्रीभ्रूण हत्या थांबल्यात का ? कुठे कमी पडलो आपण? कायदे केले पण त्याचा वचक निर्माण केला का? जनजागृती मोहिम आपण किती आपलेपणानं केली? याचा विचार करावाच लागणार आहे.

  • निखिला म्हात्रे, असोसिएट एडिटर, टीव्ही नाईन मराठी

Updated : 7 March 2017 1:56 PM GMT
Next Story
Share it
Top