Home > मॅक्स वूमन > हिरव्या सालीच्या मूगडाळीचे ढोकळे

हिरव्या सालीच्या मूगडाळीचे ढोकळे

हिरव्या सालीच्या मूगडाळीचे ढोकळे
X

हिरव्या सालीच्या मूगडाळीचे ढोकळे

साहित्य : एक वाटी हिरव्या सालीची मुगाची डाळ, १-२ हिरव्या मिरच्या व मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, सहासात काळ्या मिऱ्यांची पूड, दोन टेबलस्पून तूप, फोडणीसाठी मोहरी, हिंग व कढिपत्ता.

कृती : हिरव्या सालीची मुगाची डाळ आदल्या रात्री भिजत घालावी. सकाळी ती पाण्यातून उपसून मिरच्या व मीठ घालून मिक्सरवर रवाळ वाटावी. वाटताना त्यात पाणी असू नये. वाटलेलं बॅटर १५ मिनिटे राहू द्यावं.

तोपर्यंत एका रुंद भांड्यात पाणी उकळून घ्यावं. वाटलेली डाळ चांगली फेटून घेऊन ती तूप लावलेल्या ताटामध्ये ओतावी. एकसमान थापून उकळत्या पाण्यावर वाफवायला ठेवावी. ढोकळा बनण्यासाठी १५-२० मिनिटे वाफवावं लागतं. नंतर ताट बाहेर काढून घेऊन थोडं थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात. मिरीपूड चिमटीने भुरभुरावी.

फोडणी : एका कढल्यात तूप गरम करून घेऊन त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर हिंग व कढीपत्त्याची ८-१० पाने घालून फोडणी करून घ्यावी. ताटातील ढोकळ्याच्या सर्व वड्यांवर ती एकसमान पसरावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खायला द्यावे. सोबत केचप, खोबर्‍याची चटणी किंवा चिंचेची चटणी देता येते.

तृप्ती गावंड

Updated : 6 Oct 2017 11:28 AM GMT
Next Story
Share it
Top