स्त्रीने ठरवले तर…

349

 

निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की सडते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातीसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था समाजातील रूढी परंपरा वर्षानुवर्ष  जशाच्या तशा आहे व आतल्या आत सडत आहे. काळ बदलला तसे संदर्भहीबदलले. या सर्वांमध्ये बदल करून बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुष वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे. एखादी घटना घडली तर तो अपघात समजून योनिशुचितेला महत्त्व न देता सहजपणे इतर दुर्घटनांप्रमाणे त्याकडे बघावे. अर्थात त्यासाठी मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. पण आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे. जी काही थोडीफार समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते, ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारीपुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही.  उलट अंत:करण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते.

आपल्या समाजातील परंपरागत धारणांमुळे पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष तरहोतोच पण त्यातून स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी असूया निर्माण झाली आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे व अंगच्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश मिळवत आहे ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटतो. मी पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असूयेने भरलेली व स्त्री-स्वातंत्र्याच्या संतापाने खदखदणारी अनेक विधाने ऐकली आहेत. या रोषाचे प्रकटीकरण पुरुषी वर्चस्व जिथे हमखास दाखविता येईल अशा बलात्कारात व स्त्रीवरील हिंसाचारात होते. यावरील उपायांची सुरुवात स्त्रीने स्वत:पासूनच करायला हवी. पुरुषांनी केलेल्या विविध अन्याय व अत्याचारांपुढे ती मान का तुकवते? मुलांना घडविण्याचे काम स्त्रियांच्या हातात असते. तिने ठरवले तर पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ती आपल्या कुटुंबात बदलू शकते. मात्र त्यासाठी स्वत:च्या मनातून ही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता पुसून टाकावयाला हवी. पुरुषी वर्चस्वाची सुरुवात अगदी नवरा बायको एकमेकांनानिवडतात तेथूनच होते. नोकरी करणारी स्त्री कायम घर आणि संसारही सांभाळते.  या परंपरेला छेद दिला तरच पुरुषी वर्चस्वाची मानसिकता बदलू शकेल. त्यासाठी संपूर्ण जीवनशैलीच बदलली पाहिजे.

स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवतांना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी वा घरातील कामे यात करू नये. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे, असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेचस्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना ‘तू बायल्या सारखा का वागतो? हातात बांगड्या भरल्या आहेस का? मुलीसारखा मळूमुळू काय रडतोस? ‘ अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे असे समजून एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये आठवडय़ातील काही तास मुलामुलींसाठी पाककलेचे दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्वविद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल.

सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई आदी अनेक विदुषींवरील परंपरा तोडण्यासाठी करण्यातआलेल्या प्रयत्नांवर झालेल्या जहरी टीका व मानसिक प्रहार हे पुरुषसत्ताक मानसिकतेचे विकृत स्वरूप सिद्ध करतात. हिच पद्धत थोडय़ाफार फरकाने आजही दिसून येते. हेच कर्तबगार स्त्रियांच्या चारित्र्यावर करण्यात येणाऱ्या टीकेवरून लक्षात येते. स्त्रीला उडण्यासाठी आकाश उपलब्ध करून दिलं गेलं तरी पक्षी म्हणून भरारी मारू देण्यापेक्षा पतंग बनवून त्याच्या दोऱ्या स्वत:च्या हातात ठेवण्याचा दुटप्पीपणा हे या पुरुषप्रधान समाजाचे वैशिष्टय़ जणू. नमूद करण्याची गोष्ट म्हणजे फक्त पुरुष हेच पुरुषप्रधान संस्कृतीचे घटक नसतात, तर या पुरुषप्रधान संस्कृतीला बळकट करणारा प्रत्येक घटक हा पुरुषप्रधानच असतो. म्हणूनच स्त्रियासुद्धा पुरुषप्रधान वृत्तीच्या असू शकतात. स्त्रियांचा लढा, त्यांचे प्रश्न याकडे केवळ स्त्रीवादी दृष्टिकोनातून न पाहता मानवतावादी दृष्टीने पाहिले तरच शोषण थांबून खरी समानता प्रस्थापित होईल.

आज मात्र कळप-समूह-समाज ही आजवरची कालसंक्रमणा विसरून उलट दिशेने भूक आणि वासना या आदिम प्रेरणेपर्यंत आपण प्रवास करतो आहोत, असे सद्यस्थितीवरून वाटते. बाहेरच्या रावणाची भीती घालून स्त्रीसाठी परंपरेच्या लक्ष्मण रेषा आखल्या गेल्या. मातृत्वाचे गोडवे व अन्नपूर्णेचे वरदान यांच्या अवाजवी महतीने तिला चूल व मूल यामध्येच आजन्म कैद केले. संसाराच्या गाभाऱ्यात एकदा प्रतिष्ठापना झाली की तिनेआयुष्यभर देवपण ‘सोसायचं’ हा दंडकच झाला. तिची देवता म्हणून पूजा करण्याऐवजी,माणूस म्हणून आदर केला तर तिच्या अस्तित्वाला खरा अर्थ येईल.

आपल्याकडे आदर्श पुरुष व आदर्श स्त्री यांच्या संकल्पना अगदी विरोधाभास दाखवणाऱ्याआहेत. ज्या पुरुषाकडे नेतृत्व कौशल्य आहे, आत्मविश्वास, धडाडी आहे तो आदर्श पुरुष व स्त्री मात्र खाली मान घालून जगणारी, वडीलधाऱ्यांचे ऐकणारी, कुटुंबासाठी खपणारी ती आदर्श. खरं तर स्त्रिया या पुरुषांची प्रेरणा ठरतात, जेणेकरून त्यांना जग जिंकायला स्फुरण मिळते. स्त्रीला स्वातंत्र्य हवे ते नेमके कोणापासून? पिता, पती, संसार की समाज?म्हणजेच स्त्रियांनी स्वत:च्या स्वातंत्र्याच्या अपेक्षांची निश्चिती करायला हवी. समाजाच्या मानसिकतेत बदल महत्त्वाचा आहे. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण मानलेली अथवा जाणलेली समानता प्रत्यक्षात येणे अवघड आहे. समानता म्हणजे दोघांनी एकमेकांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करणे व निर्भेळसहजीवन अनुभवणे. प्रत्येक स्त्री व पुरुषाने असे करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.

जगदीश काबरे