Home > मॅक्स वूमन > पस्तिशीतल्या 'ती'च काय चाललंय?

पस्तिशीतल्या 'ती'च काय चाललंय?

पस्तिशीतल्या तीच काय चाललंय?
X

गेल्या वीस पंचवीस वर्षात जग खूप वेगानं बदलेलं आहे. डिजिटल तंत्रज्ञानानं हा वेग आलाय. तो वेग अजून तसाच आहे. तो मंदावणार नाहीच. पंचवीस वर्षांपूर्वी पस्तिशीत, चाळीशीत असलेल्या स्त्रिया आता प्रौढ झाल्या आहेत. मधल्या काळात जसे भौतिक जग बदलं तसं स्त्रियांचं, विशेषतः आताच्या पस्तिशीतल्या स्त्रियांचं जग त्यांच्या अपेक्षेनुसार बदलले आहे का याचा थोडक्यात विचार इथे करायचा प्रयत्न करतेय.

साधारणपणे पस्तीशी आली की स्त्रियांच्या आयुष्याला स्थैर्य येऊ लागते. शहरी/ग्रामीण, सुशिक्षित/अशिक्षित, नोकरीवाली/गृहिणी अशा कोणत्याही भूमिकेतली स्त्री असली तरीही, या वयापर्यंत, तिचे लग्न होऊन, तिला १-२ मुलेही झालेली असतात. तिच्या माहेरहून येऊन आता ती सासरच्या घरी चांगलीच स्थिरावलेली असते. तिचा जम बसलेला असतो. परंपरावादी समाजाच्या दृष्टीनं असलेलं मुलीच्या जन्माचं कर्तव्य म्हणजे वेळेवर लग्न करणं, मुलं होणे, सर्वांची सेवा नीट करणे इत्यादी करून झालेले असतं. आता एकच जबाबदारी शिल्लक राहिलेली असते आणि ती म्हणजे मुलांना वाढवणे....आता या टप्प्यावर स्त्रिया स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लागतात.

कळत्या वयापासून आत्तापर्यंतचे आयुष्य खूप वेगानं निघून गेलेलं असते. चालू असलेलं शिक्षण आणि कौटुंबिक कारणांमुळे हे घडते. त्यातच बाराव्या तेराव्या वर्षी मासिक पाळीचं नवं वादळ सुरु झालेलं असतं. त्याची सवय होईपर्यंत शिक्षण पूर्ण होतं आणि लग्न नावाच्या नव्या वादळाची तयारी घरात सुरु झालेली असते. अशा वादळी आणि वेगवान घडामोडींमुळे मुलींना स्वतःबद्दल शांतपणे विचार करायला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे बहुतांश मुली स्वतःच्या आयुष्याशी संबंधित निर्णय घेण्यासाठी संपूर्ण तयार होण्यापूर्वीच घरातील इतरांनी त्यांच्याबद्दलचे निर्णय घेऊन टाकलेले असतात. सगळं वेळच्यावेळी आणि विना संकट [निर्विघ्न] पार पडायला हवं या बद्दल समाजाचं आणि कुटुंबाचं दडपण असतं. हे बरोबर आहे की चूक, यात काय दुरुस्ती व्हायला हवी, याचा विचार करण्याइतकी प्रगल्भता आणि वेळसुद्धा कुमारवयात नसतो. थेट लग्न होऊन मुलाबाळांना ५-६ वर्षाच्या टप्प्यात नेऊन सोडल्यावर स्त्रियांना स्वतःबद्दल विचार करायला उसंत मिळते. मग आत्तापर्यंतच्या वाटचालीचा धांडोळा सुरु होतो. त्यावेळी काही ठळक गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. बरोबरीची मुलं आणि काही मुलीही चांगल्या नोकऱ्या/व्यवसाय करून कमावते झालेले दिसत असतात, ते त्यांच्या कामात सीनिअर झालेले असतात. तसंच त्यांच्या नावावर स्वतंत्र बँक खाते असून त्यात त्यांची स्वतःच्या मालकीची भरपूर रक्कम शिल्लक आहे हेही दिसते. स्वावलंबी असल्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास दिसतो, आणि व्यवहारी जगातला शहाणपणा, अनुभव त्यांच्या व्यक्तीमत्वातून डोकावत असतो. मग त्याची मनातल्यामनात तुलना सुरु होते. आपण त्यांच्या बरोबरीनं शिकलेल्या असूनही चूल आणि मूल यापलीकडे गेलेलो नाहीत, प्रत्येकवेळी आपल्याबद्दल किंवा इतरांबद्दलही निर्णय आपण सोडून बाकीचे घेतात, हे गृहिणी असलेल्या मुलींना जाणवायला लागतं.

इथे अजून एक लक्षात घ्यायला हवे की त्याच वयाच्या कमावत्या मुलींची स्थिती तशी यापेक्षा फारशी वेगळी दिसणार नाही. कारण, जरी त्या कमावत्या असल्या, तरी पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वावलंबी असतीलच याची शक्यता कमी असते. त्यांचे काही निर्णय त्या आपले आपण घेऊ शकत असतील तरी महत्त्वाचे बहुतेक निर्णय घेताना त्या इतरांवर अवलंबून राहतात, कारण याबद्दलचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झालेला नसतो, समाजव्यवस्था तसं होऊ देत नाही. परंतु विकासाच्या टप्प्यावर त्या, गृहिणी असलेल्या मुलींपेक्षा चार पावलं पुढे असतात हेही खरंय.

ज्या मुली चांगलं शिक्षण घेऊ शकलेल्या आहेत, त्या या पस्तिशीच्या टप्प्यावर एखादी पार्टटाईम का होईना नोकरी करू पाहतात. किंवा घरी राहूनच एखादा छोटासा व्यवसाय करू पाहतात. त्यासाठी लागणारं ट्रेनिंग, एखादा कोर्स करून त्या घराबाहेरच्या नव्या जगात प्रवेश करू पाहतात. वीस वर्षांपूर्वीची स्त्रियांची परिस्थिती वेगळी होती. तेंव्हा, एकदा लग्न होऊन पस्तीशी गाठली कि नव्याने काही शिकण्याची आणि नोकरी/व्यवसाय सुरु करण्याची शक्यता फार कमी होती. त्यापेक्षा आजची परिस्थिती सुधारलेली आहे. तशी सामाजिक संमती, कौटुंबिक पाठबळ आणि प्रशिक्षणाची, बँकांची सोय, सवलती, उपलब्धी, पूर्वीपेक्षा नक्कीच सुधारल्याने, पस्तीशी-चाळीशीत स्त्रियांना हे नवे वळण घेणे शक्य होतेय. तरीही, आधीपासून नोकरी करणारी असो, नव्याने पस्तिशीत नोकरी करणारी असो, त्यांच्या नोकरीचे स्वरूप बरेचसे मुद्दाम साधे ठेवले जाते. म्हणजे, घर सोडून नव्या ठिकाणी जावे लागू नये, म्हणून, प्रमोशन नाकारणे, ट्रेनिंग शक्यतो टाळणे यामुळे बरोबरीच्या पुरुषांपेक्षा त्या मागे राहतात. अश्या प्रकारे त्यांचं एक पाय अजूनही घरातच घट्ट बांधला गेलाय.

अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे स्त्रियांच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि विमा असणे याचे प्रमाण अजूनही खूप कमी आहे. कमावत्या स्त्रियांच्याही नावावर घर, जमीन असणे फारसे दिसत नाही.. पूर्वीपेक्षा याचे प्रमाण वाढलेले आहे एव्हढेच..

स्वतः आणि आपले कुटुंब स्थिर होईपर्यंत स्त्रियांचे आरोग्य पार बिघडून गेलेलं दिसतंय. कामाच्या अति ताणामुळे पुरेशी झोप मिळत नाही, खाण्यावर लक्ष नाही, बदलेल्या जीवनशैलीमुळे वाढलेले भावनिक आणि मानसिक ताण, व्यायामाला वेळ मिळत नाही, व त्यासाठी पुरेशा सोयीही नाहीत. मात्र मनोरंजनासाठी टीव्ही, इंटरनेट, यांचा सुळसुळाट असा विरोधाभास दिसतो. याशिवाय परदेशी अन्नपदार्थ [तेल, स्वयंपाकाच्या वस्तू इत्यादी] याचे विनाकारण स्टेटस सिम्बॉल बनलेय, असे सगळे चित्र दिसते. स्त्रियांनी सुंदरच दिसायला हवे, ( सुदृढ नाही), या मानसिकतेतून अजूनही आजच्या पस्तिशीतल्या स्त्रिया सुटल्या नाहीत. त्यामुळे, निरोगी राहण्यावर खर्च होण्यापेक्षा सौंदर्य प्रसाधनं जास्त वापरण्याकडे कल दिसतो. अर्थात सध्याच्या सामाजिक वातावरणाचाच हा परिणाम जास्त आहे. त्यातच आजच्या स्त्रियाही आल्याच. म्हणजे, केलेल्या श्रमाचा मोबदला पूर्वीपेक्षा जास्त मिळत आहे, तसंच, लोकांची मिळकतही वाढते आहे, म्हणून “होऊ दे खर्च, पण सगळे झटपट मिळायला हवे” अशी मानसिकता सार्वत्रिक झालीय. त्यातच इंटरनेटच्या मायाजालात आरोग्याबद्दल इतकी माहिती उपलब्ध आहे की त्यातली कोणती माहिती बरोबर आहे की चूक हे समजून न घेता घरबसल्या सेल्फ मेडिकेशन [वजन कमी करणे आणि गोरे दिसण्यासाठीची औषधं, यांचं आक्रमक मार्केटिंग आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सहज उपलब्धता] आणि त्यातून येणाऱ्या नव्या अडचणी यांचा सामना या स्त्रिया करताहेत.

मनोरंजनाच्या बाबतीत आत्ताच्या स्त्रियांना पूर्वीपेक्षा जास्त प्रकार उपलब्ध आहेत. हातात स्मार्टफोन, टीव्हीची अनेक चॅनल्स, डिजिटल गाणी, सिनेमा थिएटर्स, इंटरनेटवरची सर्व माहिती, त्यांच्या हातात आहे. एकीकडे बाहेरच्या जगाशी थेट जोडले जाण्याची संधी, परंतु त्याचवेळी त्यांच्या या सर्व हालचालींवर घरातल्या पुरुषांची करडी नजर असं काहीतरी विचित्र चित्र दिसतं. [मालक] असलेल्या पुरुषांच्या परवानगीनेच आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच घरातल्या स्त्रियांना इन्टरनेटचा वापर करायला देणं याला स्वातंत्र्य म्हणता येईल का?

स्त्रियांबाबतच्या हिंसाचारात, कौटुंबिक अत्याचारात वाढ झालीय हेही या आधुनिक जगाला शोभणारं नाही. अन्यायाविरुद्ध दाद मागण्यात वाढ झालीय यामुळेही अत्याचाराच्या नोंदी वाढलेल्या असू शकतात. परंतु, एकंदरीतच स्त्रियांसाठी सुरक्षित जग अजून निर्माण झालेले नाही हेही तितकेच खरे!! शिक्षणापर्यंत, आरोग्य सेवेपर्यंत आणि कायद्यापर्यंत पोहोचणे अजूनही स्त्रियांसाठी अवघड आहे.

शिक्षणाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे, एकंदरीतच लोकांचं उत्पन्न वाढत असल्यामुळे आणि तंत्रज्ञानाचा वेगानं प्रसार झाल्यामुळे सर्वच समाजाच्या जीवनशैलीत, विचारसरणीत खूप बदल झालाय, यात स्त्रियाही आल्याच. परंतु, या समृद्धीसोबतच समंजसपणा आणि समानताही रुजायला हवी होती. स्त्रियांचे नोकरी/व्यवसायामुळे वाढलेले उत्पन्न, चांगले शिक्षण, नवनव्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर, ‘स्व’ची वाढलेली जाणीव, त्यांच्या आकांक्षांना फुटलेले धुमारे, समानतेसाठी त्यांची चाललेली धडपड ओळखायला हवी. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःची काळजी न करता, कष्टाची पर्वा न करता सध्याच्या स्त्रिया ज्या जीवनशैलीला सामोऱ्या जात आहेत ती जीवनशैली काळजी करायला लावणारी आहे. या स्त्रियांच्या कामाचा बोजा तर कमी झालेला नाहीय. पण जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. घराच्या सर्व जबाबदाऱ्या, कामे अजूनही त्यांच्यावरच जास्त आहेत. याशिवाय बाहेरची कामे, अर्थार्जनाची जबाबदारी याचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर पडतोय. बदलत्या जीवनशैलीत स्त्रिया बदलताहेत, पण पुरुषांची मानसिकता मात्र तशीच जुनाट आहे. यामुळे भरारी घेऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत असली तरी त्यांना समजून घेऊन सोबत करणारे पुरुष आणि एकंदरीत समाजव्यवस्था तेव्हढी विकसित झालेली नाहीय. याचा खूप भावनिक आणि मानसिक ताण या नव्या जगातल्या स्त्रियांवर पडतोय. त्याच्या अनेक खुणा आपल्याला आजूबाजूला दिसतील.

स्त्रियांच्या खरेदीबद्दल खूप चेष्टा केली जाते. त्याचबरोबर लट्ठपणा, सौंदर्य प्रसाधनांचा प्रचंड खप, आधुनिकपण आणि स्मार्टपणा दाखवण्यासाठीची धडपड या बाह्य गोष्टींमध्ये दडलेले त्यांच्यावरचे प्रचंड मानसिक दडपण ओळखायला हवे. या बदलत्या जगात स्त्रिया स्वतःला समानतेच्या पातळीवर सिद्ध करू पाहत आहेत, पण ज्याला जोडीदार म्हणतात त्याच्यात याबद्दल कसलाच बदल दिसत नाही. गेल्या वीस-तीस वर्षात स्त्रियांचे खूप प्रबोधन झाले, आता पुरुषांचे प्रबोधन तातडीने हातात घ्यायला हवे. नाहीतर, गर्भात मारून टाकलेल्या स्त्रियांबरोबरच पस्तिशीतल्या स्त्रियाही अति ताणामुळे, मधुमेहाने, हृदयविकाराने मारल्या जातील...जात आहेत. याचा दोष कुणावर?

डॉ. स्मिता शहापूरकर, उस्मानाबाद.

Email ID. [email protected],

Contact:+919422069705.

Updated : 25 Jan 2017 9:58 AM GMT
Next Story
Share it
Top