...म्हणून मी अविवाहीत राहीले – आशा पारेख
X
प्रख्यात हिंदी चित्रपट अभिनेत्री पदमश्री आशा पारेख यांचे चरित्रात्मक पुस्तक 'हिट गर्ल' नुकतच १० एप्रिलला मुंबईत प्रकाशित झालं. अभिनेता सलमान खाननं त्याचं अनावरण केलं. 'हिट गर्ल' या पुस्तकाचे शब्दांकन ज्येष्ठ लेखक-पत्रकार खालिद मोहमद यांनी केलंय. हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच आशा पारेख यांच्या जुहू येथील ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये आशा पारेख यांच्याशी गप्पागोष्टी रंगल्या. त्या गप्पागोष्टीमधील हा काही ठळक मजकूर मुलाखत रुपात आपल्यासमोर मांडत आहेत मनोरंजनविश्वातील पत्रकार पुजा सामंत !
समोर पसरलेला अथांग समुद्र, चमचमणारी वाळू, किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या लाटा, सूर्यास्त होण्यापूर्वीचे सूर्य किरण... मनात अनेक प्रश्नाचे काहूर... समोर शांत आणि अतिशय धीरोदत्त रुपेरी पडद्यावरची 'हिट गर्ल' असे विशेषण लाभलेली आशा पारेख! आणि तिच्या देखण्या फ्लॅटमधून समोर दिसणारे हे विलोभनीय दृश्य...
वयाची पंचाहत्तरी जवळ आलेली असली तरी अदब, आब, ग्लॅमर आणि नज़ाकत यांचं मिश्रण अजूनही ढळलेले नाही हे जाणवून देणारी अभिनेत्री आशा पारेख. कदाचित सध्या विशीत असलेल्या पिढीला ठाऊक ही नसेल, पण १९५९ ते १९७३ पर्यंत अभिनय - नृत्य -अदा -आणि तरीही सोज्वळ प्रतिमा असलेली आशा पारेख या अभिनेत्रीने तिच्या पन्नास वर्षांच्या रुपेरी कारकिर्दीत अनेक चित्रपट केलेत. बहुतांशी यशस्वी ठरलेत. म्हणूनच तिच्या समकालीन अभिनेत्री - साधना, नंदा, वहिदा, माला सिन्हा यांच्या पेक्षा तिची कारकीर्द गाजली. तिचं बॉक्स ऑफिसवरचं यश निर्विवाद होतं. म्हणून खालिद मोहम्मदने तिच्या पुस्तकाला 'हिट गर्ल' असं समर्पक शीर्षक दिले.
आशा जी, ५० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीनंतर पुस्तक लिहावं असं का वाटलं?
आशा पारेख - खालिद जेष्ठ्य पत्रकार आहे, अनेक पुरस्कार समारोहानंतर त्याच्याशी भेट व्हायची. आणि त्याचा सदैव आग्रह होता की मी माझ्या आठवणी- कारकीर्द यावर पुस्तक लिहावं. मी निवृत्त जीवन जगत असतांनाही त्याचा आग्रह संपला नाही. सामाजिक बांधिलकी जपण्याचे मी जे काही प्रयत्न केलेत, तेही सध्याच्या आणि पुढील पिढीसमोर यावेत या त्याच्या अंतिम अस्त्रापुढे मी होकार दिला. आणि अवघ्या ६ महिन्यात त्याने हे पुस्तक लिहून काढले. हे आत्मचरित्र नाही, कारण माझ्या ७४ वर्षांच्या जीवनात काही कटू प्रसंग घडले, काही आठवणी नकोशा असतात, त्या मनाच्या तळघरात कायमच्या बंदीस्त असाव्यात, जेणेकरून पुस्तकाच्या माध्यमातून त्या व्यक्ती किंवा आठवणी यांचे चर्विताचर्वण होऊ नये. कुणी जाणते-अजाणतेपणी दुखावले जाऊ नये इतकीच प्रामाणिक इच्छा! म्हणून हे चरित्रात्मक पुस्तक काढावे असं ठरवलं. हल्लीच्या काळातील नावाजलेल्या स्टारकडून प्रस्तावना लिहून घ्यावी. झालंच तर त्यानेच पुस्तक प्रकाशित करावं या प्रकाशकांच्या मताला मीही दुजोरा दिला. लेखक सलीम खान आणि हेलन यांच्याशी घरोब्याचे स्नेह संबंध असल्याने सलमान खानने 'फोर वर्ड्स' लिहिलेत आणि पुस्तकाचे अनावरण देखील त्यानंच केलंय. याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात आमिर खान या पुस्तकाचे अनावरण दिल्लीत करेल.
पुस्तकाची ठळक वैशिष्टय कोणती?
आशा - पुस्तकात अनेक दुर्मिळ छायाचित्रं आहेत. सुलोचनादीदी ते आशा भोसले आणि वहिदा ते नंदा-नूतन... मजकूर आहेच. माझ्या जीवनातील चढ -उतार, पुरस्कार, थोडक्यात बालपण, माझे सामाजिक कार्य अशा मुद्द्यांवर हे पुस्तक आहे.
बावन्न वर्षांची रुपेरी कारकीर्द घडली, मागे वळून बघतांना कोणत्या भावना आहेत?
आशा - मी कृतार्थ-कृतकृत्य आहे, अतिशय समाधानी आहे. जी काही कारकीर्द घडली त्यात मी संतुष्ट आहे. पुन्हा कैमेऱ्यासमोर येण्यात मला काही स्वारस्य नाही! मला आता 'गुळमुळीत' आईच्या भूमिका करायच्या नाहीत. वयाच्या १७ व्या वर्षी माझा पहिला सुपर हिट चित्रपट प्रदर्शित झाला. त्याहीपूर्वी मी क्लासिकल डान्सर म्हणून घडत होतेच. आयुष्याची इतकी वर्षे काम करत राहिलेय, आता त्यात मन गुंतून राहिलेले नाही. माझ्या वाटेला आलेल्या भूमिका मी समरसून केल्या. काही भूमिकांना पुरस्कार मिळाले. काही व्यक्तिरेखांची दखल घेतली गेली. पण व्यावसाईक यश माझ्या बहुतेक फिल्म्सना लाभलं. इतकं पुरेसं आहे मला.
मागे वळून पाहतांना माझ्या मनात खंत-व्यथा नाहीत. मी कुठल्याही निर्माता-दिग्दर्शकाची मुलगी नव्हते. पण मी अभिनयात यावं हा नियतीचा योग होता. माझ्या आई -वडिलांना (आई- सुधाबेन, वडील- बच्चूभाई पारेख) वाटत असे मी डॉक्टर व्हावं. आई नेहमीच समाजोपयोगी कामात असे. मी डॉक्टर होऊन समाजातील गरिबांना मदत करावी असं तिचं स्वप्न होतं. पण, माझा कल नृत्य,कला अगदी नकला करण्याकडे दिसला आणि माझ्यासाठी तिने शास्त्रिय नृत्य शिकण्याची व्यवस्था केली. भरतनाट्यम, कत्थक, कत्थकअली, कुचिपुडी, ओडिसी सगळेच नृत्यप्रकार मी शिकत गेले. वयाच्या १७ व्या वर्षी सिनेमा मिळाला आणि तो अभिनय प्रवास अखंड चालू राहिला. कुठल्याही नामांकित निर्माता-दिग्दर्शकाने मला त्याच्या सिनेमात घ्यावे म्हणून मी त्यांच्याकडे शब्द टाकला, असं सुदैवाने घडलं नाही. उलट माझ्या सगळ्याच मेकर्सनी मला 'रिपीट ' केलं ! माझ्याही काळात स्पर्धा होती. पण, त्या स्पर्धेला उग्र रूप आलेलं तसंच राजकारण घडलेलं मी पाहिलं नाही ! त्यामुळे जर पुढचा जन्म असल्यास अभिनयात यावे ही इच्छा कायम राहिल.
एखादा चित्रपट तुम्हाला ऑफर झालाय. पण, तो तुम्ही स्वीकारला नाही अशी कधी खंत नंतरच्या आयुष्यात वाटली का?
आशा - मीच नाही. पण, कलाकारांना त्यांच्या अभिनय प्रवासात सिनेमा, नाटक किंवा टीव्ही सिरीयल अशा तत्सम ऑफर्स येत असतात. माझ्या उमेदीच्या काळात मलाही अनेक ऑफर्स चालून येत असत हे माझे भाग्य. त्या काळातील मोठ्या बॅनर्ससाठी मी पहिला चॉईस होते. शक्ती सामंत मोठे निर्माता-दिग्दर्शक होते. त्यांच्याकडे काम करण्यासाठी बहुतेक कलाकार प्रतिक्षेत असत. माझ्याकडे १९६० ते १९७० अनेक प्रस्ताव असत. शक्ती सामंत माझ्या घरी त्यांच्या महत्वकांक्षी 'आराधना ' सिनेमाचे प्रपोजल घेऊन आले. 'आराधना 'ची कथा कुठल्याही कलाकारासाठी आव्हान होते, पण, मला काय दुर्बुद्धी झाली कोण जाणे, मी त्यांना नकार दिला ! मी नकार देण्याची दोन मुख्य कारणं होती. नवोदित राजेश खन्ना आणि मला आईची भूमिका करावी लागणार होती, त्या काळात एकदा आईची भूमिका केल्यांनतर पुन्हा पुन्हा आईच्या भूमिका ऑफर होण्याचा तो काळ होता! आईच्या इमेजमध्ये कैद होण्याच्या माझ्या भीतीनं मला शक्ती सामंत यांना 'आराधना' साठी नकार द्यायला लावला! नंतर मी नाकारलेली भूमिका शर्मिला टागोरने केली. 'आराधना' सर्वच बाबतीत सर्वश्रेष्ठ ठरला. मी माझे नुकसान केले. आजही हा सल कधी तरी मनाला कातर करतो.
अभिनय सम्राट दिलीप कुमारसमवेत चित्रपट करावा हे स्वप्न देखील पूर्ण झालं नाही ! आम्ही दोघं प्रमुख भूमिकेत असलेला 'जबरदस्त' नामक सिनेमा सुरु झाला खरा पण, कधी पूर्ण झालाच नाही!
तुमचा काळ सिनेमाचे सूवर्ण युग होते. तुमच्या काळात देखील व्यावसायिक अडचणी होत्या, ज्या सध्या नाहीत किंवा किती बदलला आहे सिनेमा? हे माध्यम?
आशा - अशा अनेक अडचणी माझ्या आणि माझ्या आधीच्या काळातही होत्या. ज्या आता नाहीत. या माध्यमाची तांत्रिक आणि आर्थिक प्रगती खूप झालीये. आजचे बहुतेक स्टुडियोज वातानुकूलित आहेत. पूर्वी अतिशय घामाघूम अवस्थेत बंदीस्त स्टुडियोत काम करावे लागे. आज लहान-थोर बहुतेक कलाकारांना व्हॅनिटी व्हॅन मिळते. आऊट डोअर शूटिंगसाठी अशा व्हॅन्स महिला कलाकारांना खूप उपयोगी पडतात! माझ्या किमान ७-८ फिल्म्सचे शूटिंग काश्मीरला झाले. कपडे बदलण्यास जागा नसे, ज्युनियर आर्टिस्ट माझ्या भोवती देखरेख करण्यास उभ्या राहत आणि झाडामागे जाऊन कपडे बदलावे लागत असे. काश्मीरचे हवामान कधीही बदले त्यामुळे तिथे शूटिंग कधी कधी दोन-दोन महिने चाले. तेही अनेक अडचणींना तोंड देत ! आता स्क्रिप्ट, कॉस्चुम्स, मेक अप, लूक, लोकेशन्स, गाणी सगळं रेडी असतं ! ही मोठी क्रांती झालीये.
पण - मला दुःख याचं वाटत की आजच्या सगळ्या नायिका एक सारख्या लूकमध्येच का वावरतात? सगळ्यांनी केस मोकळे ठेवायचे आणि बहुतेक पुरस्कार कार्यक्रमांतून गाऊन्स तेही उत्तान वाटतील असे घालावेत? ही भारतीय चित्रपट सृष्टी आहे. भाषा आपली हिंदी आणि प्रादेशिक आहे. याचा विसर आपल्या नायिकांना पडलाय का? No one has distinctive style of their own...! कधी कधी आपण भारतात आहोत की एल.ए. मध्ये मला हेच कळत नाही ! विदेशी सिनेमा आणि संस्कृतीचे इतकं अंधानुकरण होईल याची मला कल्पना नव्हती !
हल्लीच्या फिल्म्समधून भारतीय डान्स मूव्हमेंट्स गायब झाल्यात. रियालिटी शोज आणि फिल्म्स दोन्हीकडे ऍक्रोबॅटीक केल्यासारखे डान्स भासतात !
आपल्या देशभरातून आणि परदेशातूनही असंख्य युवक आणि युवती इथे अभिनयात आपले नशिब अजमावण्यासाठी येतात. त्यातल्या ५ टक्के युवक-युवतींना संधी मिळते. पण, अन्य भरकटत जातात! हे चित्र देखील मोठं दारुण आहे.
आशा जी, तुम्ही अविवाहित राहिलात. याचे काय कारण ?
आशा - माझ्या आई-वडिलांची मी एकुलती मुलगी. माझ्या आईने माझ्या लग्नाचा प्रयत्न केलाही होता. पण, योग नव्हता असेच मी म्हणेन! अविवाहित असणे हे माझे प्राक्तन होते. कदाचित लग्न झाले असते तरी टिकले असतेच असं नाही! बदलती समाज मूल्य, ढासळती वैवाहिक नाती हे पाहून मी अविवाहित राहिल्याचे दुःख वाटेनासे झालेय मला.
तुम्ही सेंसॉर बोर्डाच्या अध्यक्ष होतात. सध्या पहलाज निहलानी यांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होताहेत!
आशा - वर्ल्ड सिनेमाचा विचार केल्यास जगात सगळीकडेच सिनेमा माध्यमावर सेंसॉर बोर्डाची पकड आहेच. ती असावीच. आपल्याकडे मुळातच प्रत्येक कुटुंबातून-घरातूनच मुलाचे पालनपोषण करतांना त्याने स्त्रियांचा आदर राखला पाहिजे, शिवीगाळ करू नये, नैतिकता अशी साधी-सोपी जीवन मूल्यं त्याला शिकवली पाहिजेत. अशी सेंसॉरशिप लहानपणापासून त्याला दिली गेली तरी अनेक भावी समस्या कमी होतील!
आपल्या लहान मुलांना घरी ठेवून जर आई-वडील प्रौढांसाठी असलेला सिनेमा पाहण्यास गेले तर मुलांची उत्सुकता चाळवेल! पालकांनीच स्वतः इतका त्याग करावा की ‘ए’ प्रमाणपत्र असलेला सिनेमा पाहू नये! अर्थात हे माझे मत! अभिजात्य सिनेमा आणि तद्दन बाजारू सिनेमा यातील वर्गीकरण आणि हेतू हे लक्षात न येण्याचे काही कारण दिसत नाही मला! सेंसॉर बोर्ड नसल्यास सिनेमॅटिक लिबर्टी किती प्रमाणात घेतली जाईल हे मी काय सांगावे? संस्कार आणि सेन्सारशाप ही घरातूनच असावी.
वहिदा, नंदा आणि तुमच्या मैत्रीविषयी खूप ऐकलंय...
आशा - वहिदा, नंदा, मी, हेलन, साधना आणि शम्मी आंटी आमची खूप घट्ट मैत्री आहे. आणि ती अबाधित राहील. आम्ही आमचं लाईफ खूप छान जगतो. दर महिन्यात एकदा एकेकीच्या घरी जमणे. हास्य-विनोद, फ्लॅश बॅक, नवीन नाटक सिनेमा पाहणे, प्रेक्षणीय स्थळाना भेटी देणे अशा भरगच्य कार्यक्रमांची लयलूट असते. शरीराने थकलोय पण, मनाने नाही. जीवनातला सात्विक आनंद घेण्याची वृत्ती आहे आमच्या सगळ्यांकडे!
दुर्दैवाने नंदा आणि साधना आमच्यात नाहीत. साधनाचे अखरचे दिवस चांगले गेले नाहीत. बिल्डरने तिला घराबाहेर काढलं.
आम्ही हल्लीच लवासाला जाऊन आलो. २ दिवस तिथे सगळ्या राहिलो !
हल्ली तुमचा दिनक्रम काय असतो?
आशा - मी अभिनय करत नसले तरी फिल्म इंडस्ट्री वेलफेयर ट्रस्ट, सिने आर्टिस्ट असोसिएशनचे काम तसंच माझ्या आशा पारेख हॉस्पिटलचे काम अशा अनेक महत्वपूर्ण कामात मी व्यस्त असते. ग्रीन टी घेऊन मग योगा आणि प्राणायाम नंतर वृत्तपत्रं वाचन, माझ्या ऑफिस आणि सिनेसृष्टीतील काही व्यवहार यात दिवस जातो. गेले ६ ते ८ महिने 'हिट गर्ल ' पुस्तकाच्या कामात गेले.
दरवर्षी जुलै महिन्यात माझ्या चुलत बहिणीकडे अमेरिकेला जाते. एखादा महिना राहून पुन्हा मुंबईत येते. माझ्या मैत्रिणी, माझे समाजकार्य यातच माझे संचित आहे !
- पूजा सामंत