Home > मॅक्स ब्लॉग्ज > माझा दादा, अजितदादा

माझा दादा, अजितदादा

माझा दादा, अजितदादा
X

अजितदादाचा आज वाढदिवस.... दादाबद्दल लिहिण्यासारखं खुप काही आहे. खास त्याच्या वाढदिवसानिमित्त हा लेख लिहिताना दादाची विविध रुपं डोळ्यासमोर येत आहेत. दादा माझ्यासाठी नेहमीच खास आहे. कारण आदरणीय पवार साहेबांप्रमाणे दादा ही माझ्यासाठी पॉवरहाऊस ठरला आहे. साहेबांसारखे वडील आणि दादासारखा भाऊ मला लाभला ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना हे दोघेही माझ्यामागे पहाडासारखे उभे असतात. अडचणीच्या वेळी मार्ग दाखवितात. चांगल्या कामासाठी पाठ थोपटतात तसंच काही चुकलं तर समजही देतात. ही प्रेमळ साथ कशी विसरता येईल ?

जेंव्हा मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा साहेब आणि दादांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे होते. ती शिदोरी आजही मला पुरते. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना साहेबांनी येथे दिलेल्या योगदानाची कल्पना आली. एखाद्या अफाट सागराच्या किनारी उभे राहून त्याच्या जलविस्ताराची केवळ आपण कल्पनाच करु शकतो तसं साहेबांचं काम..... साहेबांनी महाराष्ट्राचे जीवनमान उंचावले जावे यासाठी विविध क्षेत्रात अपार कष्ट केले आहे. त्यांचे हे कार्य इतिहास कधीही विसरु शकणार नाही. साहेबांच्या या कार्याच्या विस्ताराची दादाने मला ओळख करुन दिली आणि आता दादासोबत मलाही त्यातील खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळतेय हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

एकाच घरात वाढलेली आम्ही सर्व भावंडं... आमच्या घरावर आमच्या आजी शारदाबाई पवार यांचा आजही मोठा प्रभाव आहे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आमच्या घरात कधीच केला गेला नाही. घरच्या मुलीच नाही तर या घरच्या सुनांना देखील तशाच बरोबरीची वागणूक देणारं आमचं घर... त्यामुळे आम्हा दोघांवरही स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता आणि समानता या मुलभूत लोकशाही तत्त्वाचे संस्कार घरातच झाले. आदरणीय पवार साहेब राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात व्यस्त असले तरी आम्हा भावंडांच्या संगोपनाकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं अर्थात ते आज देखील आहेच. आजीचा वारसा, साहेब आणि आईची मायेची पाखर याखाली आम्ही सर्व भावंडे वाढलो. खरे तर दादा आम्हा सर्व भावंडात एक पाऊल पुढे आहे, तो त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे. सर्वांना सामावून घेणारा कुटुंबवत्सल, सर्वांना अपार माया लावणारा भाऊ, भाच्यांचे लाड पुरविणारा प्रेमळ मामा अशी खुप रुपं दादामध्ये सामावली आहेत. दादा जे आहे ते स्पष्ट सांगणारा अर्थात स्पष्टवक्ता आणि मनात कुणाविषयी किंचितही किल्मिष न ठेवणारा असा.... दादाचं हे स्वभाववैशिष्ट्य त्याला ’युनिक’ बनविते.

आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात गेलो. पण मी आणि दादाने राजकारणात जाणे पसंत केले. माझ्या खुप अगोदर म्हणजे जवळपास दोन दशके अगोदर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादाने राजकारणात पदार्पण केलं. अतिशय सुक्ष्म स्तरावरुन दादाने लोकसभेपर्यंत आणि नंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला आहे. पदार्पणानंतर अल्वापवधीतच दादाने आपल्या कार्यकुशलतेने वेगळे स्थान निर्माण केले. जनतेमध्ये वावरताना तो लोकांची भाषा बोलतो. ही भाषा दादाला जनतेशी जोडून ठेवते. अगदी टोकाचा विरोधक जरी दादाकडे आला तरी त्याचं काम होणार असेल तर दादा ते नक्कीच तडीस लावतो. पण जे काम होणार नाही त्याबाबत स्पष्टपणे सांगतो. हे दादाचं वेगळेपण आहे. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात दादा म्हणजे आश्वासकतेचं दुसरं नाव आहे. जनतेशी असणाऱ्या या जवळीकतेमुळेच दादाचं नेतृत्त्व १९८२ साली त्याच्या राजकारणातील प्रवेशापासून ते आतापर्यंतच्या काळात झळाळून निघालं आहे. लोकांचं अफाट प्रेम आणि कर्तव्यावरील अपार निष्ठा या जोरावर दादाचे नेतृत्त्व चमकत आहे.

माझा दादा स्पष्टवक्ता आहे पण तुसडा नाही. तो कठोर वाटतो खरा पण मनाने प्रचंड हळवा आहे. त्याच्या मनात मायेचा ओलावा आहे. भाऊबीज किंवा राखीच्या दिवशी बहिणींच्या घोळक्यात हरखून जाणारा दादा आम्हाला माहित आहे. आपत्तीच्या क्षणी धावून जाणारा दादा सच्चा कार्यकर्ता आणि नेता आहे. मांढरदेवी येथील दुर्घटनेच्या प्रसंगी स्वतः पुढे होऊन दादा मदत कार्यात उतरला होता. नुकतेच महाबळेश्वर ते सातारा या मार्गावर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका तरुणास त्याने आपल्या गाडीतून साताऱ्यातील रुग्णालयात पोहोचविले होते. एवढंच नाही तर त्याच्या उपचाराकडे स्वतः लक्ष पुरविल्यानंतरच दादा पुढे निघाला. शिकणाऱ्या हजारो हातांना दादानं प्रोत्साहन दिलंय. विद्यार्थी, खेळाडू, कलाकार, साहित्यिक अशा अनेक घटकांना दादाने आधार दिला.

राजकारणात चढ-उतार होत असतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही विरोधी पक्षात आहोत. पण सत्तेत असताना जनतेच्या सेवेसाठी जी तडफ त्यावेळी दादाने दाखविली, तशीच आता विरोधात असताना दादा दाखवित आहे. प्रसंगी मुख्यमंत्र्यांनाही खडे बोल सुनावण्यास दादा मागे-पुढे पाहत नाही. सभागृहात बोलताना जेंव्हा दादाचा आवाज लागतो, त्यातील जरब, स्पष्टवक्तेपणा आणि तळमळ दिसते तेंव्हा त्याची दृष्ट काढाविशी वाटते. दादाकडे असणारी प्रशासनाची समज, कामाची तडफ आणि शिस्त माहित असल्याने आज सत्तेत नसतानाही प्रशासनात आजही दादाच्या शब्दाला किंमत आहे. अधिकारी असो की नेता दादाच्या शब्दापुढे जात नाही हे वास्तव आहे. अशा माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो आणि एक दिवस महाराष्ट्रातील सर्वोच्च पद देखील, हीच त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभकामना....

दादा तुम जियो हजारो साल, हर साल के दिन हो पचास हजार...

- सुप्रिया सुळे, खासदार, बारामती

Updated : 22 July 2018 11:47 AM IST
Next Story
Share it
Top