पण, माझं लग्न नाही ठरल तरं? भाग- 3
X
कोणी प्रेमात उल्लू बनवून पळून गेला, तर त्या पळपुट्याला थँक्स म्हणायचे आणि खिदळायचं बिनधास्त. प्रेमात पडला नाहीत आणि Arrange Marriage ची वेळ आली तर लग्न आणि कांदेपोहे हा नवा संघर्ष Enjoy करायचा. मुलाला बिंधास्त कॉफी शॉपवर भेटायला बोलवायचं.
गार्गी : इतके थँक्स म्हणायला हवंस तू खरतर त्या विण्याला. जी व्यक्ती दुःखात तुमच्या सोबत नाही तिला तुमच्या सुखात असण्याचा संबंधच नाही. अशा पळपुटयांना इमोशनची श्रद्धांजली वाहायची.
कृष्णा : तस नाई ताई. पर माझं मन, त्यानं आणि म्या बगीतल्यालं सपान, पार कुस्करून पळून गेला वो त्यो... माझ्या घरच्यापासनं मला इथवर मला काय काय बोलून आणल्याला. म्या बी काय मंद नव्हती. त्याला सरळ तोंडावर विचारल्यालं. इण्या, मी अशी एका धर्माची अन तू तसा दुसऱ्या. ल्योक, तोंडाला शेण फासतील तुझ्या बी अन माझ्या बी आईबाच्या. जीव तर लई हाई माझा तुझ्यावर.. पर नसलं पुढं जायचं, नसलं लगीन करायचं तर सांग बाबा सरळ तसं...
गार्गी : मग नेमका सैराट झाला का काय तुमचा?
कृष्णा : काय सांगू ताई, मला लग्नाची तयारी करतो म्हणून बतावणी करून पळून गेलानावं त्यो. सैराटमध्ये काय दोघाचा जीव गेलता. इथं याच्या अश्या पळून जाण्यानं म्या बसली की इचार करीत...काय झालं असल...नसलं याचा...ह्यो सैराट बी तेव्हढाच जीवघेना असत्युया...
गार्गी : खरंय तुझं कृष्णा, आयुष्यात क्लिअर कट असणं फार महत्वाचं असतं. सुरवात करा वा शेवट. सगळं क्लिअर असावं. मनमोकळं, बिनधास्त...असं पळून गेल्यानं प्रश्न सुटत नाहीत, तर नवे प्रश्न तयार होतात.
तितक्यात अंघोळ करून नुकताच प्रितम बाहेर येतो. अरे किती मोठ्याने बोलता तुम्ही लोकं. सगळ चित्र तयार झालं तुझ्या विण्याचं माझ्याडोळ्यासमोर बघ. या जगात शरीरावरच्या बलात्कारासाठी शिक्षा आहे. पण मनावरच्या बलात्काराचा काय? कुणी वचनं तोडली, कुणी अनादर केला, कुणी वाळीत टाकलं, कुणी अपमानित केलं. या सगळ्यासाठी न्याय कोण करणार? सगळं कसं अलबेल आहे या देशात. असो, पण कृष्णा तू खंबिरपणे उभी राहिलीस ते बर झालं. उगीचंच स्वतःची चूक नसताना आयुष्यभर स्वतःला कमी समजण्यात काय अर्थ आहे? आणि गार्गी म्हणतेय ते अगदी बरोबर आहे, अश्या पळपुटयांना इमोशनची श्रद्धांजली वाहायची...
तर चला, मी तिघांसाठी मस्त चहा आणि कांदेपोहे करतो. कृष्णा तितक्यात तू समोरच्या आजींना मदत करून ये, त्यांनी निरोप ठेवलाय तसा. नवीन बाळ झालंय ना तिकडे. एवढ्यातच प्रितमला त्याची ज्युनिअर आर्टीस्ट स्वप्नाचा फोन येतो.
प्रितम : हा स्वप्ना. मी बरोबर 11 वाजेपर्यंत पोहचतोय. तू सगळी तयारी करून ठेव पेंटींगची. आज गार्गीचंच एक पैंटिंग करू. तिच्या डोळ्यातली निरागसता, तिच्या केसांमधला मोकळेपणा, तिच्या ओठांमधली आश्वासकता, ( तितक्यात गार्गीने टाकलेला खांद्यावरचा हात, प्रीतमला भानावर आणतो, हा स्वप्ना तू पोहच म्हणत तो फोन कट करतो...)
गार्गी : (नजरेत नजर भिडवत) फोन का कट केलास? हं?
प्रितम : अच्छा...अच्छा.....अच्छा...
गार्गी : प्रीत.......ए पागल....
प्रितम : पागल....अच्छा...?अच्छा..?अच्छा...?
गार्गी : प्रीतम....Thanks for everything jan...I love u....
प्रितम ओठांनीच तिच्या या थँक्सला उत्तर देणार तितक्यात पुन्हा फोन वाजतो....स्वप्ना कॅलिंग....इच्छा नसतानाही तो फोन उचलतो....
स्वप्ना : सर,सर,सर ऐका, मला सांगायचं होत म्हणून फोन केला. माझे कांदेपोहे होते आज
प्रितम : अग. पोहेच ना? मीही बनवतोय पोहेच...आणू का तुझ्यासाठी डब्यातून...पण आता फोन ठेवू का? थोडं कामात आहे...
स्वप्ना : सर...तसे पोहे नव्हे...लग्नाचे कांदे पोहे आहेत माझे......
प्रीतम : हे बघ स्वप्ना, तुला स्वतःला काही पटतंय का हे सगळं?
स्वप्ना : सर, काय सांगू...पटत तर नाही...पण arrange marriage म्हणजे असंच काही करावं लागणार ना. तुम्हीच सांगा काय करू शकतो आपण याला?
प्रितम : मुलगी पहायला येतो म्हटलं पाहुण्यांनी की रिजेक्ट मारायचं ग मुलाला. उगी entertain चं नाही करायचं. घरचे नाराज झाले असतील, इमोशनल ब्लॅकमेल करायला लागत असतील तर बिंधास्त हस त्यांच्या मागास बुद्धीवर. एकदा सांगायचं समजून की मी काही वस्तू नाही वेगैरे वेगैरे...पण परत परत नाही आणि बिंधास्त कॉफीशॉपवर भेटायला बोलव. सगळं क्लिअर कट सागं. काय आवडत काय नाही. काय करायचंय काय नाही. स्पष्टवतेपणा क्षणोक्षणी मांड. अर्ध बिलही दे. उगी उपकार नको घेऊ कोणाचे. उगी आता सोज्वळ बनलीस की बनशील मग आयुष्यभर सोज्वळ...मुखवटे घेऊन जगत रहा मग...
गार्गी : अरे दे इकडे फोन, तू आवर पटपट...मी समजावते तिला, माझी Phd झालीय आता या विषयात...
स्वप्ना, लग्न कसं करायचं, काय करायचं हे तुम्ही दोघे मिळून ठरवा. उगी निर्णय परंपरांच्या आधीन होऊ देऊ नका. हुंडा मागितला तर बिंधास्त खिदळ...आई बाबांना आधी समजावून मग दरडावून सांग हुंड्याबाबत... उगी पुन्हा ते टिपूस नको आणि परंपरा सांगायला लागले तर प्रत्येक परंपरेला कारण विचार... उत्तर मिळाले तर ओके...पटलं तर जप ती परंपरा...नाही मिळालं उत्तर तर वेळ दे उत्तर शोधायला... लग्नाची तारीख पुढं ढकला हवं तर पण जुनाट परंपरेशी समझोता नको...
" आई बाबांना चांगलं वाटेल उगीच वाद नको...पटत नसलं तरी आजच्यापुरत करू", या भावनेतच गडबड आहे खरी....ज्या रूढीबद्दल, त्याच्या कारणांबद्दल आपल्या पणजोबालाही माहिती नाही आणि आपण चाललोय आपलं. त्या जाचक रूढी संस्कृतीच्या नावाखाली पुढं नेत.”
आईवडिलांनी आपल्याला शिक्षण दिल इतकं...आपण जरास त्यांचं अज्ञान नाही दूर करू शकत? ती ही माणसाचं आहेत आणि ती ही चुकतात… या पिढ्यांच्या न विचार करण्यानेच डबकं झालय इथं...पणजोबा नाही बदलले म्हणून आजोबा नाही बदलले, आजोबा नाही बदलले म्हणून वडील नाही बदलले, वडील नाही बदलले म्हणून आता आपणही नाही बदललो तर तयार राहूया अजून काही हत्यांसाठी....
स्वप्ना : मॅम पण अशाने माझं लग्न नाही ठरल तरं?
गार्गी : तर लक्षात ठेव तुझं जगणं महत्वाचंय...पुन्हा सांगतेय, शरीराने कधी मरू माहीत नाही...पण मनाने मरण्याची सुरवात इथंच होते गं. ते ही स्वतःच्या नकळत, न जाणवता... काहीच दुखत नाही तेव्हा म्हणून लाथ मारूया त्या नकारात्मकतेवर आणि सुंदर जगणं सुरु करूया. अवघड आहे मान्य आहे पण अशक्य नाही. स्वावलंबी बनून जगुया.
मला पूर्ण मान्य आहे. आई, वडील भाऊ, बहीण काही मोजकेच नातेवाईक, आपल्या भल्याचाच विचार करत असतात. पण, वैचारिक मागासलेपण भलेपणाची कन्सेप्ट बदलून टाकतेय. दोष त्यांचाही नाही. पण, आपण इतकं शिकूनही चौकटीबाहेर नाही पडलो तर आपला नक्की दोष आहे.
स्वप्ना : मॅम पटतंय सगळं. पण, हे सगळं आपल्यासोबतच का? स्त्री असं गुन्हा आहे का? तिने विचारच करू नये का?
गार्गी : अगं, स्त्रीच विचार न करणं, हा पुरुषांसाठी खरतर एक कंफर्ट आहे. वर्षानुवर्षे चाललेला आणि पुरुष ते चालूच देणार. नाहीतर रोजच्या कामात तिला मदत करावी लागेल की...साधं गणित आहे बघ... स्त्रीला जर घरातली आणि घराबाहेरची दोन्ही काम जमतात तर पुरुषांनाही या दोन्ही गोष्टी न जमण्यासारखं काय आहे? म्हणूनच तिला दाबण्यासाठी खूप पद्धती आहेत.
साधंच बघ ना, रोजच्या mobiles वर स्त्रीवर केले जाणारे विनोद फक्त हसण्यासाठी असतात? १०० वेळा एखादी खोटी गोष्ट सांगितली की ती खरी वाटू लागते, तसेच 100 वेळा स्त्रीला त्या विनोदाच्या माध्यमातून डोमिनाटींग दाखवून ती कितीही सहनशील असली तरी डोमिनाटिंग हे चित्र समोर आणणं. वास्तवाला उलट करणं. हे जुन्या काळापासून सुरुय. आज फक्त मध्यम बदलेलेत.
असू दे. स्त्री हा विषय प्रचंड मोठा आहे. या विषयाच्या खोलीत जाऊ तितकं याचे पदर उलगडत जातात. प्रॉब्लेम आपला आहे. आपणच सोडवला पाहिजे. पण बदलणाऱ्या काळानुसार स्त्रीमधला बदलच पुरुषांच्या मानसिकतेत बदल घडवून आणेल. तिला एक व्यक्ती म्हणून स्वीकारेल. पण सर्वात महत्वाचं की स्त्रीनं स्वतःला एक व्यक्ती म्हणून स्वीकारणं.
मी तर स्वीकारलय....आता तू ही स्वीकार स्वप्ना?
क्रमशः
डॉ. चारुशीला
भोपाळ
9689865748