Home > मॅक्स वूमन > न प्रकाशित आत्मचरित्राचे तुकडे…

न प्रकाशित आत्मचरित्राचे तुकडे…

न प्रकाशित आत्मचरित्राचे तुकडे…
X

चार बाय चार फुटाच्या न्हाणीत ती पाट ठेवायची. मी शरीराचं बोचकं गुंडाळून त्यावर अनावृत बसायचे. आजीनं तेल गरम करून आणलेलं असायचं. तेलाची वाटी अडवी करून ती मानेपासून धार सोडायची. छातीकडचा भाग सोडल्यास माझं पूर्ण अंग केसाळ. पाठीवरही हलकीशी लव. कोवळ्या पिकांच्या शिवारात पाणी सोडावं, तसं तेल पाठीवरुन घरंगळायचं. आजी तेलाच्या तीन चार समांतर धारा सोडायची. मला माझी पाठ शेतासारखीचं वाटायला लागायची. मानेपासून कमरेच्या खालच्या भागापर्यंत तेलाच्या धारा वाट शोधत धावायच्या. मग आजीचा हात पाठीवरून फिरायचा. तिच्या स्पर्शात विलक्षण उब असायची. मसाज करायचं टेकनिक बिकनिक तिला माहित नव्हतं. ती दोन्ही हाताचे पंजे पाठीवर टेकायची. मानेपासून कंबरेपर्यंत हात दाबत न्यायची. हात वरखाली वरखाली असा पंधरा वीस वेळा फिरायचा. तेल मुरलयासारखं वाटलं की आजी म्हणायची, माझ्या पोरीची पाठ लय चांगली. या पाठीवरं घराचा वारस जन्मला. रुक्‍मीचं हाल संपलं. मला फक्त आपलं कौतूक होतयं इतकचं कळायचं. आजीच्या बोलण्याचा अर्थ लावायच्या भानगडीत मी पडायचे नाही. आजीच्या अलगद चोळण्यानं शरीर सुखावलेलं असायचं. सुखावलेल्या शरीराला असाही शब्दांचा जाच नकोच असतो. पाठ चोळली की आजी हातपाय चोळायची. पाठीचीच प्रक्रिया पुन्हा रिपिट व्हायची. पण त्यातला संथपणा संपलेला असायचा. आजी गडबडीनं न बोलताच हातपाय चोळायची. गरम पाण्याचा तांब्या घेऊन तिचा मोर्चा पुन्हा पाठीकडे वळायचा. मग तिच्या हालचालीत पुन्हा संथपणा यायचा. तेलाच्या धारेइतकीचं संथपणे ती पाण्याची धार सोडायची. वरपासून खालपर्यंत लाईफबॉय साबण फासायची. तिचं चोळणं पुन्हा सुरू व्हायचं. माझं लक्ष मात्र साबणाकडं वळलेलं असायचं. गुलाबी रंगाच्या साबणावर वापरून वापरून पांढरा बुळबुळीतपणा साचलेला असायचा. मी त्यावर गरम पाणी सोडून आधी साबणालाच आंघोळ घालायचे. आणि मग आजीकडं सोपवायचे. मला लाईफबॉयचा प्रचंड राग यायचा. कित्येक वर्ष घरात तोच साबण वापरात होता. किराणा दुकानात किती तऱ्हेचे साबण होते. अगदी लाईफबॉयच्या किंमतीतही दुसरे साबण यायचे पण आईला साबण बदलायची गरजच वाटायची नाही. आईची साबणाची गरजच मर्यादित होती. अंग साफ झालं की तिला पुरेसं असायचं. साबणाचा वासचं चांगला हवा, त्याचा रंग, आकार आकर्षक हवा. असल्या तिच्या मागण्या नव्हत्या. शिवाय नवरा मेलेल्या बाईनं साधं रहावं , शृंगार करु नये असल्या समाजानं भरवलेल्या विचित्र कल्पनाही तिच्या डोक्‍यात होत्या. पण बिना साजशृंगाराचीच बाई कसली सेक्‍सी दिसते ते तिला कळायचं नाही. खरतरं ही शृंगाराची भानगडपण बाईच्या शरीराची मादकता झाकण्यासाठी आली असेल, असं मला वाटायचं. किराणा खरेदी आईच्या कलानं व्हायची. पोरांना वेगळं काही हवं आहे , हे कुणी तक्रार केल्याशिवाय तिच्या ध्यानी यायचं नाही. आम्हाला हव्या असलेल्या गोष्टी घ्यायला तिची ना नव्हती. पण प्रत्येक पोरीला नको इतकं परिस्थितीचं भान. त्यामुळे आईकडे कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट धरायचा नाही, हे प्रत्येकानं ठरवलेलं. मीही हट्ट करायचे नाही. पण आवाक्‍यातल्या पर्यायांचा मात्र विचार करायचे. गरिबापुढे पर्याय नसतात, हा मला गरिबीचा निव्वळ बागुलबुवा वाटायचा. पर्याय सगळीकडेच असतात. पण स्वतःचा कम्फर्ट झोन सोडायला लोक तयार नसतात. असं काहीसं मला वाटायचं. मी आईकडे लाईफबॉयची तक्रार सुरू केली. आईनं किराणाची यादी आणि पैसेचं माझ्या हाती सोपवले. तूच का किराणा भरत नाहीस ? म्हणत आई त्या चॉईस करण्याच्या जबाबदारीतूनच मोकळी झाली. तेंव्हापासून आमच्या घराचे दरवाजे लाईफबॉयसाठी बंद झाले. माझी साबणखरेदी म्हणजे जणू समन्यायाचं प्रतिक होती. लाईफबॉयला खूप वर्षे न्याय मिळाला म्हणून मी त्याकडे वळायचेच नाही. पाच साबण घ्यायचे असले की पाच प्रकारचे घ्यायचे. त्यातूनही घरी गंमत सुरू झाली. एका आठवड्यानं साबण बदलायची वेळ यायची. त्या दिवशी सर्वात आधी आंघोळ करणाऱ्याला आठवड्यासाठीचा साबण निवडायची संधी मिळायची . मोठी बहिण आंघोळीला गेली की चंदन साबण निवडायची. दुसरी गुलाबाचा तर तिसरी लिंबूचा. समोर असंख्य पर्याय असले तरी आपल्या कलाची एखादी गोष्ट असतेच , जी निर्णय घ्यायला मदत करते. माझ्या किराणा खरेदीनं घरातल्या प्रत्येकाला किराणाखरेदीची जबाबदारी न घेताही पर्याय निवडीचं स्वातंत्र्य मिळालं होतं. दुकानदार मात्र माझ्या मल्टी ऑप्शनला वैतागायचा. एकाच पद्धतीचे पाच साबण घेतले की त्याचं बील करणं सोपं व्हायचं. एकाच रकमेला पाचने गुणलं की काम संपायचं. पण पाच प्रकारच्या साबणांच्या किंमतीत एक दोन रुपयाचा फरक असायचा. त्यामुळे प्रत्येक साबणाची किंमत स्वतंत्रपणे लिहायला लागायची. दुकानदार त्यामुळं माझं बील मागे ठेवायचा. बाकीचे ग्राहक गेले की माझं बील करायला घ्यायचा. त्याला आणखीही एक कारण होतं. मी वयात येत होते. सौंदर्याच्या व्याखेत बसत नसले तरी वयाची धुंदी चेहऱ्यावर स्पष्ट जाणवायची. दुकानदाराचा पोरगा दुकान सांभाळायचा. तो माझ्याहून चारपाच वर्षांनी मोठा. दुकानात पोरी खरेदीसाठी आल्या की माल विकण्याच्या रुक्ष कामातही त्याला चैतन्य जाणवायचं. शिवाय दुकानात पोरी येतात म्हंटल्यावर गल्लीतल्या इतर पोरांचा मोर्चाही दुकानाकडे वळलेला असायचा. मलाही त्या गोष्टींचं अप्रूप होतंचं. दुकानात गेलं की गल्लीतल्या पोरांच्या नजरा आपल्याकडं वळतात हे सुखावून जायचं. माझं किराणा खरेदीचं कारण आणि दुकानदाराच्या पोराचं दुकानात बसण्याचं कारण जवळपास सारखंच होतं. त्यावेळी मला नटनट्यांचे फोटो जमवण्याचा नाद होता. किराणा दुकानात सामानांच्या पाकिटासोबत ते फोटो यायचे. नवा फोटो आला की दुकानदाराच्या पोराने तो माझ्यासाठी काढून ठेवलेला असायचा. मोठं झाल्यावर लहानपणच्या अनेक सवयी बावळट वाटू लागतात. पण त्यावेळचं त्यांचं महत्त्व वेगळचं असतं. दुकानदाराचा पोरगा माझ्यावर लाईन मारायचा. हे लाईन मारणं प्रकरण पण मजेशीरचं असतं. त्यात काही प्रेमाच्या आर्ततेची, आणाभाकांची, नात्याच्या भविष्याच्या नियोजनाची चिंता नसते. गुंतलेपण नसतं. वाऱ्याच्या मंद झुळूकीसारखा क्षणभर सुखावणारा तो क्षण. त्यातून फार भावनिक नुकसानही होत नाही. किंवा नैतिक प्रतिमाही डागाळत बिगाळत नाही. सुख मात्र मिळत राहतं. स्त्री पुरूषांना एकमेकांच्या ओझरत्या नजरभेटीनेही सुख मिळवता येतं. असे लाखो क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण या कानाचं त्या कानाला कळत नाही.

- योजना यादव

Updated : 6 April 2017 6:40 PM GMT
Next Story
Share it
Top