Home > मॅक्स वूमन > दुसरा विवाह

दुसरा विवाह

दुसरा विवाह
X

लग्न ही माणसाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेली व्यवस्था आहे. ती निसर्गनिर्मित नाही. त्यामुळे या व्यवस्थेशी जमवून घेण्यासाठी प्रत्येकाला काही ठराविक कालावधी लागतो. काहींना कमी तर काहींना जास्त कालावधीची गरज भासते आणि ते व्यक्तीसापेक्ष आहे. अशा वेळी पहिले लग्न असफल ठरले तर दुसऱ्या लग्नात त्याचे पडसाद कमी अधिक प्रमाणात उमटतातच. पहिल्या लग्नाच्या असफलतेची कारणं किंवा त्याचे प्रतिबिंब घेऊन दुसरे लग्न सफल होत नाही. हे खरे असले तरी पहिल्या असफल ठरलेल्या लग्नाचे परिणाम मनावर खोलवर जखम करून गेलेले असतात. अनेकदा ही जखम दुसऱ्या लग्नाने आधी चिघळते आणि मग जसजसा काळ जातो तसतशी ती जखम कोरडी होत जाते.

आदिती आणि ओंकार हे तिशी उलटून गेलेले आणि चाळीशीला आलेले... घरच्यांच्या सांगण्यामुळे म्हणा अथवा काहीशा संभ्रमित अवस्थेत विवाहबद्ध झालेले... दोघेही पहिल्या लग्नात होरपळून निघालेले... मात्र मुलांसाठी आणि कुटुंबवत्सलतेमुळे ते दोघे लग्न करण्यास तयारही झाले. दोघेही सुशिक्षित आणि उत्तम अर्थाजन करणारे होते. ओंकारला एक मुलगा होता तर आदितीला मूल नव्हते. अशा अवस्थेत लग्नाला तीन महिने उलटून गेले. ओंकारचे आई वडील तीन महिन्यांनंतर जरा कासावीस वाटले. कसे बोलावे आणि काय बोलावे हे त्यांना कळत नव्हतं. जरा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर काकू हळूच म्हणाल्या, “ओंकारनं आता दुसऱ्या मुलाचा विचार करावा, असं आम्हाला वाटतं, पण... ते शक्य होईल, असं काही वाटत नाही." त्यांच्या नाराजीचा सूर माझ्या लक्षात आला. “आताच तर लग्न झालंय. जरा वेळ द्या त्यांना.” माझं वाक्य बोलून पूर्ण होण्याआधीच काकू मनातलं बोलू लागल्या. "तसं नाही गं...मूल काय होईलच; पण, तुला कसं सांगू तेच कळत नाही. मूल होण्यासाठी त्यांनी आधी जवळ येणं गरजेचं आहे ना?” मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ कळाला नाही. हे माझ्या भावमुद्रेवरुन त्यांच्या लक्षात आलं. त्या म्हणाल्या, “नवरा बायकोसारखं वागतच नाहीत ग ही दोघंही. दोन अनोळखी माणसं एका छताखाली राहतायत असं वाटतं. म्हणजे भांडणही करत नाहीत, आमच्याशी दोघंही चांगली वागतात; पण, का कोण जाणे, सारखं वाटतं की आमच्याशी उत्साहानं बोलणारी ही दोघं एकमेकांशी इतक्या कोरडेपणानं का वागतात? आदिती अतिशय लाघवी आहे. नातवाला तिनं कधी आपलंसं केलं, हे आम्हाला कळलंही नाही. खूप काळजी घेते त्याची ती. त्याचीही गट्टी जमलीय तिच्याशी. सगळं असं चांगलं असताना, त्यांचं एकमेकांशी असं कोरडेपणानं वागणं बघवत नाही. अपराधी वाटत खूप. ओंकारशी बोलले तर म्हणतोय चांगलं चाललंय. तुला उगीच काही शंका येतात. पण दोघांच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू कसं शोधायचं, हे कळतच नाहीय.” असं म्हणत त्यांनी डोळ्यांतलं पाणी पदरानं टिपलं. आईचं कासावीस होणारं मन माझ्या लक्षात आलं. "तू बोल ना आदितीशी. तुला काही तरी सांगेल ती. प्रश्न असतील तर मिळून सोडवू या..” मी "हो" म्हणताच त्यांना समाधान वाटलं. आणि पुढच्या दोनच दिवसांत काहीतरी निमित्त काढून त्यांनी आदितीला माझ्याकडे पाठवलं.

हळूहळू आदितीही मोकळी होत होती. “कसा आहे ओंकार?” हा माझा प्रश्न ऐकताच आदिती अचानक काहीशी गंभीर झाली. “सगळं ठीक आहे ना?” अस विचारताच काहीशी कावरी बावरी होत उत्तरली “हो सगळं ठीक आहे. खरं तर मला माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. नक्की काय ते मलाही कळत नाहीये. मला ओंकार खूप चांगला वाटतो; पण एक भिती सतत वाटत राहते. आम्ही दोघे जवळ आलो तर, परत मागच्यासारखं सगळं सुरू होईल, असं वाटतं. या भीतीपोटी मी त्याच्याशी नीट बोलूही शकत नाही. माझा पहिला नवराही लग्न झालं, तेव्हा खूप काळजी घ्यायचा; अगदी ओंकारसारखीच! पण रात्र नको वाटायची. ते किळसवाणे प्रकार आणि नंतर नंतर तर मी नाही म्हटलं की रात्रीतून होणारी ती मारहाण, अजूनही आठवते मला. ओंकार अनेकदा मनमोकळेपणाने बोलतो माझ्याशी, पण मला नाही त्याच्याशी बोलता येत. सुरवातीला ओंकारने प्रयत्न केला माझ्याजवळ येण्याचा! पण मी अवघडलेली वाटले की तो स्वतःहून दूर होई. तुला जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा सांग, मला घाई नाही, असं तो म्हणाला. त्याला काय सांगू आणि कसं, तेच कळत नाहीये." शेवटचं वाक्य बोलता बोलता तिला रडूच कोसळलं.

या सगळ्या घटनेत वास्तविक चूक कोणाची अशी नव्हतीच. आपापल्या जागी सर्व योग्यच होते. आपण सर्व एक गोष्ट अगदी सहज विसरतो, ती म्हणजे लग्न ही माणसाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेली व्यवस्था आहे. ती निसर्गनिर्मित नाही. त्यामुळे या व्यवस्थेशी जमवून घेण्यासाठी प्रत्येकाला काही ठराविक कालावधी लागतो. काहींना कमी तर काहींना जास्त कालावधीची गरज भासते आणि ते व्यक्तीसापेक्ष आहे. अशा वेळी पहिले लग्न असफल ठरले तर दुसऱ्या लग्नात त्याचे पडसाद कमी अधिक प्रमाणात उमटतातच. पहिल्या लग्नाच्या असफलतेची कारणं किंवा त्याचे प्रतिबिंब घेऊन दुसरे लग्न सफल होत नाही. हे खरे असले तरी पहिल्या असफल ठरलेल्या लग्नाचे परिणाम मनावर खोलवर जखम करून गेलेले असतात. अनेकदा ही जखम दुसऱ्या लग्नाने आधी चिघळते आणि मग जसजसा काळ जातो तसतशी ती जखम कोरडी होत जाते. मात्र मागचं सारंच सोडून दुसऱ्या लग्नाला सुरवात करावी, असे जर कोणाचे म्हणणे असेल तर ते चुकीचे ठरू शकते. बहुतांशी दुसऱ्या लग्नात हीच चूक दिसून येते. आपले मन म्हणजे काही पाटी नव्हे, की पुसून टाकलं आणि पाटी स्वच्छ. मनावर कोरलेल्या घटना आणि काही प्रसंग खूप खोलवर परिणाम करणारे असतात. प्रेमाने आणि मायेच्या सहवासाने हा परिणाम हळूहळू निश्चित कमी होतो.

पहिल्या लग्नापेक्षा दुसऱ्या लग्नात जुळवून घेताना अनंत अडचणी येतात. या अडचणी केवळ उभयतांनीच नाही तर संपूर्ण कुटुंबाने समजून घेणे गरजेचे असते. दुसऱ्या लग्नात शारीरिक ओढ तुलनेने कमी असते, मात्र होरपळलेलं मन प्रेमाच्या सहवासासाठी आसुसलेलं असतं. त्यासाठी एकमेकांना समजून घेणं आवश्यक असतं. या साऱ्यांना पुरेसा अवधी देणं गरजेचं असतं. अनेकदा कौटुंबिक दबावाखाली येऊन अथवा आपल्या अपत्याला पूर्ण कुटुंबाचे सुख मिळावे, या हेतूने दुसरे लग्न केले जाते. यात काहीही गैर नाही; मात्र, लग्नाचा पूर्णतः उद्देशच वेगळा असल्याने दांपत्याला भावनिक आणि त्या बरोबरीने शारीरिक जवळीक साधण्यासाठी वेळ लागतो. प्रापंचिक इतर जबाबदाऱ्यांसोबत इतर अनेक ओझी या वेळेस ते वागवत असतात. याची जाणीव कुटुंबातील इतर सदस्यांनी ठेवायला हवी. केवळ लग्न झाले म्हणून उभयतांनी एकमेकांत लगेच रमायला हवे, ही अपेक्षाच मुळात चुकीची ठरते. पहिल्या लग्नाप्रमाणे दुसऱ्या लग्नातील आपल्या जोडीदाराविषयी तितक्यात उत्कट भावना असतीलच, असे नाही. किंबहुना, त्या कमीच असतील कारण प्राधान्य आणि अनुभव या दोहोंचीही सांगड घालून दुसऱ्या लग्नाची मानसिक तयारी वधू-वरांनी केलेली असते.

विवाह असफल होणे म्हणजे काही पाप झाले आहे, अशा भावनेनेच समाज घटस्फोटितांकडे पाहतो. त्यामुळे या धक्क्यातून सावरणंच मुळी घटस्फोटितांना कठीण जातं. मग दुसऱ्या लग्नाचा विचार हा जोडीदार हवा, यापेक्षाही इतर काही गरजांना डोळ्यांसमोर ठेवून केला जातो. आपल्याकडे लग्नापूर्वी समुपदेशन खूप कमी जण करून घेतात, त्यात दुसऱ्या लग्नाच्या वेळेस वास्तविक समुपदेशनाची नितांत गरज असते; मात्र त्याकडे काणाडोळा केला जातो. एक जखम भरून निघून त्यावर हळूवार फुंकर कशी घालायची आणि आपल्या जखमेबरोबरच नवीन जोडीदाराच्या मनावर झालेल्या आघातांची तीव्रता कशी कमी करायची, याचे मार्गदर्शन निश्चितच गरजेचे आहे.

ओंकारला आदितीबद्दल जेव्हा सांगितलं, तेव्हा त्याला खूपच वाईट वाटलं. आदितीच्या या दुःखात तो पहिल्या बायकोचा अकस्मात झालेला मृत्यू विसरून गेला. आपल्याला काही काळ का असेना, पण प्रेमाचा सहवास मिळाला, आदितीला माणूस मिळूनही प्रेम मिळू शकलं नाही; तर, उलट तिला त्या प्रेमाच्या जागी हिंसेलाच बळी पडावं लागलं. हे सत्य स्वीकारताना त्याला अतिशय त्रास झाला. मात्र आपण तिला प्रेम देऊन तिची कमी भरून काढू शकतो, हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने त्याच्या प्रयत्नांत काही कसूर बाकी ठेवली नाही. ओंकारने दिलेली माया आणि प्रेम यामुळे आदिती आता सावरली. आपण असा काही विचार करत होतो हे आठवले तरी, हमसून हमसून रडणारी आदिती, आता खळखळून हसते. तिचं हे हसू पाहून सर्व घरच आनंदात नहातं.

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 24 Feb 2017 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top