Home > मॅक्स वूमन > "आनंदमय क्षणांची भिशी"

"आनंदमय क्षणांची भिशी"

आनंदमय क्षणांची भिशी
X

दर वर्षी एक दिवस येतो. ज्या दिवशी मी प्रचंड श्रीमंत असते. एक मोठा सोहळा असतो या क्षणांचा. वर्षभर साठवलेली भिशी फोडणं. सगळ्यांनी पैसे मोजण्यासाठी जमणं. त्या नोटा मोजण. चिल्लरची 10 ची गट्टी बनवणं. मग एका कागदावर सगळा हिशोब लिहणं. मला तर मी एकदम चित्रपटातल्या मोठ्या उद्योगाच्या लीडरसारखं वाटत या दिवशी.

लहानपणी पप्पांच्या खिशातील, मम्मीच्या पर्स मधील 10 रुपयांची नोट मिळायची. जग जिंकल्यागत वाटायचं. सगळ्यांपासून लपवून लपवून वेगवेगळ्या जागी ती भिशी ठेवायची मी. कधी परीक्षेत नंबर आला तर मग आजी पासून सगळ्यांच्या मागे लागायचे. बक्षिसी दे, बक्षिसी दे म्हणून... कधी 1 चा तर कधी 5 चा कॉइन मिळायचा. कधी कोणी पाहुणे घरी आले की, ती भिशी घेऊन घिरट्या सुरु असायच्या माझ्या त्यांच्यासमोर... आज खूप हासू येतय हे वेडे क्षण आठवून. पणं कस सांगू... एक नातचं तयार झालं होत माझं त्या भिशीसोबत... पाहुण्यांकडून किंवा बक्षीसांमधून कधी एकचा तर कधी पाचचा कॉइन मिळायचा...अख्खा दिवस त्या एक रुपयाच्या श्रीमंतीत जायचा....

आजतागायत ती सवय कायम राहिली... आता पगाराचे पैसे जमा होतात आणि सोबत अतुलच्या खिशातले... पण, यंदा मोदींमुळे जरा लवकरच करावा लागला हा सोहळा. यावेळीही नेहमीसारखीच मजा आली....काय माहीत का....पण ही श्रीमंती मला खूप सुखावून जाते....

सांगण्याचा हेतू हाच मित्रांनो....

डॉक्टर असो वा इतर कोणीही असो...

दिवसागणिक 100 रुपये मिळवणारा असो वा लाखो मिळवणारा असो...आयुष्यातली या छोट्या छोट्या क्षणाची श्रीमंती आयुष्य समृद्ध करते... जगण्याची ऊर्जा देते... सुख दुःखाचा खेळ तर चालतच रहातो आयुष्यात... पण, त्या पल्याड जाऊन जेव्हा प्रत्येक क्षणाला आपण आनंदी बनवायचा प्रयत्न करू लागतो ना...आयुष्यच खरं गणित खरतर तेव्हा सुटायला लागतं...मग सगळे क्षण फक्त निमित्त बनतात समाधान निर्मितीचे. सगळ्या क्षणांना ओढ लागते हास्याची...प्रत्येक क्षणातलं जगणं उमलायला लागत...आयुष्य बहरायला लागतं...

मग कधी आयुष्य वाढदिवसाच्या केकमध्ये उजळत. कधी होळीच्या, रंगपंचमीच्या रंगात रंगून जात. इंद्रधनुचे सारे रंग आपल्यावर उधळवून देतं. कधी डॉक्टरकी विसरून बालपणीच्या झोकळ्यावरती अलगद झुलत, कामाच्या ताणामय घसरगुंडीवरून हळूच घसरून हास्यमय गवताच्या कुशीत शिरत. कधी जुने छंद जोपासत समाधानाची झुळूक देत. तर कधी लहानग्यांच्या निरागस एक्स्प्रेशनच्या आठवणीतही आपलेपणानं हसत. कधी किचनमधल्या कलाकृतीमधून स्वादिष्ट होत रहातं.

हे रोज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात होत. फक्त आपण पहायला विसरतो. आमचे मेडिकोज तर हरवून टाकतात जगण्यातल गमक. कारणं खूप आहेत तशी. डॉक्टरला लोकांनी मारलं यापेक्षा लोकांनी दाखवलेला अविश्वास कित्येक पटीने छळतो डॉक्टरांना. घालवलेली वर्ष, जीव तोडून केलेला अभ्यास, रात्रपाळीच्या नोकऱ्या, बिघडलेली दिनचर्या...असो...हा तसा मोठा विषय...त्यावरही लिहू नंतर...

पण डॉक्टरांसोबत सगळ्यांनीच, वेळीच जाणून घ्या... आयुष्य म्हणजे श्वासांच फक्त येणं जाण नव्हे...रोजच्या दगदगीच्या आयुष्यात हजारो कारणं मिळतील चेहऱ्यावरच्या नाराजीची...पण लाखो कारणही मिळतील...हास्याची कळी फुलवण्याची...चला तर मग क्षणांमधल जगणं जपुया...

मी तर अनुभवते...तुम्ही ही अनुभवा...

डॉ. चारूशीला जाधव

भोपाळ

Updated : 6 April 2017 6:40 PM GMT
Next Story
Share it
Top