Home > मॅक्स ब्लॉग्ज > आधुनिक फ्रेच क्रांती

आधुनिक फ्रेच क्रांती

आधुनिक फ्रेच क्रांती
X

अखेर इम्यानुएल मॅक्रॉन यांनी फ़्रांसच्या राजकारणात सर्वात तरुण वयाचे अध्यक्ष होण्याचा मान मिळवला. स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे असलेले मॅक्रोंन यांनी इलेक्शन कँपेनच्या दरम्यान खुल्या आर्थिक धोरणाचा पुरस्कार अणि यूरोपियन देशांशी संबंध मजबूत करण्याच मानस असल्याचे आपल्या अजेंड्य़ामध्ये जाहिर केले अणि त्याच्या आधारावर त्यांनी विरोधी उमेदवार असलेल्या ली पेन यांच्या यूरोपियन यूनियन अणि नाटोतून बाहेर पडण्याच्या धोरणाचा विरोध करीत त्यांच्या संकुचित राष्ट्रवादाचा पराभव केला.

ही अध्यक्षीय निवडणुक कँपेन खरेतर बऱ्याच बाबींमुळे गाजली. संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीकड़े लागलेले होते. ली पेन पेक्षा इम्यानुएल मॅक्रॉन जगभरात जबरदस्त चर्चेचा विषय झालेले होते पण ते वेगळ्या कारणाने. मॅक्रोंनबाबत होत असलेल्या चर्चांचा रोख हा निवडणुकीसंदर्भात किंवा त्यांनी जाहिर केलेल्या अंतरराष्ट्रीय धोरणांसंबंधित नसून त्यांच्या व्यक्तिगत निवडी सबंधित होता. मॅक्रॉनची बायको अणि आता फ़्रांसची फर्स्ट लेडी झालेली ब्रिजिट त्रोड़ोक्स ही मॅक्रॉन पेक्षा २४ वर्षांनी मोठी आहे. आपल्या पहिल्या नवऱ्यापासून त्याच्याच वयाची तिला मुले आहेत. अणि दोनचार नातवांची ती आजी देखिल आहे. पण तरी देखिल मक्रोंन अणि ब्रिजीट गेली दहा वर्षे हैप्पिली मैरिड आहेत. इतकेच नव्हे तर ब्रीजीटचा पहिल्या नवर्यापासून असलेला मुलगा अन मुलगी मॅक्रोंनच्या प्रचाराची संपूर्ण सूत्रे हालवित होते.

पण बाकी जगभरातल्या लोकांच्या खरंतर पुरुषांच्या डोळ्यात हे विजोड जोडपं फारच खुपत आहे. त्यांना हे सहनच होत नाहीये की एवढ्या देखण्या कर्तबगार पुरुषाने आपल्यापेक्षा २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या बाईशी लग्न करावं अणि वरून समाधानी, खुशही असावं ! हेच मुळी त्यांच्या डोळयात सलतंय़.

चीनसारख्या देशात मॅक्रॉन निवडून आल्यास फ़्रांस सोबत अंतरराष्ट्रीय धोरण कसे असेल यावर चर्चा होण्यापेक्षा त्याच्या बायकोची चर्चा जास्त होत होती. भारतातील पुरुष तर त्याला ठार वेडा समजत आहेत. काही लोकांनी मॅक्रॉन गे असण्याचा अंदाज काढला पण मॅक्रोंनने जाहीररित्या गे नसण्याची कबुली दिली. बरं यासंदर्भात एक महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप अणि त्यांच्या बायकोतदेखिल २४ वर्षांचे अंतर आहे. ट्रंपची बायको मेलनी ही त्यांच्या पेक्षा २४ वर्षांनी लहान आहे. पण त्यांच्या निवडणुक कँपेनदरम्यान हा मुद्दा कुणालाच महत्वाचा वाटला नाही. शेवटी काय तर स्त्रियांसाठी अणि पुरुषांसाठी पूर्ण जगात वेगवेगळी परिमाणं आहेत हेच एकदा परत अधोरेखित झालं.

गेल्या चाळीस हज़ार वर्षांतील स्त्री पुरुष संबंधांचा इतिहास बघितला तर यामागची खरी गोम लक्षात येईल. नितिनियम विरहित अवस्थेपासून ते विवाह संस्था अंगीकारण्य़ापर्यंत पुरुष अणि स्त्री विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यातुन गेलेले आहेत. स्त्रीला निसर्गाने मातृत्वपद दिल्यामुळे स्थैर्य अणि निवाऱ्याची अधिक गरज भासली. ती गुहेमधे स्थिर झाली अणि त्याच्या बऱ्याच काळानंतर पुरुष गुहेत रहायला लागले. त्या काळात स्त्रीपुरुष संबंध स्वैर होते. एकमेकांवर कसलीच बंधनं नव्हती. एकमेकांच्या टोळयांमधे किंवा कुळात जावून स्त्रीपुरुष एकमेकांसोबत रमत असत. त्यापासून होणारी मुले ही मामा आज्यांकड़े म्हणजे आपल्या मातृ कुळात रहात असत. तेव्हा स्त्रीवर पुरुषाकड़े जाउन राहण्याची सक्ती नव्हती उलट पुरुषच स्त्रीकडे जाऊन राहत असत. ही प्रथा आजही काही आदिवासीं जमातींमधे जिवंत आहे. स्त्रीपुरुष संबंधांमध्ये मोकळीक होती. कुठल्याही प्रकारची बंधनं किंवा जोरजबरदस्ती एकमेकांवर नव्हती. कुठल्याही पुरुषाला किंवा कुठल्याही स्त्रीला कुठेही आणी कुणा बरोबर जाण्याची राहण्याची बंदी नव्हती. स्त्रिया शेती करीत अणि पुरुष शिकार करीत. शेती करण्यासाठी नांगराचा शोध लागल्या नंतर पुरुष शेती करू लागला कारण नांगर अवजड असल्याकारणाने स्त्रिया ते उचलु शकत नसत. त्यामुळे कालांतराने त्यांनी शेतीकाम करणे बंद केले व मुलांचे संगोपन करण्यात त्या वेळ घालवू लागल्या. पुरुष लढाया करू लागले जमीनी जिंकुन आणू लागले, जमीनी कसू लागले. शरीर संबंधांमुळे मूलं होतात ही जाणीव नुकतीच त्यांच्यामध्ये विकसित झालेली होती. बायबलमध्ये असे नमूद आहे की, स्त्रीच्या प्रजोत्पदानाच्या सामर्थ्यामुळे पुरुषामधे स्वत:च्या सिमित सामर्थ्याबद्दल न्यूनगंड यायला लागला अणि इतर पुरुषामुळेही तिला मूल होऊ शकतं याविचाराने स्त्रियांना अणि त्यांच्या पासून होणाऱ्या मुलांना आपल्या ताब्यात ठेवण्याची कल्पना त्याला अस्वस्थ करू लागली. पुरुषाला स्वत:पासून जन्मलेले अपत्य जमींन कसण्याकरीता, शिकारीकरीता मदत म्हणून देखिल आवश्यक वाटू लागले. तसेच स्वत:चे शारीरिक संबंध असलेल्या स्त्रीयांबरोबर इतर पुरुषांनी शरीर संबंध ठेऊ नये अशी इर्षा त्याच्यामधे जागु लागली. म्हणून मग स्त्रियांवर अणि त्यांच्यापासून होणाऱ्या अपत्यांवर मालकी हक्क दाखविण्यासाठी त्याने विवाह संस्था निर्माण केली. स्त्रीवर विवाहाचे बंधन लादले.

स्त्रिया कालांतराने आपले मातृकुल सोडुन पुरूषांकडे रहायला येऊ लागल्या. अपत्य संगोपनामुळे स्त्रियांमध्ये वात्सल्य, ममत्व या भावना वाढीस लागलेल्या होत्या. मात्र पुरुषांमधे तेव्हाही रानटीपणा अणि हिंसकपणा बऱ्याच अंशी शिल्लक होता. स्त्रीला आपल्या ताब्यात ठेवण्य़ाकरिता तो नाना तर्हेच्या खबरदारया घेऊ लागला.

विवाह झाल्यानंतर स्त्रिया कायम आपल्याकडेच रहाव्यात आपल्या वर्चस्वाखाली रहव्यात याकरीता त्याने काळजीपूर्वक त्यांची निवड करायला सुरुवात केली. निसर्ग अंगापिंडाने कमकुवत असलेल्या स्त्रीला तो आपल्या बाहूबलाने रिझवू लागला. शरीराने सडपातळ असलेल्या स्त्रियांना तो पसंती देऊ लागला. आपल्यापेक्षा वयाने लहान तसेच ऊँचीने कमी असलेली स्त्री तो आपल्याकारिता निवडू लागला. याद्वारे नैसर्गिकरित्या स्त्रीवर ताबा ठेवणे त्याला शक्य होत गेले अणि श्रेष्ठवाच्या भावनेला खतपाणी मिळत गेले. त्याला आपल्या मालकीची स्त्री इतर पुरुषाकड़े जाण्याची कल्पना असह्य वाटू लागली. लढवैय्या पुरुष लढाया करूंन स्त्रीला जिंकु लागला. नैसर्गिकरित्या पुरुष शक्तिशाली असल्यामुळे स्त्रीजातीवर वर्चस्व स्थापन करणे त्याला सोपे गेले. खरेतर स्त्री मुलांचे संगोपन करण्यात जास्त गुंतली म्हणून तिला बाहेर जगात कर्तबगारी दाखवता आली नाही. याउलट पुरुष मोकळा असल्यामुळे तो जमीनी, सत्ता हस्तगत करत गेला. त्यातून त्याचा अहंकार उत्तरोत्तर वाढत गेला. स्त्रीला एक जिंकलेली वस्तु म्हणून बघण्याकड़े त्याचा कल वाढत गेला.

जिंकलेल्या स्त्रियांवर स्वताःचे लेबल लावण्याचा प्रकार म्हणजेच मंगळसूत्र घालण्याची कल्पना यातूनच पुढे आली. कुठे लाल कुठे सफ़ेद तर कुठे हिरव्या बांगड्या घातल्या गेल्या तर कुठे कुंकू लावण्याची प्रथा सुरु झाली. कुठे माथ्यावर सिंदूर भरण्याची परंपरा सुरु झाली. कुठे तिला इतर पुरुषांच्या नजरेपासून वाचविण्याकरीता पर्दानशी करण्यात आले तर कुठे तिला घूँघट, पदरात राहण्याचे बंधनं तिच्यावर घालण्यात आले. या सर्व प्रक्रियेत सर्वात मोठे षडयंत्र म्हणजे तिचे नामकरण करण्याचा प्रकार म्हणजेच संपूर्ण आइडेंटिटी बदल होय ! तिचे पैतृक नाव कुळनाव बदलण्याचा प्रघात पुरुषाने पाडला अणि स्त्रीनेही कालांतराने त्याच्या पुढे नांगी टाकली. बरेचदा स्त्रिला पळवून किंवा लढाई करुन जिंकून आणल्या जात असे. जिंकून आणलेल्या आणि विवाह केलेल्या स्त्रीच्या अस्तित्वावर स्वताच्या कर्तबगारीचे बिरुद पुरुष मिरवू लागला. या सर्वांचा एकत्रित अन्वयार्थ म्हणजे ही माझी स्त्री आहे. हिच्यावर माझा मालकी हक्क आहे. हिच्याकडे कुणी बघू नये असे तो इतर पुरुषांना धमकीवजा इशारा होता. हळूहळू अश्या स्थित्यंतरांमुळे स्त्रीचे स्वातंत्र्य संपूर्णपणे पुरुषाच्या आहारी गेले. पत्नीप्रमाणेच मुलींवर, बहिणींवर, अगदी मातांवर ही नैतिकतेची ही अघोषित बंधनं वाढत गेली.

विवाह करून सामाजिकरित्या मालकी हक्क जाहीर केल्यानंतर पुरुषाने तिचे मानसिक प्रोग्रामिंग सुरु केले. स्त्रीने इतर पुरुषाशी संबंध ठेवू नये म्हणून नैतिकतेच्या पोकळ कल्पना मग आकारास येऊ लागल्या. आणि स्त्रियांवर त्या जास्त लाद्ल्या गेल्या. परपुरुषाशी संबंध म्हणजे पाप, वडिलांची नवऱ्याची आज्ञा पाळणारी स्त्री सत्शील असे संस्कार तिच्यावर होत गेले. तिने पुरुषांच्या आज्ञा पाळाव्या म्हणून लहानपणापासून संस्कारांच्या नावाखाली पाळीव प्राण्यासारखे तिला ट्रेनिंग दिले गेले. स्त्रीपुरुष समानता कालांतराने नष्ट होउन पुरुषाचे श्रेष्ठत्व स्त्रीने मान्य केले अणि समाजात तिचे दुय्यम स्थान कालपरत्वे पक्के होत गेले. उत्क्रान्तिचे जनक चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतानुसार स्त्रीपुरुष विकासाचा एकंदरीत इतिहास म्हणजे एका शक्तिशाली प्रजातीचा दुसऱ्या कमकुवत प्रजातीवरील विजय होय.

हा संपूर्ण इतिहास बघता स्त्रीपुरुष संबंधांमधे वयाचा फरक हा केवळ पुरुषाने स्त्रीवर वर्चस्व ठेवण्यासाठी वापरलेले एक अस्त्र होते असे दिसुन येते. आणि का्य फरक पडतो पुरुष अणि स्त्री यांच्या वयात फरक असल्याने, शारीरिक संबंधावर? काहीच नाही ! स्त्री जशी वयाने थोराड असलेल्या पुरुषाला मान्य करते तसेच पुरुषानेही स्त्रीला मान्य करायला काय हरकत आहे? याबाबतीत एक मतप्रवाह असा आहे की स्त्रियांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा पुरुषांच्या तुलनेत लवकर संपते. म्हणजे मुले झाली की, प्रत्येक स्त्रीला शरीर संबंध दुय्यम महत्वाचे वाटू लागतात. यात खरंच तथ्य आहे का? अणि जर तथ्य असेल तरीही ते का स्थापित झाले हा विचार कुणी केला का? स्वत: स्त्रीदेखिल करीत नाही. कारण तिच्यावर झालेले हजारो वर्षांचे प्रोग्रामिंग म्हणजेच संस्कार तिला स्वतः बद्दल, स्वतःच्या लैंगिक गरजांबद्दल विचारच करू देत नहीं. याउलट तिला लहानपणापासून आपली लैगिकता कशी दाबुन ठेवावी हेच शिकवले जाते. समाजही यात महत्वाची भूमिका बजावत असतो. पुरुष आपल्या लैंगिकतेचा आविष्कार विविध मार्गांनी करतो. तो एक नव्हे तर दहा प्रेमप्रकरणं करतो, बाहेरख्यालीपणा करतो. स्त्रीला अशी मुभा आहे का? नवरा कितीही म्हातारा असला अणि ती कितीही तरुण असली तरी तिने आपल्या लैंगिकतेचा आविष्कार फक्त नवऱ्यासाठी राखून ठेवावा असे तिच्याकडून अपेक्षित असते. मात्र समाजाने पुरुषांना नैतिकतेचे असे कुठलेच कुंपण घातलेले दिसत नाही. स्त्रियांची शारीरिक गरज ही पुरुषांइतकीच तीव्र असुनही हजारो वर्षांपासून तिने दाबुन ठेवल्यामुळे ती क्षीण गेली आहे अणि म्हणून पुरुषांपेक्षा कमी वयात तिच्या लैंगिकतेला ओहोटी लागत असावी. पुरुष वयाने कितीही मोठा असला तरी तो आपल्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रीवर आपला हक्क समजतो. तिच्याशी फ़्लर्ट करतो, प्रेम करतो, लग्न करतो. हेच जर स्त्रीने केले तर केवढा कांगावा केल्या जातो. भारतीय समाजात तर अश्या स्त्रीला बहिकृत करण्यापर्यंतची मजल गाठली जाते. स्त्रीने आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषाचा विचारही करणे गुन्हा असल्याचे या पुरुषप्रधान संस्कृतीने हजारो वर्ष तिच्यावर बिंबवले आहे.

कॉप्युटरच्या भाषेत म्हणायचे झाल्यास आताच्या बदलत्या काळात स्त्री आपले हे हजारो वर्षांचे प्रोग्रामिंग झुगारू पाहत आहे अणि स्वत:ची नविन ऑपरेटिंग सिस्टिम विकसित करीत आहे. फ़्रांसमध्ये एक ६०० पानी सर्व्हेनुसार ९५% स्त्रिया ह्या आपल्या वयाच्या ५० वर्षे वयानंतरही सेक्शुअली अॅक्टीव आहेत. फ़्रांसमध्ये आता महिला उघडपणे विचारू लागल्या आहेत का म्हणून आम्ही लहान वयाच्या पुरुषांशी डेटिंग करू नये, लग्न करू नये? निवडणुकीच्या तोंडावर फ्रेंच महिलांचे मत विचारात घेता जवळपास १०० टक्के महिलानी मॅक्रॉनच्या स्त्रीवादी, मुक्त पुरोगामी विचारांना पसंती दिली तसेच त्याचे ब्रिजिटशी लग्न म्हणजे प्रस्थापित पुरुषप्रधान संस्कृतीला मारलेली ठोकर होय असे बहुतांशी महिलांना वाटते. तर बऱ्याच जणींना ब्रिजिट अणि मॅक्रॉनचे लग्न म्हणजे प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेवरील सूड वाटतो. मॅक्रॉनच्या विजयात या विचार प्रवाहाचे निश्चितच महत्व आहे.

ब्रिजिट त्रोड़ोक्स अणि इम्यानुएल मॅक्रॉन आणू पाहत असलेली स्त्रीपुरुष समानतेची ही फ्रेंच क्रांती स्त्रीपुरुष इतिहासात महत्वाची मानली पाहिजे. यामुळे जगातील करोडो महिलांना आपल्या स्त्रित्वाची वयोपरत्वे क्षीण होणारी जाणीव हिरवी होण्यास नक्कीच उभारी मिळालेली आहे.

माझ्य़ामते ही आधुनिक फ्रेंच क्रांती आहे. ही क्रांति जगभरात वेगाने पसरणार आहे. पुरुषांच्या एकाधिकारशाहीला आता सुरुंग लागणार एवढे नक्की !

जयश्री इंगळे

Updated : 9 May 2017 11:53 AM IST
Next Story
Share it
Top