अँकरिंगचा ‘जिवंत’ धडा!
X
अरे! काय हे? ही काय अँकर आहे. काय बोलतेय? कुणालाही बसवतात चॅनेलवाले! न्यूज चॅनेलवर एखादी बातमी आपल्या मता आणि मनाविरोधात असली की सर्रासपणे येणाऱ्या प्रतिक्रिया. फार क्वचितच जणांना माहीत असेल (इलेक्ट्रॉनिक मीडिया वगळता) जगभरातल्या घडामोडी अँकर मांडत असले तरी त्यामागे एक मोठी टीम काम करत असते. त्यातील अनेक तर कायम पडद्यामागेच असतात. मात्र त्यांचे परिश्रम सर्वात जास्त असता. अँकर बातम्या लाईव्ह सादर करताना एकही चूक होऊ न देता, काहीही बातमी आली तरी ती नेहमीच्या कौशल्याने प्रवाहात अडथळा येऊ न देता सादर करण्याच्या दडपणाखाली असतो, ते त्याचे तोच जाणतो!
अँकर चॅनेलचा चेहरा... चॅनेलची ओळख... पण, अँकरही सर्वांसारखा एकमाणूसच. संवेदना, भावभावना त्यांनाही आहेत, असतात. ज्यांनी अँकरिंगचा खराअर्थ शिकवला त्या माझ्या गुरु ज्येष्ठ अँकर माधुरी गुंटींचं वाक्य आयुष्यभर लक्षात राहण्या सारखं. त्या म्हणायच्या “वृषाली, काहीही झालं तरी लक्षात ठेव आपले टेन्शन, घरातले, ऑफिसमधले वाद स्टुडिओच्या चौकटीबाहेर ठेवायचे आणि आत जायचे. बुलेटिनचा अर्धा तास स्टुडिओच आपलं विश्व आणि पीसीआरने दिलेल्या कमांड म्हणजे त्या अर्ध्यातासातल्या विश्वात पुढे जाण्याचा मार्ग. व्हिज्युअल्स पाहून अंगाचा थरकाप जरी उडाला तरी न डगमगता त्या घटनेनुसार आपली भूमिका आपल्या शब्दांमधून, साजेशा आवाजातून, न डगमगता मांडता आली पाहिजे.” ही माधुरी मॅडमची शिकवण आजही आठवते. त्या काल माझ्या डोळ्यापुढे उभ्या राहिल्या ज्यावेळी'ती' बातमी मी वाचली.
छत्तीसगडच्या आयबीसी२४ वृत्तवाहिनीच्या निवेदिकेने आपल्या पतीच्या निधनाची बातमी दिली. सुप्रितकौर भिलाईच्या रहिवाशी. वर्षभरापूर्वीच लग्न झालेलं. पत्रकारितेत 9 वर्षांपासून. सुप्रितने बातमी दिली एका अपघाताची. छत्तीसगडमध्ये एका गाडीला अपघात झाला. 5 पैकी 3 जणांचा मृत्यू झाला. प्रतिनिधीच्या माहितीवरुन तिला कल्पना आली अपघाताची जागा, गाडीचे मॉडेल, वेळ हे सारे तिच्या पतीच्या त्यादिवसाच्या प्रवासाशी जुळतंय. अपघात झालेली डस्टर गाडी तिच्या पतीचीच असावी. पण मनातील ही घालमेल जाणवू दिली नाही. तिने फोनो नेहमीच्या पद्धतीने घेतला. दर्शकापर्यंत त्या अपघाताची सविस्तर बातमी पोहचवली. त्याही स्थितीत न कोसळता तिने बुलेटीन पूर्ण केलं. बाहेर आल्यावर तिने सविस्तर माहिती घेतली तेव्हा तिला कळलं आपल्या मनातील शंका खरीच आहे. तिने फोनाफोनी करुन पुन्हा खात्री केली. तिला लक्षात आलं आज आपण आपल्या पतीच्याच अपघाती मृत्यूची बातमी दिली. मग मात्र ती कोसळली.
https://youtu.be/l2cR0meHodE
सौजन्य - आबीसी24
माझी आजतकमधली मैत्रिण शिवांगी ठाकूरने सुप्रितला सलाम म्हणतFB वर ही घटना पोस्ट केली. अपेक्षेप्रमाणे काही निगेटीव्ह कमेंट्सही आल्या. तुम्ही का तिच्या जखमेवर मीठ चोळताय वगैरे वगैरे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना नकारात्मक प्रतिक्रिया मांडायच्या होत्या, त्यांनी त्या मांडल्या. मात्र अँकर म्हणून, एक पत्नी म्हणून सुप्रितवर काय बेतलं असेल याची कल्पना करुन तर पाहा. मग तुमच्या लक्षात येईल की शिवांगी, मी आणि आमच्यासारख्या अँकरना सुप्रितला सलाम करणं आवश्यक नव्हे तर कर्तव्यच का वाटतं ते!
पत्रकारितेत महिला पत्रकारांचं अँकरिंग फक्त एन्टरटेनमेंट आणि सॉफ्टन्यूज, शोजसाठी मर्यादित नाही. त्याही कणखर, परखडपणे आपल्या भूमिका मांडणा-या, कोणतीही बातमी तटस्थपणे हाताळणा-या आणि काहीही झालं तरी बुलेटीन, शो आभाळ जरी कोसळलं तरी निर्विघ्नपणे पुढे नेणा-या आहेत. आपल्या इंडस्ट्रीत अशा अनेक महिला अँकर आहेत. ज्यांच्या व्यावसायिकतेला सलाम करावासा वाटतो.
अनेक अडचणी असतात. मनात वादळ उठलेलं असतं. काहींच्या मनात काहीवेळा कौटुंबीक वादाचं वादळ मनात उठलेलं असतं. काही ठिकाणी कार्यालयीन राजकारणाच्या चटक्या-फटक्यांचा त्रासानंही काहींचं मन विटलेलं असतं. काहीवेळा कार्यालयाकडे येताना प्रवासात स्त्री म्हणून किंवा फक्त माणूस म्हणूनही आलेले वाईट अनुभव असतात. जे माणूस म्हणून अस्वस्थ करतातच. तरीही ते सारं आतल्या आत तसंच ठेवत अस्वस्थ मनाला गुंतवायचं असतं ते फक्त बातमीमध्ये. भावनात्मक विषय हाताळताना मात्र अगदीचं कोरडं राहून चालत नसतं. त्यावेळी भावनाही ओताव्या लागतात. समरस व्हावं लागतं. अर्थात वाहून न जाता. मात्र ते सारं दुसऱ्यांसाठी. स्वत:च्या नाही.
सुप्रितने ज्या धीरोदात्तपणे त्या प्रसंगाचा सामना केला तो पत्रकारितेतील आम्हा सर्व अँकर्ससाठी एक जिवंत धडा आहे. सुप्रीतच्या दु:खात सहभागी होतानाच ती ज्या पद्धतीने त्या घटनेला सामोरी गेली, चेहऱ्यायावर दु:खाचा लवलेषही न आणता तिनं अँकर म्हणून आपलं व्यावसायिक कर्तव्य बजावलं ते वाखाणण्याजोगं आहे. तिला खरंच मनापासून सलाम!
- वृषाली यादव, अँकर, जय महाराष्ट्र
Twitter - @VrushaliGYadav
Email –[email protected]