Home > News Update > अख्खं गावचं गेलं सुट्टीवर...

अख्खं गावचं गेलं सुट्टीवर...

अख्खं गावचं गेलं सुट्टीवर...
X

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. सामान्य कुटुंबाचं उन्हाळी सुट्ट्यांचं नियोजन असतं. मात्र, संपूर्ण गावचं सुट्टीवर गेल्याचं तुम्ही ऐकलंय का. तर हो...रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातलं बलाप हे अख्खं गावच तीन दिवसांच्या सुट्टीवर गेलंय.

सुट्टीवर जाण्याच्या परंपरेचा इतिहास

सुमारे १०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून बलाप इथले ग्रामस्थ दर ९ वर्षांनी गावाच्या वेशीवरच स्थलांतरित होतात. याला रीघवनी परंपरा असंही ग्रामस्थ म्हणतात. पूर्वीच्या काळात जेव्हा साथीचे रोग व्हायचे तेव्हा ग्रामस्थ गाव सोडून स्थलांतरित व्हायचे. कालांतरानं या परंपरेत अनेक बदल झाले. गेल्या काही वर्षांपासून ९ वर्षांतून एकदा ग्रामस्थ तीन दिवसांच्या सुट्टीसाठी गाव सोडून जातात. त्याला काही जणं अंधश्रद्धाही म्हणूनही समजतात. मात्र, मॅक्स महाराष्ट्रनं थेट या ग्रामस्थांकडूनच जाणून घेतलंय की वस्तुस्थिती काय आहे ती.

रीघवनी परंपरा नेमकी काय...

दर नऊ वर्षांनी येणाऱ्या मे महिन्याच्या पहिल्या अमावस्येला गावातील सर्व लोक घरांना कुलूप लावून गाव सोडतात. आणि गावाबाहेर वेशीवर शेतात खोपटे किंवा झोपड्या करून साधारण तीन दिवस राहतात. हे ग्रामस्थ शुक्रवारी (3 मे) सकाळी 7 वाजता बाहेर पडले आहेत. साधारण 35 झोपड्या (खोपटे) बांधल्या आहेत. गावातील अंदाजे 325 अबाल-वृद्ध व तरुण तेथे राहत आहेत. शनिवारी (4 मे) रात्री गावात सर्व लोक जाऊन बोकड कापणार आणि पारंपरिक विधी करणार आहेत. त्यांनतर रविवारी (5 मे) सर्व गावकरी पुन्हा आपापल्या घरी जाणार आहेत. यावेळी ग्रामस्थांचं खाणंपिणं इथेच होतं. अशी ही जुनी प्रथा जोपासली जात आहे. नोकरी, रोजगारानिमित्त बाहेर गावी राहणारे लोक सुद्धा आता या प्रथेसाठी आले आहेत. सर्वजण एकत्र येऊन मजा व मनोरंजन करणे असे सध्या या प्रथेचे स्वरूप आहे. एक प्रकारे या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात असे राजेंद्र खरीवले या ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. राबगाव या गावात देखील अनेक वर्ष ही प्रथा सुरु होती मात्र काळानुरुप बदल करित ग्रामस्थांनी ही प्रथा बंद केली.

संसर्गजन्य रोगाची साथ एखाद्या गावात आल्यावर गाव रिकामे करून गावाबाहेर राहिल्यानंतर साथ आटोक्यात येते, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे गाव टाकणी करून असे आजार नियंत्रणात येणे शक्य नाही. गाव टाकणी सारख्या रूढी-परंपरांची चिकित्सा करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत या गावातल्या नागरिकांशी संवाद साधून याबाबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated : 6 May 2019 3:28 PM GMT
Next Story
Share it
Top