Home > Election 2020 > नवलेवाडी EVM प्रकरणाचं सत्य...

नवलेवाडी EVM प्रकरणाचं सत्य...

नवलेवाडी EVM प्रकरणाचं सत्य...
X

कोरेगाव मतदारसंघातील नवलेवाडी (Navalewadi) गावात मतदान करताना ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Tampering) घोळ असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या. त्यानंतर देशातील सर्व माध्यमांची नजर नवलेवाडी गावाकडं गेली. ईव्हीएम मशिनचं कोणतंही बटन दाबलं तरी मतदान भाजपला म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हाला मत जात असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. गावकऱ्यांनी ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितली.त्यानंतर या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी ही बाब मान्य करुन तात्काळ ईव्हीएम मशीन बदलल्या.

या संदर्भात ‘सकाळ’ वृत्त समुहाच्या ‘सकाळ’ ऑनलाईन आवृत्तीने दिलेल्या वृत्तात

दिपक रघुनाथ पवार हे मतदान करण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांनी त्यांना बॅलेट दिला. पण मतदान करण्यापूर्वीच कमळाच्या चिन्हापुढचं लाईट लागून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आरोप त्यांनी केला. असाच प्रकार रोहिणी दीपक पवार, आनंदा ज्ञानेश्वर पवार, माजी उपसरपंच सयाजी श्रीरंग निकम, प्रल्हाद दगडू जाधव, दिलीप आनंदा वाघ यांच्यासोबतही घडल्याचं त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर आमदार शशिकांत शिंदे तिथं पोहोचले. त्यांनी मतदार, कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्यासमोरही असाच प्रकार घडल्यामुळे त्यांनी मशिनमध्ये बिघाड असल्याचं सांगितलं. त्यानंतर ते मशिन सील करून नवीन मशिनवर पुढचं मतदान घेण्यात आलं. असं सकाळने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

Courtesy : Sakal Online

तसंच या संदर्भात मुख्य वाहिन्यांनी देखील यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्र निवडणूक 2019 : घड्याळ्याचं बटण दाबलं तरी मत कमळाला? जाणून घ्या साताऱ्यात नेमकं काय झालं ! या ठळक मथळ्याखाली लोकमत ऑनलाईन ने वृत्त दिलं होतं.

या वृत्तात सकाळी 10-11 वाजण्याच्या सुमारास ईव्हीएममध्ये घडाळ्याचे बटन दाबले असता कमळाचे म्हणजेच भाजपाच्या उमेदवाराला मत जात असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, यामागची माहिती जाणून घेतली असता खरे सत्य समोर आले..

सकाळी 10 च्या सुमारास या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला. यामुळे मतदान करताना एरर दाखवू लागले. वरचे किंवा खालच्या बाजुचे कुठलेही बटन दाबले जात असता ते दाबलेच जात नव्हते. याबाबतची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकाराची माहिती राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना लागली. ईव्हीएममध्ये बिघाड की कमळाला मतदान होते याची चाचपणीही त्यांनी केली आणि खरा प्रकार समोर आला.

योगायोगाने शिंदे यांच्या मुलाच्या कारचा चालक नवलेवाडीचा रहिवासी होता. यामुळे शिंदे यांच्या मुलाने मतदान केंद्रावर जाऊन मशीनची पाहणी केली. यावेळी कोणतेच बटन दाबले जात नसल्याचे दिसून आले. शेवटी हे मशीन त्यांच्यासमोरच रिस्टार्ट करण्यात आले आणि मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. यामुळे या मशीनच्या बिघाडाची किंवा तक्रारीची कोणतीच नोंद झाली नाही. मात्र, सकाळपर्यंत घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची अफवा राज्यभरात पसरली होती.

एबीपी माझा या वृत्तवाहिनेने देखील या संदर्भात ‘कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळालाच', साताऱ्यातील प्रकार’ या मथळ्याखाली वृत्त दिलं आहे.

प्रशासनं काय म्हणतंय?

"विविध इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांमध्ये मतदान केंद्र क्रमांक 250, नवलेवाडी, ता. खटाव, जि. सातारा इथं सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Election 2019) करिता मतदान प्रक्रियेबाबत बातमी प्रसिद्ध झाली आहे. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रतिनिधी दीपक रघुनाथ पवार आणि दिलीप आनंदराव वाघ हे यंत्राची चाचणी घेताना उपस्थित होते. यावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असतानाही कोणत्याच मतदाराने असा आक्षेप घेतला नाही. दिपक रघुनाथ पवार यांनी दुपारी आक्षेप घेतल्यानंतर त्यानां संबधित केंद्राध्यक्षांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरून देण्यास सांगितलं. पण त्यांनी तसं करण्यास नकार दिला, त्यानंतर या मतदान केंद्रावरची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती. या तक्रारीमध्ये कोणतंही तथ्य नाही. तसंच अशी कोणतीही घटना घडलेली नाही."

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/789948574768710/?t=88

काय आहे सत्य... मॅक्समहाराष्ट्रचा ग्राउंड रिपोर्ट...

साताऱ्यात धो धो पाऊस सुरु होता. पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या पावसाने मोठा तडाखा बसला आहे. अशा परिस्थितीत मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर भर पावसात या गावाकडे जायला निघाले. मात्र, पावसामुळे त्यांना पुढं जाणं शक्य नव्हत. त्यातच नुकताच पश्चिम महाराष्ट्रात पूर आल्यानं या भागातील लोकांच्या मनात अजुनही पुराच्या दहशतीचं वातावरण आहे. म्हणून एका वस्ती वरील भल्या माणसांनी त्यांना रात्री पावसाचा काही भरोसा नाही म्हणून पुढं जाऊ दिलं नाही. त्यानंतर सकाळी उठून सागर तात्काळ नवलेवाडीत जाऊन पोहोचले.

रिपोर्ट वाचण्यापुर्वी या मुद्यांचा विचार नक्की करा...

१) असे काही घडले नाही मग निवडणुकीच्या दिवशी झालेला गोंधळ खोटा होता का ?

२) असे घडले नाही मग ई व्ही एम बदलून दुसऱ्या मशीनवर २८ मतं का घेण्यात आली.

३) कार्यकर्त्यांनी केलेला लेखी तक्रार अर्ज का स्वीकारला नाही.

४) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या लेखी तक्रार अर्जावर भाजप शिवसेना पोलिंग प्रतिनिधीची सही आहे. घटनेत तथ्य असल्याशिवाय ती का केली गेली?

५) लोकांची तक्रार आली नाही म्हणून अशी घटना घडली नाही असे म्हणणे एका पक्षाची बाजू घेणे नव्हे का?

६) तेथील अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी करून कारवाई का केली का?

७) ज्या प्रकारे सातारा निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे. तो पटण्यासारखा आहे का?

नवलेवाडी येथे विधानसभा निवडणूक ई व्ही एम मशीन वर घड्याळाचे बटन दाबले असता कमळाला मत जात असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत निवडणूक आयोगाने असे घडले नसल्याचा खुलासा देखील केला आहे. मात्र, ग्रामस्थ घडलेल्या घटनेवर ठाम आहेत. दिपक रघुनाथ पवार यांनी याबाबत 'मॅक्समहाराष्ट्र'शी बोलताना असं घडलं असल्याचं सांगितलं.

त्यांचे वडील रघुनाथ पवार यांनी विधानसभा उमेदवाराचे बटन दाबल्यावर त्याचे चिन्ह दिसलं. मात्र, त्यांनी विधानसभा उमेदवाराचे घड्याळाचे बटन दाबलं आणि मत कमळाला गेल्याचं त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यावर त्यांना भास झाला असेल असे सांगण्यात आल्याचे ते सांगतात.

दिपक पवार या त्यांच्या मुलाला त्यांनी ही बाब सांगितली असता, त्यांना सुद्धा वडिलांना भास झाला असेल असं वाटून त्यांनी वडिलांना घरी पाठवलं. यानंतर पत्नीच्या बाबतीत देखील हेच झाल्यानंतर मात्र, त्यांची शंका बळावली त्याचवेळी दिपाली पवार यांना देखील हाच अनुभव आला. प्रल्हाद दगडू जाधव हे देखील घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला गेल्याचे सांगतात.

ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांनी मतदान थांबवले व अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. दिपक पवार यांनी शशिकांत शिंदे यांना बोलावले. ते तात्काळ त्या गावात दाखल झाले. त्यानंतर एका मतदाराने माझे मत दुसऱ्याला दिसले तरी चालेल असे सांगून १९३ वे मत घड्याळाला केले व कमळाचे चिन्ह दिसू लागले.

त्या वेळी त्याठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील ही बाब मान्य केली. मात्र, मतदानाच्या ठिकाणी कॅमेरा मोबाईल नेण्यासाठी बंदी असल्याने याचा व्हिडिओ पुरावा तयार झाला नाही. याबाबत दिपक पवार यांनी लेखी तक्रार तयार केली. या तक्रारीवर सदर घटनेचा उल्लेख केला व दोन्ही पार्टीच्या पोलिंग एजन्टची त्यावर सही घेतली.

विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पोलिंग एजंट नामदेव चंद्रकांत पवार यांनी सही देखील केली. मात्र ही लेखी तक्रार त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी स्विकारली नाही. उलट सदर अर्जावर भाजप शिवसेना पोलिंग एजंट यांनी केलेली सही खोडण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला असा आरोप गावकरी करत आहेत.

'या घटनेनंतर फॉर्म १५ हा भरू नये' असा दबाव दिपक पवार यांच्यावर होता. त्यांनी तो दाखल केला आणि पुन्हा मशीन बरोबर चालू लागली. तर माझ्या मागे निवडणूक आयोग लागेल या भीतीने त्यांनी तो फॉर्म भरला नाही. या दिवशी त्या ठिकाणी असलेल्या इंजिनिअर ने देखील मशीन मध्ये दोष असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर ईव्हिएम बदलण्यात आले. त्यावर उर्वरित २९ मतं देखील घेण्यात आली.

माध्यमांमध्ये या बातम्या आल्यानंतर कोरेगाव निवडणूक अधिकारी कीर्ती नलावडे यांनी असं काही घडलं नसल्याबाबत खुलासा केला होता. यात त्या अशी घटना घडली नसल्याचं सांगतात.

या व्यतिरिक्त काँग्रेस राष्ट्रवादीने या प्रकरणावर घेतलेली मवाळ भूमिकेवर देखील प्रश्न चिन्ह उभं राहते. शशिकांत शिंदे यांच्या समोर ही घटना घडली असतानाही त्यांनी प्रतिज्ञा पत्र भरण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना विश्वास का दिला नाही? हे न समजण्यासारखे आहे.

या गावातील लोकांच्या पाठीशी आजही कुणी उभा राहिलेले नाही. लोक सांगतात की, आमच्या डोळ्यासमोर हे घडून आम्हाला वेड्यात काढण्यासारखा हा प्रकार आहे. राष्ट्रवादी तसंच काँग्रेसचे कुणीही वरिष्ठ नेते या लोकांना अजूनही भेटायला आलेले नाहीत. ज्यांच्यासाठी हे कार्यकर्ते ही तक्रार करत आहेत. त्या श्रीनिवास पाटलांनी अद्याप एक फोन देखील केलेला नाही.

त्यामुळे लोकांच्यावर प्रचंड दबाव आहे. या प्रकरणावर काँग्रेस राष्ट्रवादी काय भूमिका घेते? ई व्ही एम आंदोलन उभे करणारे नेते या घटनेवर मूग गिळून गप्प का आहेत? असा प्रश्न उभा राहतो.

Updated : 23 Oct 2019 7:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top