Home > मॅक्स व्हिडीओ > रेवंत रेड्डी...तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचा नायक

रेवंत रेड्डी...तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचा नायक

रेवंत रेड्डी...तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचा नायक
X

तेलंगणामध्ये पहिल्यांदाच काँग्रेस सरकार स्थापन कऱण्याची स्थिती आहे. काँग्रेससाठी तेलंगणमधला हा विजय कुठल्याही जादू पेक्षा कमी नाहीये. काँग्रेससाठी ही जादू करणारी ही व्यक्ती दुसरी कुणी नसून तेलंगण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी आहेत. रेवंत रेड्डी यांनी मावळते बीआरएस पक्षाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री केसीआर यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं.


काँग्रेसला तेलंगणा मध्ये २०१४ च्या निवडणूकीत १९ आणि २०१९ च्या निवडणूकीत २१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळंच काँग्रेससाठी हा विजय खास आहे. तेलंगणमध्ये भाजपला हरविण्याचा प्रश्नच नाही किंवा भाजपला सत्तेवर बसण्यापासून रोखल्याचाही विषय नाही. मात्र, तेलंगणमध्ये सत्ताधारी, प्रादेशिक पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीला सत्तेतून काँग्रेसनं खाली खेचलंय. ज्या दक्षिणेत भाजपचा सुपडा साफ झालाय. त्याच दक्षिणेत काँग्रेसच्या ताब्यात तेलंगणाच्या रूपानं आणखी एक राज्य आलंय. त्यामुळं काँग्रेससाठी हा विजय तसा खास मानला जातोय.

काँग्रेसला तेलंगणमध्ये सत्तेत बसण्याचे स्पष्ट संकेत निकालांनी दिल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. त्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे रेवंत रेड्डी. तेलंगणामध्ये काँग्रेसच्या या विजयाचे नायक म्हणून रेवंत रेड्डी हे नाव पुढं आलंय. रेवंत रेड्डी हे नाव अधिक चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे रेवंत यांचा मूळ स्वभावचं संघर्षाचा आहे. त्यामुळं सामान्यांसाठी संघर्ष कऱणारा नेता म्हणून रेवंत रेड्डी यांचं नाव वेगानं पुढं आलंय. संघर्ष हा स्वभाव असल्यामुळं रेवंत रेड्डी हे टीडीपी सोबत होते त्यावेळी त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. काँग्रेसमध्ये आल्यानंतर तर रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाली आहे.

ABVP पासून राजकीय कारकीर्दीला सुरूवात

रेवंत रेड्डी यांच्या विषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी संघटनेपासून झाली. रेवंत रेड्डींनी तेलंगाणा राष्ट्र समितीसोबतही काम केलंय. मात्र, टीडीपी पक्षाच्या तिकिटावरच ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षासोबत काम केल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसचा हात धरला. रेवंत रेड्डी सध्या काँग्रेसचे खासदार आहेत. याआधी दोन वेळा टीडीपी आणि एक वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. सोनिया गांधींनी २०२१ मध्ये रेवंत रेड्डी यांना तेलंगण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं होतं. तो दिवस रेवंत यांच्या आय़ुष्याला आणि काँग्रेसला कलाटणी देणारा ठरला. कारण तेलंगणामधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत काँग्रेसनं रेवंत रेड्डी यांना तेलंगणमधील महत्त्वाची जबाबदारी दिली. त्यानंतर २ वर्षातच रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसला सत्तेत आणण्याची किमया साधली. तेलंगणमध्ये काँग्रेससाठी खऱ्या अर्थानं ही जादूच आहे.

काँग्रेसमधूनच रेवंत रेड्डींचे पाय खेचण्याचा प्रयत्न

रेवंत रेड्डी यांची कारकीर्द आणखी एका कारणांसाठी रंजक आहे. कारण काँग्रेसच्या तेलंगणामधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनीच रेवंत रेड्डी यांच्या मार्गात अडथळे निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे तेलंगणाचे तत्कालीन प्रभारी एम.पी. हनुमंत राव यांनी तर उघडपणे रेवंत रेड्डी यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. कारण काय तर रेवंत रेड्डी यांची पार्श्वभूमी ही एबीव्हीपी आणि आरएसएस शी संबंधित होती म्हणून रेड्डींना काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांकडून डावलण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत रेड्डी यांनी आपली आगेकूच सुरूच ठेवली. बीआरएस सारख्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलतांनाही रेवंत रेड्डी मागे हटले नाहीत. रेड्डी यांच्याविरोधात मनी लॉँड्रिंगचा खटलाही सुरू आहे. तरीही त्यांनी भाजपविरोधात मोहीम सुरूच ठेवली. रेड्डी यांनी अडचणींचं रूपांतर संधीमध्ये करण्याचं काम केलंय. त्यातूनच त्यांनी काँग्रेस हायकमांडचा विश्वास संपादन केला.

रेवंत रेड्डी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी

तेलंगणाच्या महेबूबनगर जिल्ह्यातील कोंडारेड्डी पल्ली मध्ये ८ नोव्हेंबर १९६७ मध्ये रेवंत रेड्डी यांचा जन्म झाला. रेवंत यांचा विवाह माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची गीता यांच्यासोबत झाला. रेवंत आणि गीता यांना निमिशा नावाची मुलगी आहे. केसीआर यांच्याविरोधात लढून भाजपसमोर आव्हान उभं करू शकेल अशा नेत्याच्या शोधात असलेल्या काँग्रेसला रेवंत यांच्या रूपानं समर्थ पर्याय मिळाला. केसीआर आणि भाजपविरोधात रेवंत रेड्डी अगदी सहजपणे संघर्ष करू लागले. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनाही वेळोवेळी रेड्डी यांनी आपल्या सोबत ठेवलं आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनं अल्पावधीत तेलंगणमध्ये प्रतिमा तयार केली.

जय-पराजयाच्या पुढे गेले रेड्डी

२०२३ च्या विधानसभा निवडणूकीत रेवंत रेड्डी यांनी दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कामारेड्डी मतदारसंघातून त्यांनी केसीआर यांच्यासमोर आव्हान उभं केलं. तर कोडांगल इथून ते विजयी झाले. २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रेवंत रेड्डी अवघ्या ६ वर्षातच काँग्रेसला सत्तेत बसवण्यापर्यंत मजल मारलीय. लोकांच्या छोट्या-मोठ्या मुद्द्यांवर संघर्ष करून प्रसंगी रस्त्यावरची लढाई करणारा नेता, प्रसंगी पोलिसांच्या काठ्या खाणारा नेता अशी प्रतिमा रेवंत रेड्डी यांची उभी राहिली. लोकांच्या प्रश्नांवर सातत्यानं रस्त्यावरची लढाई करणारा नेता म्हणून आजवर रेवंत रेड्डी यांना तेलंगणाच्या लोकांनी पाहिलंय.

शेवटी, तेलंगणामध्ये काँग्रेसला रेवंत रेड्डी यांच्या रूपानं एक सक्षम नेता मिळाला आहे. ५ वर्षे विरोधी पक्षात असूनही काँग्रेसला जिवंत ठेवण्यात रेड्डी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळं रेड्डी यांच्या हातात तेलंगणा राज्याची सूत्रं मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून देण्यामध्ये काँग्रेस श्रेष्ठी हयगय करणार नाहीत, असं वाटतं.

Updated : 4 Dec 2023 10:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top