Home > Top News > शरद पवारांच्या कार्याचा इतिहास विक्रीला

शरद पवारांच्या कार्याचा इतिहास विक्रीला

किल्लारीमध्ये झालेल्या भूकंपाला २७ वर्षे झाली आहेत. या भूकंपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामाचे दाखले आजही दिले जातात. पण शरद पवारांच्या या कार्याचा इतिहास मात्र आता विक्रीला निघाला आहे. पाहा मॅक्स महाराष्ट्रचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...

शरद पवारांच्या कार्याचा इतिहास विक्रीला
X

३० सप्टेंबर १९९३ रोजी संपूर्ण महाराष्ट्राला लातूर जिल्ह्यात झालेल्या भूकंपाने हादरवून टाकले. किल्लारी, सास्तूर यासह काही गावांमध्ये मोठी जीवितहानी झाली. या भूंकपाला बुधवारी २७ वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला या भूकंपाने हादरवून टाकले होते. पहाटे झालेल्या या भूकंपात सुमारे १० हजारा लोकांचा बळी गेला. हजारो घरं जमीनदोस्त झाली होती. त्या काळी इलेक्ट्रॉनिक मीडिया आजच्या काळाएवढा प्रगत नव्हता आणि स्मार्टफोनही तेव्हा नव्हते. पण त्या काळात ईस्माइल शेख नावाच्या एका व्यक्तीने या भूकंपानंतरची भीषणता आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उत्तम नियोजनाची सर्व दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. ३० सप्टेंबर ते नवीन घरांचे भूमिपूजन या २५ दिवसांच्या काळातली सर्व दृश्यं इस्माइल शेख यांनी आपल्या कॅमेऱ्यात टीपली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्या काळी मदत आणि पुनर्वसनासाठी केलेल्या कामाचा दाखला आजही दिला जातो. मुख्यमंत्री आपल्या गावात येऊन संकटकाळात आपल्या सोबत राहतोय....अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तिथल्या तिथे निर्णय घेतले जात आहे, हे दृश्य भूकंपातून वाचलेल्यांना दिलासा देणारे होते.

हे ही वाचा

त्याकाळी मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आताएवढा वाढलेला नसल्याने त्याकाळचे फोटो किंवा व्हिडिओ हे दुर्मिळ आहेत. अशाच दुर्मिळ व्हिडिओंचा खजिना ईस्माईल शेख यांच्याकडे आहे. त्या काळात ईस्माईल शेख यांनी या भागात फिरुन आपल्या कॅमेऱ्याद्वारे तिथला आक्रोश, सरकारी यंत्रणेचे काम, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासोबत सावलीसारखे फिरत कॅमेऱ्यात बंदीस्त केले. या प्रलयंकारी भूकंपाची आणि त्यानंतरच्या मदत आणि बचावकार्याची दृश्यं हा तसा महाराष्ट्र आणि देशासाठी ऐतिहासिक ठेवा म्हणावा लागेल.

या दृश्यांमधून एक माहितीपट बनवण्यासाठी इस्माईल शेख यांनी प्रयत्न केले. पण त्यांना कुणीही आर्थिक मदत केली नाही. आता ईस्माइल शेख यांची प्रकृती बरी नसते. त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे. त्यामुळेच त्यांनी आता हा खजिना विक्रीला काढला आहे.

भूकंप झाला तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते आणि २७ वर्षांनंतर त्यांचा पक्ष राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे आता तरी या दुर्मिळ व्हिडिओंचा खजिना जपण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा ईस्माइल शेख यांना आहे. शरद पवारांच्या उत्तम कार्यांपैकी लातूरमधील भूकंपग्रस्त भागातील त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो. आपल्या नेत्यांच्या कार्याचा जिवंत पुरावा पुढच्या पिढ्यांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला न्यायचा असेल तर या व्हिडिओबाबत त्यांनी विचार करावा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार संतोष गवळी यांनी केले आहे.

Updated : 30 Sep 2020 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top