Home > मॅक्स व्हिडीओ > स्पर्धेत हरला पण प्रेमात जिंकला, अंध प्रेमीयुगुलाची डोळस कहाणी !

स्पर्धेत हरला पण प्रेमात जिंकला, अंध प्रेमीयुगुलाची डोळस कहाणी !

स्पर्धेत हरला पण प्रेमात जिंकला, अंध प्रेमीयुगुलाची डोळस कहाणी !
X

2016 मध्ये एका मराठी वाचन या स्पर्धेत ज्या तरुणीने हरविले, त्याच तरुणीचे मन त्या तरुणाने जिंकले आणि तिच्याशी आता विवाहन केला आहे. विशेष म्हणजे, हे प्रेमीयुगुल दृष्टीहिन असल्याने त्यांचा हा डोळस प्रेमविवाह सध्या अमरावती जिल्ह्यात विशेष चर्चेचा ठरला आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे, एसटी सेवा बंद असतानाही ती तरुणी थेट सांगलीहून एकटीच प्रियकराच्या प्रेमापोटी अमरावतीत आली आणि नुकतंच त्यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला..

अमरावती जवळ असलेल्या माहुली जहागीर या गावातील राहुल बावणे आणि आरती कांबळे अशी या दोघांची नावे आहेत. गोंदियामध्ये 2016 मध्ये दृष्टिहीन संघटनेच्यावतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये आरतीने राहुलला मराठी वाचन स्पर्धेत हरविले. त्याचवेळी आरतीने गायलेले "जिवलगा दूर राहिले रे घर माझे" हे गाणेही राहुलला प्रचंड आवडले. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या प्रेमाची माहिती आरतीच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी विरोध केला. कुटुंबीयांनी तिचे घराबाहेर पडणेही बंद केले.

एकीकडे कुटुंबीयांचा विरोध तर दुसरीकडे राहुलच्या प्रेमाची ओढ, अशा द्विधा अवस्थेत आरती अडकली. मात्र राहुलने विवाह करण्याची तयारी दर्शवून तिला भावनिक आणि मानसिक आधार दिला. त्यामुळे तिच्यापुढील पेच सुटला. त्यानंतर तिने राहुलला भेटण्यासाठी अमरावतीत येण्याचा बेत आखला आणि ती अमरावतीच्या दिशेने निघाली. एसटी बंद असल्याने तिची मोठी पंचाईत झाली. त्यामुळे ती एका ट्रॅव्हल्समध्ये बसली. 'इच्छा तिथे मार्ग' या उक्तीप्रमाणे त्या गाडीत अमरावतीला येणारा एक प्रवासी भेटला आणि पुढला प्रवास सुकर झाला. त्याच्या मदतीने आरती अमरावतीत आली. येथे आल्यावर तिने राहुलला कॉल केला आणि अशाप्रकारे राहुल-आरतीची एवढ्या वर्षांनंतर भेट झाली. राहुलच्या कुटुंबीयांचा विवाहाला पाठिंबा असल्याने मंगळवारी दोघांच्याही डोक्यावर अक्षदा पडल्या. त्यामुळे दोघांनीही आनंद व्यक्त केला. आरती उत्तम गायिका आहे. राहुल हा केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परीक्षेची तयारी करीत आहे.


Updated : 25 Dec 2021 10:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top