Home > मॅक्स व्हिडीओ > पुढाऱ्यांनो गावात फिरकायचं नाही

पुढाऱ्यांनो गावात फिरकायचं नाही

पुढाऱ्यांनो गावात फिरकायचं नाही
X

सर्वसामान्य मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलीय. सामान्य माणसांनी पुढाऱ्यांच्याविरोधात घेतलेल्या या भूमिकेतून दररोज मयत भेटीला, मातीला, उद्गघाटनाला, वाढदिवसाला, कुणाच्या लग्नाला आपला लव्हाजमा वाहनांचा ताफा घेऊन ऐटीत इंट्री मारत आपला पी आर वाढवणाऱ्या पुढाऱ्यांची, नुकतच मिसरूड फुटून यूवा नेता बनलेल्या पुढाऱ्यांच्या चिरंजीवांची लायकीच सामान्य माणसांनी काढलीय. आपल्या अपयशाचं, अधोगतीच, मागासलेपणाचं खापर प्रचाराचा नारळ फोडावा तसच या पुढाऱ्यांच्या गाडीपुढे फोडलंय. गावागावात या पुढाऱ्यांना शुभेच्छा देणारे मोठमोठे बॅनर लागायचे. यांचा उभा राहिलेला कडक इस्त्रीतला पांढरशुभ्र फोटो वर तर यांच्या पायाच्या अगदी सरळ रेषेत शुभेच्छुक म्हणून गावातील वयस्कर तरुण कार्यकर्त्याचे फोटो असायचे. आज याच बॅनरच्या जागी याच पुढाऱ्यांना गावबंदी करणारे स्वाभिमानी बॅनर गावागावात लागलेत. केवळ बॅनर लाऊन हे थांबलेले नाहीत तर आमदारांच्या गाड्या अडवत त्यांना फाट्यावर गाठत आरक्षण का मिळत नाही याचा जाब हे तरुण विचारत आहेत. आयुष्यभर दुसऱ्याच्या दबावात जगणाऱ्या या तरुणांच्या छाताडात जरांगे पाटील नावाच्या माणसाने स्वाभिमानाचं स्फुलिंग चेतवलय. सामान्य लोकांनी केलेल्या या गावबंदीचा सरळ अर्थ असा देखील घेता येईल…

आजवर आम्ही मत देऊन तुम्हाला पुढारी केलं. आमच्या कष्टानं तुमचे दूध संघ, सहकारी संस्था उभ्या राहिल्या, आमच्याच कष्टानं तुम्हाला दूध संघातील लोणी खायला मिळालं पण तुम्ही आमचा विकास करू शकला नाहीत. तुम्ही केवळ मतासाठी आम्हाला वापरून घेतलंत. तुम्ही अधिकाधिक श्रीमंत झालात. आमची सोय करण्याऐवजी तुम्ही तुमच्या घरातील पाळण्यात डुलक्या घेणारी शेंबडी पोरं देखील भाऊ दादा भैया काका नाना तात्या म्हणून प्रमोट केलीत. आमच्या माथी मारलीत. त्यांच्या करिअरची सोय केलीत. नाय म्हणायला आमच्यातलं एखाद पोरगं तुमच्या संस्थांमध्ये धा हजाराच्या पगारात वॉचमन म्हणून ठेवलं. दूध संघाच्या गाडीवर डायव्हर म्हणून ठेवलं. कधी गावात आलात तर आमच्या खांद्यावर हात टाकून आमच्या तोंडात खोट्या प्रतिष्टेच्या गांजाची चिलीम दिली. ज्याच्या नशेन आमच्या तरुण पिढ्या तुमचं बॅनर घेऊन बरबाद झाल्या. तुमचे झेंडे वागवून आमचे स्वाभिमानी खांदे केंव्हाच तुमच्या पुढे झुकले. जे पाहून तुमच्यातला सरंजामीपणा मराठी सिनेमातल्या नटासारखा आमच्याकडे पाहून कुत्सितपणे हसतोय. आम्हाला तुम्ही अपंग करुन टालं. साधं रेशनकार्ड काढायचं झालं तर आम्हाला तुमच्या फोनची गरज पडते. तुम्ही दिवसेंदिवस अधिक तेजस्वी होत चालला. आम्ही दिवसेंदिवस खंगत चाललो. शेतातला ऊस न्यायचा आसल तरी तुम्ही तोंड पाहून नेता. उपकार केल्याची दया केल्याची भावना दाखवता. वर्षानुवर्षांची ही गुलामी मोडीत काढत आम्ही तुम्हाला गावबंदी केलीय. आम्हाला वर्षानुवर्षे गुलाम ठेवत आरक्षण देण्याच्यावेळी भूमिका न घेऊ शकणाऱ्या वरिष्ठ नेत्याच्या इशाऱ्याची वाट पाहताय. काही ९६ कुळी, कुणबी असा भेद निर्माण करताय? तुम्ही निर्माण केलेल्या साम्राज्यात समाजातील किती लोकांना मोफत शिक्षण दिलं? प्रत्येक वेळी हा आपला आहे का आपल्याला मत देतो का हे बघूनच काम केलंत. तुमच्या या वागण्यामुळेच समाजावर ही वेळ आली आहे. वर्षानुवर्षे सत्तेत तुम्हीच, सत्ता बदलली तरी कोलांटउड्या खात तुम्हीच सत्तेतच. पण आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी काय केलंत? याचा हिशोब लावण्यासाठी आम्ही या वळणावर थांबलोय. आमच्या गरिबीचा अधोगतीचा जाब आम्ही तुम्हाला विचारत राहू. पण तोपर्यंत तुम्ही यंदाच्या निवडणुकीतही गावात….. फिरकायचं नाही. हा इशारा समजा…

Updated : 2 Nov 2023 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top