डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान - CM देवेंद्र फडणवीस
X
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशामध्ये एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती आणि या विषमतेने आपल्याच समाजातील अनेक लोकांचा मानव म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला होता. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समतायुक्त असा समाज तयार झाला पाहिजे या भावनेतून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान संपादित केले आणि त्या आधारे समाजामध्ये समतेचे रोपण करून समाज जागरूक केला आणि स्वतंत्र भारतामध्ये समतेचे राज्य तयार करणारे संविधान आपल्याला दिले. या संविधानाने समाजामध्ये बंधुता निर्माण केली आणि प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असेल अशा प्रकारचे संविधान त्यांनी आपल्याला दिले.
भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल पण याची मुहूर्तमेढ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रोवली. याव्यतिरिक्त राज्याच्या प्रगतीत आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या योगदानामुळे आज देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
संविधानाने उभी केलेली लोकशाहीची व्यवस्था भारताच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.






