Home > मॅक्स व्हिडीओ > महा अंनिसचे 'फटाके मुक्त दिवाळी" अभियान

महा अंनिसचे 'फटाके मुक्त दिवाळी" अभियान

महा अंनिसचे फटाके मुक्त दिवाळी अभियान
X

मागील 20 वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANS) दिवाळीत (Diwali) होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात संपूर्ण राज्यभर "फटाके मुक्त दिवाळी" अभियान राबवीत आहे. यामुळे लोकांमध्ये पर्यावरण (Environment) विषयक जागृती निर्माण होत आहे. यावर्षी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांसह फटाके व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली. जिल्ह्यातील अनेक अंनिसचे व सामाजिक कार्यकर्ते दिवाळीनिमित्त आदिवासी वाड्या पाड्यावर जाऊन फराळांची व खाऊची वाटप करतात व आदिवासी आणि गरिबांची दिवाळी गोड करतात.

जिल्ह्यात सुद्धा फटाकेमुक्त दिवाळी अभियान यशस्वी करण्यासाठी दरवर्षी महा.अंनिसचे कार्यकर्त वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करीत आहे. शाळां-शाळांमध्ये जावून फटाक्याच्या दुष्परीणामांची पत्रक वाटणे, व्याख्याने देणे, विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेणे, पथनाट्याचे सादरीकरण करणे, आकाशवाणीवर मुलाखत देणे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे, स्लाईड-शोद्वारे प्रबोधन करणे, प्रबोधन फेरीचे आयोजन करणे, पुस्तक प्रदर्शन भरविणे यासारखे उपक्रम राबवीत आहे. फटाक्यामुळे होणारे ध्वनी व वायु प्रदूषण, अपघात, करोडो रुपयांचा चुराडा, पर्यावरणाचा ऱ्हास, बालमजुरीचा प्रश्न याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करीत आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी व्यापारी वर्ग परंपरेच्या भाग म्हणून मोठ्या प्रमाणात फटाके फोडतो, या व्यापाऱ्यांचे प्रबोधन कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रबोधन फेरी काढून केली जात आहे.

फटाके न फोडता वाचलेल्या पैशातुन विधायक कामे

विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळी साजरी करून किमान १०० रुपये वाचवा आणि वाचविलेल्या पैश्यातून चांगली पुस्तके, खेळणी, भेटवस्तू, मिठाई, गरिबांच्या घरी फराळ देणे, त्यांना आर्थिक, शैक्षणिक मदत करणे, सारख्या सामजिक कार्यांसाठी प्रोत्साहित करण्यात येते. फटाक्यांच्या या दुष्परिणामाबाबत जनजागृती व्हावी यासाठी समितीने सुरवात केलेले हे अभियान आता व्यापक स्वरुपात महाराष्ट्रातील शाळा-शाळांमध्ये यशस्वीपणे राबविले जात आहे. समितीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काही शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता वाचविलेल्या पैश्यातून शाळेच्या वाचनालयाला दिली, काही विद्यार्थ्यांनी या वाचलेल्या पैशातून वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना चप्पल व बॅगा दिल्या, काही शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी बनविलेले दिवाळीचे पदार्थ आणले व झोपडपट्टीतील मुलांना देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली. पालीतील विनय महेंद्र निकुंभ हा विद्यार्थी मागील काही वर्षांपासून फटाके न फोडता वाचलेल्या पैशातून आदिवासींना फराळाचे व खाऊचे वाटप करत आहे. शिक्षक कुणाल पवार यांनी सुधागड तालुक्यामध्ये फटाके नको फोडायला आम्हाला हा उपक्रम अनेक वर्ष राबविला.





आयुष्य व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे अनोखी दिवाळी

पालीतील अंकुश आपटे यांनी त्यांच्या आयुष्य व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे दिवाळी सणाचे औचित्य साधून पुण्यातली बुधवार पेठेतील शरीरविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना तेथे जाऊन किल्ले, आकाश कंदील व दिवाळीचा फराळ दिला. यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर खूप हास्य होते. तिथली लोक म्हणाली इतक्या वर्षात पहिल्यांदा आमच्या घरात लहान मुलांसाठी कोणीतरी खायला आणलेला आहे. असे अंकुश आपटे यांनी सांगितले

सोशल मिडियातून जनजागृती

समितीतर्फे फेसबुक, ट्विटर, वॅाटस्अपद्वारे फटक्याच्या दुष्परिणामांची माहिती प्रसारित करणे. यासारख्या अभिनव पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहचता येते.

महाराष्ट्र अंनिस मार्फत राबविल्या जाणार्‍या फटाके विरोधी अभियानाला शासनाने मान्यता दिल्याबद्दल शासनाचे अभिनंदन व आभार, तसेच सर्वांनी फक्त दिवाळीतच नाही तर वेगवेगळ्या धर्मातील सणांच्या दिवशी, निवडणुका, मिरवणूक, नेत्यांचे वाढदिवस अशाप्रसंगी प्रदूषणकारी फटाक्याचा वापर टाळावा असे आवाहन करत आहे. फटाक्यांचा उगम हा आपल्या संस्कृतीत झालेलाच नाही. महाअंनिस हिंदू संस्कृतीला विरोध करीत नाही; तर प्रदूषणकारी, घातक प्रथेची चिकित्सा करीत विधायक पर्याय देऊ इच्छिते, असे महा. अंनिस जिल्हा रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी सांगितले.

Updated : 29 Oct 2022 7:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top