गाड्या धुणाऱ्या हातांनी उभारली ७ भाषांची शाळा – इंजि. अनिल झोरे यांची प्रेरणादायी कहाणी
X
कोकणातील छोट्याशा खेड्यातून प्रवास सुरू करून… मुंबईतील झोपडपट्टीत वाढलेले… गाड्या धुण्यापासून कॅटरिंगपर्यंत काम केलेला… आणि नंतर न्यूझीलंडमध्ये ग्लोबल अनुभव घेत परत येऊन ७ परदेशी भाषा शिकवणारी आधुनिक शाळा उभी करणारा इंजि. अनिल झोरे आणि त्यांच्या सहचारिणी इंजि. रागिणी झोरे यांची ही प्रेरक कहाणी.
अनिल झोरे यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. वडील वॉचमन, घराची जबाबदारी आणि पोटाची खळगी अशात शिक्षण होणेच कठीण. पाचवीत असताना पहाटे पाच वाजता उठून वडिलांसोबत गाड्या धुवा… आणि मग शाळा अशा संघर्षातून त्यांनी दहावीपर्यंतचा प्रवास केला. दहावीला 85% गुण मिळाल्यावर त्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे पुढची दिशा मिळाली आणि VJTI च्या इंजिनियरींगच्या डिप्लोमापर्यंत ते पोहोचले.
त्यांच्या आयुष्यातले मोठे वळण एका साध्या प्रसंगातून आले. कॉलेजमध्ये हँडबुक खरेदीला पैसे नसल्याने “तुमच्यासारख्या मुलांकडे दारू–सिगारेटसाठी पैसे असतात” अशी तीरकस टिप्पणी ऐकून त्यांना तीव्र वेदना झाली. पण त्या प्रसंगातूनच त्यांना पहिल्यांदा क्लासेस सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. शाळेतल्या देवबाई शिक्षकांनी 10 विद्यार्थी देत त्यांना पहिली संधी दिली आणि त्यातून “ज्ञानमंदिर क्लासेस” ची सुरुवात झाली.
यानंतर एलअँडटीमध्ये सहा वर्षांचा उत्तम अनुभव आणि मग स्वतःला आव्हान देत न्यूझीलंडमध्ये उच्च शिक्षण आणि अनुभव मिळवण्याचा निर्णय. पण परदेशातील स्थिर करिअर, राहण्याची संधी असूनही अनिल आणि रागिणी यांनी एक कठोर निर्णय घेतला भारताच्या मुलांसाठी काहीतरी वेगळं करायचं. कारण त्यांच्या भारतातील शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांनी दाखवलेली स्वप्नं, वचनं त्यांच्या मते अधिक महत्त्वाची होती. भारतामध्ये परत आल्यावर त्यांनी शाळा केवळ पुस्तकी शिक्षणापुरती न ठेवता स्किल-बेस्ड, व्हॅल्यू-बेस्ड आणि प्रॅक्टिकल लाईफ बेस्ड बनवली. नर्सरीच्या मुलांना ब्रश करायला, कपडे घालायला, स्वतःचा डबा खायला—स्वतंत्र बनवण्यापासून शिक्षणाची सुरुवात. “मार्क्स नव्हे, कौशल्ये महत्त्वाची’’ या तत्त्वावर शाळेची दिशा ठरली.
याच प्रक्रियेतून मुलांनीच दिलेल्या एका चर्चेत “आपण एकमेकांच्या भाषा का शिकू नयेत?” या प्रश्नातून स्वतः शिकून ७–८ भाषा बोलू लागणारी मुलं तयार झाली. आज त्यांच्या शाळेत—
* मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलुगू अशा ५ भारतीय भाषा बोलणारी मुलं
* आणि फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन अशा 3 परदेशी भाषा
स्वतः शिकतात, एकमेकांना शिकवतात आणि जागतिक भविष्याची तयारी करतात.
अनिल झोरे यांची कथा म्हणजे संघर्षातून उभं ठाकलेलं स्वप्न. झोपडपट्टीतून न्यूझीलंड… आणि पुन्हा भारतात येऊन मुलांना जागतिक पातळीचे शिक्षण देणारी “ज्ञानमंदिर इंटरनॅशनल शाळा” उभी करणारा हा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणा ठरतोय.






