Home > मॅक्स स्पोर्ट्स > Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं पदकांचं शतक

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं पदकांचं शतक

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं पदकांचं शतक
X

आशियाई क्रीडा २०२३ मधील कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं चायनी अंतिम सामन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने चायनीज तैपेई संघाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णपदकानंतर भारतानं या स्पर्धेतील पदकांचं शतकही पूर्ण केलंय. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये (Asian Games 2023) भारताच्या खेळाडूंनी आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत भारताच्या पदकांची संख्या १००च्या वर नेली आहे.

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ओजस देवतळेची 'सुवर्ण' हॅट्रिक

आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळे याने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड या प्रकारात अंतिम सामना खेळत गोल्ड मेडल जिंकले आहे. ओजसने आशियाई गेम्सच्या एका स्पर्धेत तीन गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला आहे. आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळे (Ojas Devtale) याने आर्चरी मिक्स टीम कपांऊंड इव्हेंटमध्येही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. आर्चरी मेन्स कंपाऊंड टीम इव्हेंटमध्ये सुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ओजस जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे. गोल्ड मेडल पटकावल्याने ओजसच्या कुटुंबियांनी नागपूरात जल्लोष केला आहे. नागपूरसाठी (Nagpur) आणि कुटुंबियांसाठी ही गौरवाची बाब असल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे.

६० वर्षातील एशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धा अर्थात एशियन गेम्समध्ये याआधी भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही ७० पदकांची होती. यंदा मात्र भारतानं तो आकडा केव्हाच पार केला आहे. एवढंच नाही, तर एक नवा इतिहास रचत भारतानं आता पदकांची शंभरी पार केली आहे. या कामगिरीच्या रुपानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मोठ्या सन्मानानं रोवला गेला आहे. गेल्या ६० वर्षांतली ही भारताची एशियन गेम्समधली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आता पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

शुक्रवारी भारताच्या भात्यात ८६ पदकं होती. काल दिवसभरात हॉकी (सुवर्णपदक), तिरंदादी (रौप्य व कांस्य पदक), ब्रिज (रौप्य), बॅडमिंटन (रौप्य) व रेसलिंग (३ रौप्य) अशा पदकांची लयलूट केली. आज सकाळी भारतीय खेळाडूंनी विजयी कामगिरी करताना तिरंदाजीत तीन, कबड्डीत दोन व बॅडमिंटन आणि पुरुष क्रिकेटमध्ये एक अशा पदकांची निश्चिती केली आहे. त्यामुळे आता भारताची पदकसंख्या शंभरीपार गेली आहे!

“आमचं स्वप्न सत्यात उतरेल याचा विचारही केला नव्हता”

“आम्ही चीनमध्ये आशियाई स्पर्धेसाठी येताना १०० पदकांचं लक्ष्य ठेवलं होतं हे खरं आहे. पण आम्ही असा विचार केला नव्हता की आमचं स्वप्न अशा प्रकारे सत्यातही उतरेल. आता आम्ही ते अगदी सहज साध्य करत आहोत. मी देशाच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. शिवाय, सपोर्ट स्टाफ, खेळाडूंचे प्रशिक्षक या सगळ्यांच्या मदतीनेच हे लक्ष्य साध्य करणं शक्य झालं आहे”, अशी प्रतिक्रिया भारताचे आशियाई स्पर्धेतील प्रमुख भूपिंदर सिंग बाजवा यांनी दिली.

याआधीची सर्वोत्तम कामगिरी..७० पदकं!

दरम्यान, याआधी पाच वर्षांपूर्वी जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये (Jakarta Asian Games) )भारतानं ७० पदकं जिंकत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. त्या वर्षी पदकांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी होता. त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत चौथ्या किंवा पाचव्या स्थानी राहिला. या वर्षी १०० पदकांसह भारत चीन, जपान व दक्षिण कोरियापाठोपाठ चौथ्या स्थानी आहे.

Updated : 7 Oct 2023 11:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top