"विकृत लिंगपिसाटांच्या विळख्यात कोंडला जातोय स्त्री चारित्र्याचा श्वास"
X
हा व्हिडियो पाहिला आणि आजच्या विकृत मानसिकतेचं आणखी एक वास्तव पाहून मस्तक भणाणून गेलं. एक स्त्री म्हणून व्हिडियो पाहताना इतकी चीड आली की असं वाटतं होतं याला अगदी हुडकून काढावा आणि कायद्याच्या हाती सुपूर्द न करता सरळ या नराधमाच्या नरडीचा घोट घ्यावा. अरे, आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीकडे पाहून लैंगिक भावना उत्पन्न होतातच कश्या? अश्या लिंगपिसाटाच्या घरच्या स्त्रिया देखील त्याच्या सहवासात बिलकुल सुरक्षित नसतील. उद्या त्यांचा ही उपभोग घ्यायला असे पाशवी वृत्तीचे मनोरुग्ण मागे पुढे पाहणार नाहीत. गेल्या काळात अगदी लहान अर्भकापासून ते अगदी ८० वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत बलात्कार केला गेल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. खरंच लैंगिक मानसिकता इतकी रसातळाला गेली आहे का? आपणही एका स्त्रीच्या पोटातून जन्म घेतलाय...याची जराही जाणीव, लाज वाटत नाही का यांना? परस्त्री मातेसमान हे फक्त बोलण्यापुरतं उरलं आहे. आज काल परस्त्री म्हणजे लैंगिक भूक भागवून घेण्याचं दुकान आहे अश्या हीन दृष्टीने तिला वागवले जाते. ट्रेन, बस, गर्दीची ठिकाणे म्हणजे यांचे अड्डे झालेत जणू... आणि १० पैकी किमान ८ मुलींना तरी या अश्या घाणेरड्या अनुभवातून जाव लागतं.
आता बरेच जण म्हणतील की मुलींनी त्या विरोधात आवाज उठवावा. अरे कसा उठवणार? एखादा माणूस तुमच्या पार्श्वभागावर, वक्षस्थळांवर सार्वजनिक ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती स्थिती त्याच्यासाठी अनुकूल असते. जरी एखाद्या स्त्रीने आवाज उठवला तरी सारवासारव करताना एकच वाक्य ऐकायला मिळतं की, “गर्दी आहे खूप..चुकून धक्का लागला.” आणि त्याच नराधमाला अनपेक्षितपणे पाठींबा देणारे अजून १० जण येतात. “पुरुषांवर खोटे आरोप करून उगाच सहानुभूती मिळवायचा प्रयत्न या स्त्रिया करतात” असा आरोप करून हे पुरुष मंडळी मोकळे होतात. अश्या वेळी गर्दीच्या ठिकाणी पुरुषांच्या गराड्यात असलेल्या त्या अबलेने काय करावं? या व्हिडियोतही ती बिचारी मुलगी सहन करण्यापलीकडे काही करू शकली नाही. तरी नशीब तिची आई तिच्या सोबत होती. पण शेवटी ती देखील स्त्रीच पडली. काही विरोध करू शकली नाही. भीती एकच लोकांच्या नजरा आणि आपण कदाचित खोटे पडू ही भीती आणि याच गोष्टीचा फायदा घेतात हे नीच लोक. पकडलो गेलो तरी आपल्या भोळ्या चेहऱ्याचा फायदा घेऊन साळसूदपणाचा आव आणून, एका मुलीच्या शरीराचा विकृतपणे उपभोग घेऊन पसार होतात.
एकीकडे लोकांना वंशाचा दिवा नको तर धनाची पेटी हवी असते पण ती एक अशी पेटी आहे जी देवाने खुली सोडली आहे. तिची चावी बनवायलाच देव विसरल्यामुळे क्रुर, नीच लोक तिचा हवा तसा वापर करतायत.. हा ना तिचा दोष आहे ना तिला जन्म देणा-या जन्मदात्यांचा. हा दोष आहे या पापी जगाचा, आपल्या वासनांवर जराही कंट्रोल नसणा-या अमानवी जीवांचा, हा दोष आहे त्या माणुसकी विकलेल्यांचा, हा दोष आहे. वखवखलेल्या नजरा, चाळावलेल्या हातांचा.मुलगी वयात आली की आई पहिलं तिला हे शिकवते की बसताना नीट बसायचं खास करून मुलांमध्ये, ओढणी खाली ढळू देऊ नकोस, कोणत्याही मुलाच्या शरीराला स्पर्श करू नको आणि कोणलाही तुझ्या शरीराला स्पर्श करून देऊ नकोस. पण, हे किती घरात शिकवलं जातं की तुझ्या बहिनीचे पाय मोकळे दिसत असतील तरी तुझा बघण्याचा दृष्टीकोन जसा बदलत नाही तसचं परस्त्रीला विवस्त्र बघतीलं तरी कधीच संयम ढळू देऊ नकोस..?
मी संपूर्ण पुरुष जातीला दोष देणाऱ्यातली नाहीये. कारण एक आंबा सडका निघाला म्हणून आपण आंब्यांची पेटी काही फेकून देत नाही. पण आजच्या समाजातले हे असे सडके आंबे जिथे दिसतील तिथे त्यांचा ठेचून बाहेर काढलं पाहिजे. मला या व्हिडियोबाबत अजून एक गोष्ट पाहून चीड आली ती म्हणजे व्हिडियो काढणाऱ्याची…आता व्हिडियो काढणारा स्त्री आहे की पुरुष ते माहित नाही. पण तिथे जो कोणी व्यक्ती असेल तिच्या हातात पुरावा होता. ती स्वत: पुढाकार घेऊन त्या नराधमाला धडा शिकवू शकली असती. पण दुर्दैव म्हणजे अजूनही लोक चुकीची गोष्ट दिसली की व्हिडियो शूट करण्याचे कष्ट घेतात पण तेथील पिडीतेला न्याय मिळवून देण्याचे कष्ट घेण्यास कचरतात. अरे का घाबरतो आपण? घेऊया ना पुढाकार. कायद्याच्या भीती पेक्षा अश्या लिंगपिसाटांना लोकांची. समाजाची भीती बसली पाहिजे...कारण कायदा त्यांना सुरक्षा देतो चिडलेल्या लोकांपासून..पण जर त्यांना थेट चिडलेल्या लोकांनीच शिक्षा दिली तर सार्वजनिक ठिकाणी तरी असे घाणेरडे कृत्य करण्यास हे नराधम धजावणार नाहीत..!
एक स्त्री म्हणून मी संपूर्ण पुरुष जातीला एकच विंनती करते की स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहू नका. ती देखील हाडामासांचा गोळा आहे. तिला भावना आहेत. त्रास तिलाही होतो. मन तिचंही छिन्न विछीन्न होतं. एक पुरुष म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी ओळखा. स्त्रियांच्या रक्षणासाठी स्त्रियांना स्वावलंबी करण्याचे सल्ले देण्यासोबत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा...अन्यायाविरोधात ती शांत बसलेली दिसली तरी तुम्ही आवाज उठवा.....एक भाऊ, एक मित्र, एक नातेवाईक म्हणून ओळखी, अनोळखीच्या स्त्रीच्या रक्षणार्थ पुढे या...एकट्या आम्ही देखील लढू शकतो..पण तूमची साथ मिळाली तर लढाई अधिक सोप्पी होईल..!