Home > मॅक्स रिपोर्ट > 'या' महिला कधी होणार 'लाभार्थी' ?

'या' महिला कधी होणार 'लाभार्थी' ?

या महिला कधी होणार लाभार्थी ?
X

एकिकडे सरकार बुलेट ट्रेनच्या बढाया मारत आहे, मात्र देशातील गाव खेड्याचे वास्तव काही वेगळंच आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या १०० टक्के आदिवासी बहुल गावात जाण्यासाठी गावच्या निर्मितीपासून अद्यापर्यंत साधा रस्ता देखील झालेला नसल्याने, येथील नागरीक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. केवळ गावाला रस्ता नसल्या कारणाने गावातल्या महिलेला प्रसुतीसाठी बाजेवरून रूग्णालयात दाखल करावे लागले. प्रसुती सारख्या अत्यंत नाजुक आणि धोकादायक स्थितीत एका महिलेला वेदना होत असताना या गावात रूग्ण वाहिकादेखील पोहोचू शकत नाही. ही या गावाची शोेकांतीका आहे.

आपण सध्या माध्यमांवरती शासनाच्या प्रगतीच्या यशोगाथा पाहत आहोत, मात्र दुसरीकडे हे गाव, या महिला सोयी सुविधांच्या केव्हा 'लाभार्थी' ठरणार हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

साधारण तीनशेच्या आसपास करवाडी गावाची लोकसंख्या असून चारही बाजूने डोंगराचा या गावाला वेढा आहे, गावात पाचवी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे, आणि गावाची ग्रामपंचायत जवळच असलेल्या नांदापूर या गावाला जोडली आहे. जिल्हा परिषदेची शाळा आणि अंगणवाडी इमारत वगळता, गावात कोणतेही आरोग्य सेवा पुरविण्याचे केंद्र नाही. गावामध्ये अनेक वयोवृद्ध लोक आरोग्य व्यवस्था नसल्याने तसेच वेळेत रुग्णालयात जाण्याची व्यवस्था नसल्याने मरण पावले तर महिलांनादेखील जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात जाण्याची कोणतीच सुविधा किंवा रस्ता नसल्याने त्यातच गावात आरोग्य विभागाचा एकंही कर्मचारी फिरकत नसल्याने रूग्ण खितपत गावातच उपचारा विना पडल्याचे पाहायला मिळाले. करवाडीच्या नागरिकांनी गावाला रस्ता मिळविण्यासाठी अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इत्तर शासकीय कार्यालयावर संपूर्ण गाव बंद करून आंदोलन उपोषणे केली, मात्र त्यांच्या नशिबी कायम उपेक्षाच आली, करवाडी गावाला रस्ता नसल्याने तसेच गावात पाचवीपर्यंतच शाळा असल्याने येथील विद्यार्थ्यांना नांदापूर येथे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जावं लागतं. बाराही महिने हा त्रास या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय. पावसाळ्यात तर इथून जाणं येणं अधिकच अवघड होऊन बसतं.

गावात असलेल्या पांदण रस्त्यात ओढा वाहत असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाताना ओढ्यामधून प्रवास करावा लागतो, विद्यार्थ्यांचे गणवेश भिजतात. ओढ्यात जास्त पाणी आल्यास विद्यार्थ्यांची शाळा बुडून शैक्षणिक नुकसान होत असल्याचे येथील विद्यार्थिनींनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितले, एवढ्या त्रास सहन करीत असताना कळमनुरी मतदार संघाचे आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी, या अगोदर आदिवासींच्या प्रश्नावर अनेक राज्यस्तरीय आंदोलने, मोर्चे काढले, मात्र आता आमदार झाल्यावर त्यांनी स्वतःच्या मतदार संघाकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप करवाडीच्या नागरिकांनी केला आहे.

Updated : 13 Nov 2017 5:53 PM IST
Next Story
Share it
Top