गुजरातमध्येही ‘पद्मावती’वर बंदी
X
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या चित्रपटावरून देशभरातील विविध राज्यांमध्ये वाद पेटला असतानाच कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या चित्रपटातील वादांवर आणि आक्षेपांवर जोपर्यंत अंतिम तोडगा निघत नाही, तोपर्यंत तो प्रदर्शित न करू देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी दिली आहे. सरकारने जरी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दिले असले तरी यामागे विधानसभा निवडणूकीत क्षत्रिय समाजाच्या भावना दुखावून त्याचा मतांवर विपरित परिणाम होऊ नये, असाही दृष्टीकोन असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या निर्णय़ाचा राज्यात होणाऱ्या निवडणूकीशी कोणताही संबंध नसल्याचे रूपानी यांनी स्पष्ट केले. तसेच जोपर्यंत या चित्रपटाशी संबंधीत वाद आणि आक्षेप निकाली निघत नाही, तोपर्यंत प्रदर्शनावर बंदी कायम असेल, असेही त्यांनी सांगितले. या चित्रपटातच्या प्रदर्शनाला आताच परवानगी दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. याचाच अर्थ भाजपाला याक्षणी क्षत्रिय समाजाला दुखवायचे नाही, असेही सूचित होत आहे.
या चित्रपटातील काही मुद्यांवरून गुजरातमधील अनेक समाजांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला आहे तर क्षत्रिय समाजात प्रचंड असंतोष आणि राग आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या गुजरातमधील प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे रूपानी म्हणाले. भाजप शासीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांनी यापुर्वीच पद्मावतीच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.