अभिजीत तुला कडक सॅल्यूट...!!!
X
पुण्याच्या सॉफ्टवेअर इंजिनियर नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणात तीन नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आणि अखेर नयनाला तब्बल ६ वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर न्याय मिळाला. खरंतर या गुन्हेगारांना होणाऱ्या फाशीच्या शिक्षेपेक्षाही अधिक वेदना नयनाचा पती अभिजीत पुजारी यानं गेल्या काही वर्षांत भोगल्या. कारण नयनाच्या निर्घृण हत्येनंतर पोलीस पातळीवरील तपास, प्रक्रियेतील दिरंगाई आणि मुख्य आरोपींच पोलिसांच्या तावडीतून पलायन. पण सुमारे दीड वर्षांनंतर मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळणे आणि तब्बल सहा वर्षांपेक्षा अधिक काळ चालेल्या न्यायालयीन खटल्यानंतर अखेर आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालं. अएसं असलं तरी शिक्षेच्या अमंलबजावणीपर्यंतचा कालावधी किती असेल? हे कुणालाही ठाऊक नाही. पण, या लढ्यात नयनाच्या कुटूंबियाचा विशेषतः तिचा पती अभिजीतच्या लढ्याच कौतुक करावे तितकं कमीच.
नयना पुजारी २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणी ८ ऑक्टोबर २००९ रोजी आपल्या सिनेक्रोन कंपनीतलं काम संपवून घरी जात असताना कॅबचालक योगेश राऊत आणि त्यांच्या तीन मित्रांनी तीला खेड तालुक्यातील जेरवाडी फाटा येथे नेऊन सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला. तिथून सुरू झाली अभिजितची न्यायासाठीची लढाई. अखेर न्यायाधीश एल.एल. येनकर यांनी तीन आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायमूर्तींनी हे प्रकरण माणुसकीची हीन पातळी गाठणारं असून खटला दुर्मिळ असल्याचं सुनावलं.
हे प्रकरण भयानकतेच्याही पलीकडचं आहे. सावित्रीच्या पुण्यामध्ये शिक्षणाच्या जोरावर यशावर आरूढ होणाऱ्या नयनाला या नराधमांनी पुरुषी वासेनेनं चित केलं. पण, नयनाची चूक ती काय..? या सगळ्याकडे पाहून नयना-अभिजीतच्या सुखी संसाराला नजर तर लागली नाही ना, हे मनात आल्याशिवाय राहत नाही. नयनाच्या मुत्यूनंतर मुर्दाड व्यवस्थेला तोंड देत अभिजीत लढत राहिला आणि अजूनही हा लढा पूर्णत्वाला गेला नाही. या लढ्यानं केवळ एक टप्पा ओलांडलाय. नवरा-बायकोच्या नात्यांच्या व्याख्या साताजन्माच्या कहाणीमध्ये विरतात, पण, नयनाला न्याय देण्यासाठी अभिजित गेल्या सात वर्षांपेक्षा जास्त काळ लढत होता. इथून पुढेही शिक्षेची अमंलबजावणी होईपर्यत लढण्याचा अभिजीतचा निर्धार असून लवकरच नयनाच्या नावाने समाजसेवी संस्था काढून नयनासारख्या अत्याचार झालेल्या महिलांना न्याय मिळवण्यासाठी काम करण्याचा त्याचा मानस आहे. कारण अनेकदा अशा पीडित आणि त्यांचे कुटुंबिय हतबल असतात. शिवाय या व्यवस्थेपुढे भावनांना काडीचीही किंमत नसते. त्यामुळे कायद्याच्या उणिवांमुळे पीडित नरकयातना भोगते तर दुसरीकडे दोषी निर्धास्त असतात.
न्यायव्यवस्थेमध्ये बदल होणं शक्य आहे..? न्यायव्यवस्थेतील तांत्रिक बाबी आणि त्याबरोबर शिक्षेची अमंलबजावणी ही दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने पीडितांना नाहक त्रास होतो, याचं हे उदाहरणच. गुन्हा कोणताही असो पण शिक्षेची अमंलबजावणी तितकीच जलदगतीने होणं गरजेचे आहे. कारण, आता गुन्हा करणाऱ्यांना कायद्याचा वचक नाही, त्यामुळे शिक्षेची फिकीरही नाही. म्हणून दिवसेंदिवस असे गुन्हे घडतायत. नयना पुजारी प्रकरण न्यायव्यवस्थेला एका वेगळ्या वळणार नेऊन ठेवते. कारण एखाद्या चित्रपटाला लाजवेल असं आरोपी योगेश राऊत याचं पलायन आणि त्यानंतरचा नाट्यमय घटनाक्रम. जर कदाचित पोलिसांच्या तावडीतून आरोपी राऊत पसार झाला नसता, तर खटला केव्हाच संपला असता. या प्रकरणामध्ये आणखी एक बाब म्हणजे यातील चौथा आरोपी जो माफीचा साक्षीदार झाला आहे तो राजेश चौधरी. यानं देखील नयनावर अमानुषपणे बलात्कार केला. पण, हत्येमध्ये प्रत्यक्ष हात नसल्याने आणि माफीचा साक्षीदार झाल्याने राजेश चौधरीची सुटका झाली. पण, त्याची ही सुटका न पचणारी आहे. चौधरीला शिक्षा व्हावी, ही नयनाच्या कुटुंबियाची देखील मागणी आहे. पण, कायद्याअंतर्गत बाबींवर भाष्य करणार कोण? त्यावा आक्षेप घेणार कोण? अशा प्रकरणांमध्ये तरी त्यावर गांभिर्यानं विचार झाला पाहिजे.
अनेक बलात्कार प्रकरणात न्याय लवकर मिळावा, म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टची योजना आखली गेली. पण ती तडीस गेली? किती अबलांना न्याय मिळाला? किती नराधमांना शिक्षा मिळाली? याचं उत्तर समाधानकारक मिळेल? वास्तविक पाहता दिल्लीच्या निर्भया प्रकरणाच्या आधीचे हे प्रकरण आहे. दोन्ही प्रकरण सामूहिक बलात्काराचीच, न्याय मिळाला. दोन्ही प्रकरणात सारखीच शिक्षा ठोठावण्यात आलीये. पण, अंमलबजावणी रामभरोसे. स्त्री भोवतीचे पुरुषी पाशवी अत्याचाराचे शुक्लकाष्ठ संपेल तरी केव्हा?
स्त्रियांवर बलात्कार करून खून होण्याच्या घटना दरवेळेस अंगावर शहारे आणतात. या घटना घडल्यावर हळहळ व्यक्त केली जाते, तर कधी मुलीच्या कपड्यावर आक्षेप घेत नराधमाच्या विकृतीला झाकलं जातं. नयना पुजारी, कोपरडीची छकुली असो किंवा दिल्लीतली निर्भया, यांनी केलेला कपड्याचा पेहराव तर पुरुषांच्या भावनांना छेडत नव्हता. ही प्रातिनिधिक उदाहरण आहेत. एकतर नराधम बलात्कार करून जीव घोटतो जर चुकून जगल्याच तर न्यायव्यवस्था आणि समाज जीव घेतो. गरज आहे समाजाला अभिजीत पुजारीसारख्या पाठीराख्याची. खरंच किती अबलांच्या पाठिशी असे अभिजीत उभे राहतात? विचार केल्यानंतर उत्तर नाहीच येतं, कारण ते सत्य आहे. जागरूक व्हा, लढा उभारा. नक्कीच या नराधमांना शिक्षा मिळेल आणि अशा विकृत प्रवृत्तिंना लगाम बसेल.
सायली नलवडे