Home > मॅक्स रिपोर्ट > आम्हाला कमी समजू नका म्हणत अंध गोविंदांनी लावले थरावर थर

आम्हाला कमी समजू नका म्हणत अंध गोविंदांनी लावले थरावर थर

मुंबईत लाखोंच्या दहीहंडी फुटल्या. पण या सगळ्यांमध्ये चर्चेत आलेले गोविंदा म्हणजे नयन गोविंदा पथकाचे अंध गोविंदा. त्यांची सगळ्या मुंबईत जोरदार चर्चा रंगली आहे. या गोविंदांनी किती थर लावले? त्यांचा उत्साह कसा होता आणि अंधांना कमी समजणाऱ्यांना त्यांनी नेमका काय इशारा दिला आहे? त्याचाच वेध घेणारा भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट....

आम्हाला कमी समजू नका म्हणत अंध गोविंदांनी लावले थरावर थर
X

गेल्या 10 वर्षांपासून नयन फौंडेशन हे गोविंदा पथक मुंबईतील दहीहंडी स्पर्धांमध्ये सहभागी होतंय. त्यांचं सगळीकडे कौतूकही होतंय. यंदा दादरमधील आयडियल बुक डेपो येथे असलेल्या दही हंडीसाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांचा थरार पाहून डोळसांचेही डोळे दिपल्याचं पहायला मिळालं.


दहा वर्षांपुर्वी म्हणजे 2014 मध्ये नयन फौंडेशन मार्फत मुंबईतील दहीहंडीमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. त्यानंतर 2017 मध्ये मुलींचेही पथक तयार करण्यात आले. आतापर्यंत आम्ही 350 पेक्षा जास्त ठिकाणी थर लावले पण आमच्या मुला-मुलींना कुठेही दुखापत झाली नाही. हे आमचं वैशिष्ट असल्याचे या पथकाचे प्रमुख पुन्नू सांगतात. तसेच यंदा आम्ही प्रो-गोविंदा स्पर्धेत पाच थर रचून विक्रम केल्याचं पुन्नू यांनी सांगितलं आहे.


2013 मध्ये नवमहाराष्ट्र मित्रमंडळाच्या गोविंदा पथकात आम्ही तीन थरांची दहीहंडी लावली. त्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढत गेला. त्यानंतर आम्ही दरवर्षी सराव करून दही हंडी उत्सव साजरा करत आहोत.

तुम्ही हे करू शकता, असं म्हणत आमच्यात आत्मविश्वास भरण्याचं काम आमच्या अध्यक्षांनी केलं. त्यामुळेच आम्ही हे थर लावू शकतो, असं अंध असलेल्या गोविंदाने म्हटलं.


फक्त डोळसच लोक दही हंडी खेळू शकत नाहीत. आम्ही सुद्धा थर लावू शकतो आणि दही हंडीत सहभागी होऊ शकतो, असं मत महिला गोविंदाने व्यक्त केले.

आमच्या गोविंदा पथकाची मी टॉपर आहे. सगळे दही हंडी साजरी करतात आणि पाहतात. पण आम्ही फक्त दही हंडीचा उत्साह ऐकतो. पण आम्हाला कमी समजू नका. आम्ही करू शकतो. आम्हाला सहानुभूतीची गरज नाही. आम्ही डोळस व्यक्तीप्रमाणे दही हंडीचे थर लावू शकतो, असं मत नयन फौंडेशनच्या महिला गोविंदाने व्यक्त केले.

हे थरावर थर हे महिलांचे आणि हे पुरुषांचे. दोन्हीही ठिकाणी अंध आहेत. पण तरीही त्यांचा आत्मविश्वास डोळसांना लाजवणारा आहे. अथक परिश्रम आणि स्वप्न पाहून पाठलाग केल्यास डोळे नसतील तरी या जगात काहीच अशक्य नाही, असंच या गोविंदा पथकातील मुलं आणि मुली सांगत असल्याचं पहायला मिळतंय.

Updated : 7 Sep 2023 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top