Home > मॅक्स रिपोर्ट > गरिबाचं खाणं वडापाव का महागला, काय आहे वडापाव विक्रेत्याच्या व्यथा....

गरिबाचं खाणं वडापाव का महागला, काय आहे वडापाव विक्रेत्याच्या व्यथा....

गरिबाचं खाणं वडापाव का महागला, काय आहे वडापाव विक्रेत्याच्या व्यथा....
X

लाखो लोकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे वडा-पाव होय. हा पदार्थ महाराष्ट्रातील सर्वच शहरांसह ग्रामीण भागात आवडीने खातात. विशेष करून मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरात वडा पाव मोठ्या प्रमाणात विकला जातो. मध्यम वर्गीय आणि गरीबांच्या आवडीचा पदार्थ म्हणून वडापावकडे पाहिले जाते. पण हा पदार्थ वाढत्या महागाईमुळे खाण्यास महाग झाला आहे. असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

वडापाव हा सहज उपलब्ध होणारा पदार्थ असून रेल्वे स्टेशन,एसटी स्टँड, शाळा, कॉलेज, आठवडी बाजार, हायवे रोड, तसेच महाराष्ट्रातील रस्त्यांवर असणाऱ्या हॉटेलात मिळतो. हा पदार्थ कोठे ही सहज उपलब्ध होणारा आहे. परंतु याची वाढत्या किंमतीकडे वाटचाल सुरू असून सध्या त्याची भाव वाढ झाली असल्याचे पाहायला मिळते.हा खाद्यपदार्थ महाराष्ट्रातील लहानापासून ते थोरापर्यंत आवडीचा आहे.

कसा तयार केला जातो वडापाव?

वडा पाव तयार करणाऱ्याच्या कामाची सुरुवात पहाटेपासून होते. तेव्हा सकाळी लोकांना गरमागरम वडापाव खायला मिळतो. वडा-पाव बनवताना प्रथम बटाटे शिजवले जातात. त्याच्यावरील आवरण काढून त्याचे मिश्रण बनवले जाते. या मिश्रणात जिरी, मोहरी, हळद, कोथिंबीर, मीठ टाकली जाते. हे बनवलेले मिश्रण डब्यात किंवा पातेल्यात ठेवले जाते. वडा बनवताना या मिश्रणाच्या गोल गोळ्या बनवून बेसन पिठाच्या मिश्रणात टाकून काढल्या जातात.

त्यानंतर त्या बेसनाच्या गोळ्या गरम तेलाच्या कढईत तळायला टाकल्या जातात. कढईतील तेलात हा पदार्थ व्यवस्थित तळला जातो. भाजलेला वडा झारीने काढून एखाद्या ताटात किंवा वडा साठवणुकीच्या भांड्यात टाकला जातो. ग्राहकांना तयार वडा खायला देत असताना त्याच्याबरोबर पाव दिला जातो. या पावाचा अर्धा भाग करून पावाच्या मधोमध वडा ठेवला जातो. अशा प्रकारे वडा-पाव खाण्यास तयार होऊन या वडा-पाव बरोबर खाण्यास चटणी, मिरची,चिरलेला कांदा, कोथींबीर, एकत्र करून दिले जाते.

वडापाव चे ब्रॅंड...

वडा-पाव वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत. याचे ब्रँड तयार झाले असून यामध्ये जम्बो वडा-पाव, जोशी वडेवाले,मुं बईत शिवसेनेने सुरू केलेला शिव वडा-पाव, आदींचा समावेश आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरात वडा-पावचे वेगवेगळ्या नावाने ब्रँड तयार झाले आहेत. या दुकानात दररोज अनेक ग्राहक वडापाव खाण्यास येतात. पुण्या-मुंबईत तर काही लोक याचे एकवेळचे अन्न म्हणून उपयोग करतात. बरेच लोक हॉटेलात वडा भाजी ही आवडीने खातात. वडापाव दररोज लाखो लोकांची भुक भागवत आहे.

वडा-पाव महागला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री...

सततची गॅस दर वाढ याचा फटका या धंद्याला बसला आहे. गॅस च्या किंमती सतत वाढत आहेत. सुरुवातीला कमी पैशात मिळणारा गॅस आता सहज उपलब्ध होत नाही. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. गॅस वडा-पावच्या दुकानापर्यंत पोचवायचा असेल तर गॅस एजन्सीवाले वाढीव दर आकारतात. हे ही या दरवाढी मागचे कारण मानले जाते. गेल्या काही वर्षात गॅसची किंमत दुप्पट झाली तरी वडापावच्या किंमती त्या प्रमाणात वाढल्या नव्हत्या. काही दुकानदारांनी वडा पावची साइज कमी केली होती. मात्र, किंमत वाढवली नव्हती.

खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ

खाद्य तेलांच्या किंमतीत मागच्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी ८० रुपये किलो किंमतीला मिळणारे खाद्य तेल सध्या प्रति किलो १७० रुपयाच्या आसपास पोहचले आहे. या धंद्यासाठी लागणाऱ्या प्रमुख साधनांपैकी खाद्य तेल एक प्रमुख साधन आहे.

बेसनाच्या किंमतीत झाली वाढ

गेल्या काही दिवसांपासून बेसनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. बेसनाचे दर साधारण पणे 100 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. त्याचाही परिणाम या उद्योगधंद्यावर झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे वडापावच्या किंमतीत वाढ झाली आहे. असे अनेकांना वाटते.

बटाट्याच्या किंमतीत झाली वाढ

बटाट्याच्या किंमतीतील वाढ या दर वाढीमागचे प्रमुख कारण समजले जाते. हा पदार्थ बनवण्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. याच्याही किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा ही परिणाम या उद्योगधंद्यावर झाला आहे असे अनेकजण सांगतात. सध्या बटाट्याची किंमत 40 ते 60 रुपये किलोपर्यंत जाते.

लॉकडाऊन चा बसला फटका

कोरोना महामारीमुळे अचानक लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे हा धंदा आर्थिक कचाट्यात सापडला. याचा या ठेल्यांच्या मालकांवर परिणाम होऊन कुटूंबाचे पालन पोषण करण्यासाठी त्यांना इतर ठिकाणी कामाला जावे लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यास काही महिन्यांचा कालावधी जावा लागेल असे वडापाव विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या धंद्याच्या जीवावर घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मोठी धावपळ त्यांना करावी लागत आहे. असे अनेक सांगत आहेत.

कोरोना महामारीमुळे ग्राहक झाले कमी

कोरोना महामारीमुळे ग्राहकांची संख्या घटली असून त्याचाही परिणाम या उद्योगधंद्यावर झाला आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाल फारच कमी प्रमाणात होत आहे. वडा-पाव खाण्यासाठी ग्राहक येत असताना कोरोना महामारीच्या संबंधाने शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले जाते. अलीकडच्या काळात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे अचानक लॉकडाऊन करण्यात येत असल्याने या उद्योगधंद्यासाठी भरलेला माल खराब होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. असे अनेक वडापाव विक्रेते सांगत आहेत.

वडा-पाव च्या उद्योगधंद्यात गुंतवलेले भांडवल ही परत येत नाही...

वडापाव विक्रेते सध्या आर्थिक अडचणीत सापडले असून सध्या सणा-सुधीचा काळ असल्याने वडा-पाव खाण्यास फारच कमी प्रमाणात लोक येत आहेत. तसेच या पदार्थांची किंमत वाढल्याने वडा-पाव खाण्यास येणारे ग्राहक विचार करूनच येत आहेत. याची किंमत कमी केली तर वडा-पाव च्या उद्योगधंद्यावर परिणाम होऊन गुंतवलेले भांडवल ही निघेना गेले आहे. असे वडापाव विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

पेट्रोल, डिझेल दर वाढीचा उद्योगधंद्यावर काय परिणाम झाला?

वाढत्या पेट्रोल, डिझेल दर वाढीचा उद्योगधंद्यावर मोठा परिणाम झाला असून त्याचा तोटा वडा-पाव विक्रेत्यांना सोसावा लागत आहे. असे वडा-पाव विक्रेत्यांचे सांगणे आहे. काही वडा-पाव विक्रेते वडा-पाव च्या ठेल्यापासून दूर राहत असून येण्या-जाण्या साठी दोन चाकी चा वापर करतात. तसेच भाजीपाला आणण्यासाठी भाड्याच्या चार चाकी वाहनांचा वापर केला जातो. त्याचाही भार वडा-पाव विक्रेत्यांना सोसावा लागत आहे. अशी कैफियत काही वडा-पाव विक्रेत्यांनी मांडली आहे.

कामगारांच्या पगारात वाढ...

कामगारांच्या पगारात वाढ झाली असून कमी पगारात कामगार कामावर येण्यास तयार नाहीत.पू र्वी २५० ते ३०० रुपयांत कामासाठी उपलब्ध होणारा कामगार ३५० ते ४०० रुपये हजेरी घेऊ लागला आहे. या पगार वाढीचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. असे अनेकांचे मत आहे.

वडा-पाव विक्रेत्यांच्या काय आहेत व्यथा?

वडापाव विक्रेता अशोक शिंदे यांच्याशी बातचीत केली असता, गेल्या अनेक वर्षांपासून वडा-पाव चा व्यवसाय करत असून सध्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती गंभीर बनली आहे. सर्वत्र महागाई वाढल्यामुळे आमच्याकडे वडा-पाव खाण्यासाठी ग्राहक कमी प्रमाणात येत आहेत. पूर्वी १० रुपयाला वडापाव देत होतो. पण सध्या ग्राहकांना १० रुपयाला वडापाव देणे परवडणारे नाही. १० रुपयावरून २० रुपयाला वडापाव केला. परंतु ग्राहकांना तो भाव परवडेना गेला आहे. त्यामुळे त्याची किंमत १५ रुपये केली आहे.

लॉकडाऊन मुळे परिस्थिती वाईट झाली आहे. दिवसभर ठेल्यावर थांबल्यानंतर दर तासाला ग्राहक येत आहेत. बेसन, बटाटे याचे भाव वाढले आहेत. बेसन काही दिवसांपूर्वी ६० ते ७० रुपये किलो होते.परंतु त्याचे सध्याचे भाव प्रति किलो ८० ते ९० रुपये झाले आहेत. खाद्य तेलाचे भाव पूर्वी प्रति किलो ७० रुपये होते. सध्या तेलाचे भाव वाढले असून १७० रुपये प्रति किलो झाले आहेत. आम्ही जगायचे कसे? आमचे आई-वडील, मुले आहेत. लॉकडाऊन मुळे जगावे की मरावे? अशी परिस्थिती झाली आहे. आम्हाला काही कळेना गेले आहे.

Updated : 3 Sep 2021 12:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top