Home > मॅक्स रिपोर्ट > Mukesh Ambani लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे वृत्त खरे का वाटले?

Mukesh Ambani लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे वृत्त खरे का वाटले?

Mukesh Ambani लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे वृत्त खरे का वाटले?
X

आशियामधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आपल्या परिवारासह लंडनमध्ये रहायला जाणार असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. मिड डे या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार अंबानी कुटुंबाने लंडनमध्ये ३०० एकरावर जागेत असलेल्या बंगल्यामध्ये ते राहणार आहेत. पण यावर रिलायन्स कंपनीने प्रतिक्रिया देत हे वृत्त निराधार असल्याचे सांगितले, तसेच अंबानी कुटुंब भारत सोडून कुठेही रहायला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र अंबानी हे लंडनमध्ये घेतलेल्या घरात रहायला जाणार असल्याच्या वृत्ताने खळबळ का उडाली आणि ते जाऊ अशी चर्चा का झाली?







मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाने लंडनमधील नवीन घरात दिवाळी साजरी केली आणि ते लवकरच मुंबई आणि लंडन या ठिकाणच्या आपल्या घरांमध्ये राहण्याचा कालावधी ठरवणार आहेत, असे वृत्त मिड डेने सुत्रांच्या हवाल्याने दिले होते. या वृत्तानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. अंबानी भारत सोडून लंडनमध्ये राहणार याचा अर्थ त्यांचा देशाचा मोठा पैसा परदेशात जाणार, अशी भीती काहींना वाटली...यासंदर्भात आऊटलूक मासिकाने काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

मुकेश अंबानी यांच्या देश सोडण्याच्या वृत्ताने खळबळ का?

दिवाळीचे सेलिब्रेशन नवीन घरात

१. मुकेश अंबानी खरंच लंडनमधील नवीन घरात राहणार का यावर लोकांचा विश्वास बसण्याचे प्रमुख कारण म्हणजे, हिंदू धर्मात दिवाळी सणाचे महत्त्व आहे. हा सण आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत साजरा कऱण्याची प्रथा आहे आणि अंबानी हे लंडनमध्ये खरेदी केलेल्या नवीन घरात दिवाळी साजर केल्याचे वृत्त देण्यात आल्याने त्यावर लोकांचा विश्वास बसला.



मुकेश अंबानी १०० बिलियन डॉलर क्लबचे सदस्य

२. मुकेश अंबानी यांनी नुकतीच १०० बिलियन डॉलर वैयक्तिक संपत्ती असलेल्या लोकांच्या गटात जागा मिळवली आहे आणि ते लवकरच जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याची देखील शक्यता आहे.

कोरोना काळात किती अब्जाधीशांनी देश सोडला?

३. कोरोना संकाटाच्या काळात देशातील अतिश्रीमंत व्यक्ती म्हणजे अब्जाधीशांपैकी ५ हजार लोक देश सोडून परदेशात स्थायिक झाले. अतिश्रीमंत व्यक्ती देश सोडून जाणाऱ्या देशांच्या यादीत २०२०मध्ये भारत अग्रस्थानी होता. भारतात दुहेरी नागरिकत्वाची परवानगी नसल्याने लोकांना विकसित देशात राहण्यासाठी भारतीय पासपोर्टचा त्याग करावा लागतो.

मुकेश अंबानी यांच्यावरील राजकीय आरोप

४. मुकेश अंबानी यांच्यावर २०१४ पासून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने सातत्याने राजकीय आरोप केले आहेत. 2014 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नैसर्गिक वायुच्या किमती दुप्पट करण्याच्या प्रकरणात तत्कालीन मंत्री वीरप्पा मोईली आणि मुकेश अंबानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यात पुढे काही झाले नाही. इकडे राहुल गांधी यांनी सातत्याने मोदींवर टीका करताना अंबानी आणि अदानी यांचे नाव आपल्या राजकीय हल्ल्यांच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. मोदी हे सूट-बूट की सरकार आहेत, असे म्हणत राहुल गांधी सातत्याने या उद्योगपतींना मोदी सरकार मदत करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळेच देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच अंबानी बनवले गेल्याने त्यांच्यादृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

अँटेलिया स्फोटकं प्रकरण

५. मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर सापडलेल्या स्फोटकांनी खळबळ उडाली. पण यानंतर या गाडीच्या मालकाचा हत्या आणि पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या या प्रकरणाचील सहभागाच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.

काळा पैसाप्रकरणी अंबानी कुटुंबाला आयकर विभागाची नोटीस

६. २०१९मध्ये इनकम टॅक्स विभागाच्या मुंबई शाखेने मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि तीन मुलांना नोटीस बजावली होती. काळ्या पैशाविरोधातील कायद्यांतर्गत ही नोटीस बजावण्यात आली होती, असे वृत्त इंडियान एक्स्प्रेसने दिले होते. पण रिलायन्सने हे दावे देखील खोटे असल्याचे स्पष्ट केले होते. परदेशातील बँकेत खाते असल्याची माहिती त्यांनी लपवली असल्याच्या आरोपा संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली होती.



आता अंबानी कुटुंबाने लंडनमध्ये स्थलांतरीत होण्याचे वृत्त अफवा असल्याचे म्हटले आहे. पण येत्या काळात अंबानी कुटुंब या नवीन घरात किती काळ व्यतित करतात याकडे तमाम भारतीयांचे नक्कीच लक्ष असेल.

Updated : 6 Nov 2021 3:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top