Home > मॅक्स रिपोर्ट > GroundReport - दि.बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह कशासाठी?

GroundReport - दि.बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह कशासाठी?

GroundReport -  दि.बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह कशासाठी?
X

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण होण्याआधीच आता विमानतळाच्या नावाचा वाद निर्माण झाला आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची तयारी केली आहे. सिडकोने तसा प्रस्तावही मंजूर केला आहे. पण नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी मात्र दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. त्यासाठी भर पावसात शेकडो लोकांनी सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढला. कोणत्याही परिस्थितीत दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. दि.बा. यांच्या नावाचा आग्रह का धरला जातोय याचा शोध मॅक्स महाराष्ट्रने थेट ग्राऊंडवर जाऊन घेतला.

कुणी म्हणतो तो आमचा बाप होता

कुणी म्हणतं ते आमचे सासरे होते

कुणी म्हणतं ते जर नसते तर आम्ही भीक मागताना दिसलो असतो. रायगड, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, पालघर अशा भागात फिरताना तुम्ही कुणालाही विचारले की दि. बा. पाटील कोण होते, त्यावर पुरुष असो की महिला असो हीच उत्तरे मिळतात.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे म्हणून भूमिपुत्रांचा संघर्ष सुरू आहे. काही नेते सोडले तर सर्वच जणांचा या नावासाठी आग्रह आहे. दि. बा. पाटील यांचेच नाव का हवे याविषयी लोकांना विचारले तेव्हा ते जी कारणं सांगतात, त्यावरुन दि.बा. या लोकांसाठी देवासमान का होते ते कळते....



वसंतदादा पाटील यांनी दि. बा. पाटील यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. एवढेच नाही तर ते मुखमंत्रीही होऊ शकतील असेही सांगितले होते, पण दिबांनी ती ऑफर नाकारली होती. दि.बा. म्हणजे दिनकर बाळू पाटील.....ते चारवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. एवढा मोठा नेता असला तरी दि.बा. यांनी स्वत:साठी घरदेखील बांधले नव्हते. अखेर दि.बा. यांच्यासाठी लोकांनीच वर्गणी गोळा करुन त्यांचे घर बांधले होते.

इथले लोक सांगतात, दिबांच्या मनात असतं तर सिडको आणि जेएनपीटीच्या प्रकल्पातून कोट्यवधी रूपये मिळवले असते. पण त्यांनी शाळा सुरू करण्यास प्राधान्य दिलं. दि.बा. पाटील हे विरोधी पक्षनेते होते. ते सभागृहात बोलायला उभे राहिले की सर्वांचा आवाज बंद व्हायचा. दि.बा. पाटील यांनी रामशेठ ठाकूर यांच्यासारख्या धनाढ्या खासदाराला 10 लाख रूपये दंड आकारला होता, कारण त्यांनी भूमिपुत्रांचा अपमान केला, असे भूमिपुत्रांचे म्हणणे होते. दि.बा. यांनी मुख्यमंत्री अंतुलेंसारख्या नेत्यालाही थेट उत्तर दिलं होतं, अशा त्यांच्या आठवणीही जुने लोक सांगतात.

मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षा घेत मुंबईला लागूनच नवी मुंबई वसवण्याचा निर्णय सरकारने घेतला, तसेच सिडकोची स्थापना करण्यात आली. जवळपास 15 हजार एकर जमीन त्यासाठी ताब्यात घेतली जाणार होची. सिडकोने लोकांच्या जमिनीला एकरी सात हजार भाव दिली होता आणि या भावाने जमीन देणे म्हणजे भूमिपुत्रांच्या संसाराचं वाटोळे होणे आहे, हा धोका हेरुन दि. बा. पाटील यांनी या निर्णयाला विरोध केला. प्रकल्पग्रस्तांना वाढीव पैसे म्हणजे एकरी 40 हजार रुपये मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी होती. पण सरकार काही मानायला तयार नव्हते अखेर त्यातून संघर्ष उभा राहीला. सुमारे 95 गावातील शेतकरी दिबांच्या मागे उभे राहीले. संघर्ष झाला, गोळ्या झाडल्या गेल्या, पाच जण शहीद झाले. खुद्द दि. बा. पाटील जखमी झाले होते. अखेर साडेबारा टक्यां चा कायदा सरकारला करावा लागला. आज आगरी, कोळी, कराडी समाजातील लोकांच्या घरात जो काही राहणीमानात बदल दिसतोय तो दि.बा. पाटील यांच्या संघर्षामुळेच असे इथल्या प्रत्येकाचे मत आहे.

राजकारणाचा दि.बा. किती करारी होते ते आपण पाहिले. पण त्यांचे व्यक्तीमत्वही खूप प्रभावी होते. कणखर आवाज, नजर भेदक होती. ते जर रागावले तर त्यांच्यापुढे काही बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती. शेतकरी कामगार पक्ष वाढला त्यालाही दि.बा. यांचा मोठा हातभार आहे. त्यांची सभागृहातील भाषणं म्हणजे अभ्यासपूर्ण आणि सरकारचे डोळे उघडणारी होती.

सत्तर- अंशीच्या काळात आगरी समाजाची प्रगती झाली नव्हती, शिक्षणाचा प्रसार कमी होता. पण वकील झालेल्या दि.बा. पाटील यांनी या समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली. आज आगरी समाजातला तरूण वकील, इंजिनियर, डॉक्टर होतो आहे. मोठमोठ्या प्रकल्पांचे ठेके घेतोय, ते दि.बा. यांच्या प्रयत्नांमुळे असेही इथल्या लोकांना वाटते.

महाराष्ट्रा मोठा जनाधार असलेले अनेक नेते झाले आहेत. दि.बा यांचे नावही त्यामध्ये येते. दि.बा. पाटील यांनी संपत्ती जमवली नाही. आजही त्यांचं घर अगदी छोटं आहे. त्यांच्या मुलांना त्यांनी कधी राजकारणात आणलं नाही की त्यांना गाडी बंगला दिला नाही. दिलं ते फक्त आणि फक्त समाजाचं प्रेम. आज नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या निमित्ताने ते संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा दिसतंय. पाऊस झेलत, कोरोनाच्या संकटातही, शेकडोंच्या संख्येने असलेल्या पोलिसांच्या समोर विमानतळाला दि.बा यांचे नाव द्या म्हणून आग्रह करण्यासाठी आलेला जनसागर पाहून, हे लोक दि.बा. यांचे नाव देण्याचा आग्रह का करत आहे ते कळते.



गणेश नाईक हे नवी मुंबईतील मोठे प्रस्थ....त्यांनीही दि.बा. यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. बाळासाहेब ठाकरे हे मोठेच होते याविषयी वाद नाही, पण विमानतळाला दि.बा. यांचेच नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. नवी मुंबईतील इतरही नेते दि.बा. यांच्याच नावाचा आग्रह धरत आहेत. दि.बा. पाटील हे केवळ प्रकल्पग्रस्तांचे नेते नव्हते. त्यांनी राज्यातील धरणग्रस्तांसाठीही संघर्ष केला. तसेच त्यांनी राज्यातील आदिवासी, शेतकरी आणि महिलांचे प्रश्नही सभागृहात मांडले. येथील भूमिपुत्रांची आक्रमक भूमिका पाहता सरकारला या वादात समाधानकारक तोडगा काढावा लागेल, असे दिसते आहे. पण या मुद्द्याचे केवळ राजकारण होऊ नये याची खबरदारी आंदोलकांना घ्यावी लागणार आहे. आता पुढच्या काळात भूमिपुत्र आपल्या मागणीसाठी काय भूमिका घेतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 30 Jun 2021 5:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top