Home > मॅक्स रिपोर्ट > तृतीयपंथीय घराच्या मुलभूत हक्कापासून वंचित !

तृतीयपंथीय घराच्या मुलभूत हक्कापासून वंचित !

तृतीयपंथीय घराच्या मुलभूत हक्कापासून वंचित !
X

स्त्री पुरुषांप्रमाणे राजकारणामध्ये तृतीयपंथीयांना समान न्याय मिळण्याचे दिवस आले असले तरीही मुंबईमध्ये मात्र तृतीयपंथीयांना त्यांच्या हक्काचे तर सोडाच, साधं भाड्यानंही घर मिळत नाही. तृतीयपंथी समाजाच्या नेत्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्य प्रिया पाटील समाजसेवेमध्ये असणाऱ्या माधुरी सरोदे शर्मा यांना याचा चांगला अनुभव आला असुन आम्ही वर्षोनुवर्षे केवळ झोपडपट्टीमध्येच राहायचे का, अशी उद्विग्नता तृतीयपंथीयांकडून व्यक्त केली जातेय.

यासंदर्भात प्रिया पाटील यांनी स्वतःचें अनुभव कथन करताना सांगितले की तृतीयपंथीयांना अनेक हक्क दिले गेले. मात्र, केवळ कागदावरच. प्रत्यक्षात आम्हाला निवाऱ्यासारख्या मुलभूत गरजेसाठीही झगडावं लागतंय. कारण तृतीयपंथीय शेजारी म्हणून कुणालाच नको असतात. वसई येथील नायगाव येथे दोनवेळा भाड्यानं घर घेतलं मात्र तो अनुभव फारसा चांगला नव्हता असं त्या सांगतात. सोसायटीमध्ये कागदपत्रांची अडवणूक केली जाते, माझ्यासारख्या म्हणजेच सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीला असा त्रास होत असेल तर इतरांची काय अवस्था होत असेल, असा प्रश्न प्रिया पाटील यांनी उपस्थित केला. कोणत्याही गृहनिर्माण संकुलांच्या योजनेमध्ये तृतीयपंथीयांसाठी वेगळा रकाना नसतो असे तृतीयपंथीय माधुरी सरोदे- शर्मा यांनी सांगितलं. ज्या प्रमाणे कलावंतासाठी घराचा वेगळा विचार केला जातो तसा तृतीयपंथीयांसाठी का केला जात नाही. असा प्रश्न माधुरी यांनी उपस्थित केला.

तृतीयपंथीय असल्याने सोसायटीतून हाकलले...

तृतीयपंथीय असल्यामुळं क्षमा माणके ( नाव बदलले आहे ) यांनी वांद्रे येथे एका सोसायटीमध्ये भाड्यानं घर घेतलं. मात्र सोसायटीचा घर देताना एकूण रागरंग पाहून त्यांनी तृतीयपंथीय असल्याची ओळख लपवली. मात्र काही महिन्यांनी घरी ये जा करणाऱ्या व्यक्तींना पाहून सोसायटीच्या ते लक्षात आले. रात्री अडीच वाजता धक्के मारून घरातून बाहेर काढण्यात आल्याची दुःखद आठवण त्या सांगतात.

तृतीयपंथीयांना चांगल्या घरात राहण्याचा हक्क नाही का?

तृतीयपंथी आज पदवीचे शिक्षण घेत असुन कला, वैद्यकीय, नृत्य, समाजकार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये तृतीयपंथीय कामगिरी बजावताना दिसतात. त्यामुळं आर्थिक क्षमताही आली आहे, अशावेळी जर स्वतःचं हक्काचं घऱ घेण्याचा विचार असेल तर त्यात चूक काय, असा प्रश्न तृतीयपंथीयांनी उपस्थित केलाय.

Updated : 14 May 2019 12:14 PM GMT
Next Story
Share it
Top